किशोर अतनूरकर
अनेकजणींची यूरिन इन्फेक्शन वा मूत्र संसर्गाची तक्रार असते. त्याचं कारण प्रवासात किंवा अन्य ठिकाणी वापरावं लागलेलं अस्वच्छ वॉशरूम, असा अनेकींचा गैरसमज असतो. हा गैरसमज दूर होण्यासाठी यूरिन इन्फेक्शन स्त्रियांमध्ये कसं होतं याची माहिती समजून घेणं आवश्यक आहे.
कोणत्याही इन्फेक्शनचा अर्थ रोगजंतूंचा प्रादुर्भाव. ढोबळ मानाने रोगजंतू म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरस. रोगजंतूंचा प्रादुर्भाव किंवा इन्फेक्शन होण्यासाठी बॅक्टेरिया किंवा व्हायरसला शरीरात कोणत्यातरी मार्गाने प्रवेश करणं गरजेचं असतं. हवेतून बॅक्टेरिया किंवा व्हायरस श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करतात, त्यामुळे रुग्णाला, सर्दी, ताप, खोकला, दम लागणे वगैरे त्रास होऊ शकतो. रुग्णांना तपासून डॉक्टर फ्लू, ब्रॉन्कायटिस असं निदान करून उपचार करतात. तसेच पचनसंस्थेशी संबंधित आजार, उदा. उलटी-मळमळ, शौच पातळ होणं, काविळीचे रोगजंतू, पाण्यातून किंवा अन्नातून शरीरात प्रवेश मिळवतात. हे सविस्तर सांगण्या मागचा उद्देश असा की, लघवी करण्यासाठी अस्वच्छ टॉयलेट अथवा वॉशरूम वापरण्याची वेळ येणं ही प्रत्येकासाठी नापसंतीची बाब असली तरी, ती क्रिया करत असताना शरीरातील मूत्रविसर्जन संस्थेमध्ये बॅक्टेरिया प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे अस्वच्छ वॉशरूमचा वापर हे यूरिन इन्फेक्शनचं कारण असू शकत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे.
वास्तविक पाहता, स्त्रियांमध्ये पुरुषाच्या तुलनेत यूरिन इन्फेक्शनचं प्रमाण जास्त आहे. या मागचं कारण सर्व स्त्रियांनी अगोदर समजून घेतलं पाहिजे. पुरुषाच्या तुलनेत स्त्रियांना निसर्गाने जास्त जबाबदारी दिली आहे. विशेषतः प्रजननाच्या बाबतीत तर ती खूप अधिक आहे. ती जबाबदारी निभावण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. यूरिन इन्फेक्शनच्या बाबतीतही निसर्गाने थोडाफार असाच ‘अन्याय’ स्त्रियांवर केला आहे असं म्हणायला हरकत नाही. पुरुषाच्या तुलनेत, स्त्रियांना खूपच कमी लांबीचा मूत्रमार्ग (Urethra) दिला आहे. स्त्रियांच्या गुप्तभागाच्या (private parts) रचनेत, निसर्गाने मूत्रमार्ग, योनीमार्ग आणि गुद््द्वार एकाखाली एक एकमेकांशी अगदी चिकटून ठेवले आहेत. गुदद्वार म्हणजे अन्न पचनानंतर शरीराला नको असलेल्या गोष्टी विष्ठेच्या स्वरूपात बाहेर टाकण्याचा मार्ग. त्या विष्ठेत E. Coli नावाचे रोगजंतू किंवा बॅक्टेरिया असतात. शौच झाल्यानंतर स्वच्छता करताना हे डोळ्याला न दिसणारे सूक्ष्म बॅक्टेरिया नकळत लांबीला खूपच कमी असणाऱ्या मूत्रमार्गातून, स्त्रियांच्या मूत्रविसर्जनसंस्थेत प्रवेश मिळवतात. स्त्रियांमध्ये यूरिन इन्फेक्शन होण्याची ही सर्वसाधारण प्रक्रिया आहे. यूरिन इन्फेक्शन झालेल्या स्त्री रुग्णाच्या लघवीची कल्चर टेस्ट केल्यास, बहुतेक वेळेस ते यूरिन इन्फेक्शन E.Coli या बॅक्टरिया मुळेच झालेलं आहे असं निदर्शनास येतं.
