आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यावर प्रत्येकालाच एका चांगल्या जोडीदाराची गरज भासते. आपला जोडीदार चांगला असेल तर आपण आयुष्यात अनेक गोष्टी साध्य करू शकतो. मात्र, अनेक प्रयत