हेही वाचा >>>महिलांनो, वयाच्या तिशीत कोणता आरोग्य विमा काढावा? जाणून घ्या
काही स्त्रियांना यूरिन इन्फेक्शनचा त्रास वारंवर होतो. या त्रासामुळे त्या वैतागून जातात. या मागचं महत्वाचं कारण म्हणजे सुरुवातीला जेंव्हा यूरिन इन्फेक्शनचा त्रास होतो, तेंव्हा जर उपचार नीट झाले नाहीत किंवा अपूर्ण राहिले तर तात्पुरतं शांत झालेलं इन्फेक्शन काही दिवसानंतर डोकं वर काढतं आणि पुन्हा त्रास होतो. त्यासाठी लागू पडलेल्या गोळ्यांचा ‘कोर्स’ त्रास कमी झाल्यावर लगेच बंद न करता तो पूर्ण करावा. यूरिन इन्फेक्शनचा बाबतीत अजून एक लक्षात ठेवणं आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा यूरिनमध्ये इन्फेक्शन असतं, पण रुग्णाला त्याचा त्रास होत नाही. पण लघवीची तपासणी केली तर त्यात इन्फेक्शन असल्याचं लक्षात येत. त्रास होत नसल्यामुळे रुग्ण अर्थातच डॉक्टरकडे जाणार नाही. मात्र वारंवर यूरिन इन्फेक्शनचा त्रास असणाऱ्या स्त्रियांनी अधून-मधून त्रास नसताना देखील लघवीची तपासणी, विशेषतः कल्चरची तपासणी करणं जास्त योग्य आहे जेणे करून त्या तपासणीनंतर यूरिन इन्फेक्शन आहे असं सिद्ध झाल्यास त्रास नसताना देखील उपचार केल्यास त्या इन्फेक्शनचा ‘व्यवस्थित बंदोबस्त’ होऊन वारंवार त्रास होणार नाही. ज्या स्त्रियांना मधुमेह असतो आणि तो जेंव्हा नियंत्रित नसतो त्या स्त्रियांना यूरिन इन्फेक्शनचा त्रास वारंवार होतो. त्यामुळे डायबेटीस असणाऱ्या स्त्रियांनी याबाबतीत सतर्क राहिलं पाहिजे.
हेही वाचा >>>“पोटगी महिलांचा हक्क आहे, दान नाही”, मुस्लीम समाजातील महिलांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
याव्यतिरिक्त स्त्रियांमध्ये वारंवार यूरिन इन्फेक्शन होण्यामागचं अलीकडच्या काळातील महत्वाचं कारण म्हणजे, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना झालेलं इन्फेक्शन ( Hospital Acquired Infection ). सिझेरियन सेक्शन, गर्भपिशवीचं ऑपरेशन करताना, लघवीच्या ठिकाणी ‘नळी’ करावी लागते. त्याला कॅथेटर ( Catheter ) करणं असं म्हणतात. या कॅथेटरद्वारे देखील रोगजंतू शरीरात प्रवेश मिळवण्याची शक्यता असते. यापद्धतीने होणाऱ्या यूरिन इन्फेक्शनवर उपचार खूप काळजीपूर्वक करावे लागतात.
जगात सर्वत्र आणि विशेषतः आपल्या देशात डॉक्टरांकडून प्रतिजैविकांचा (antibiotics) अविवेकी ( irrational ) पद्धतीने केल्या जाणाऱ्या वापरामुळे देखील रोगजंतूंमध्ये अँटिबायोटिक्सना न जुमानण्याची शक्ती निर्माण होते. त्यामुळे देखील यूरिन इन्फेक्शनचं नव्हे तर कोणतंही इन्फेक्शनवर उपचार करणं सोपं राहिलेलं नाही, किंबहुना भविष्यात ते अजून कठीण होण्याची शक्यता आहे.
( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.)
atnurkarkishore@gmail.com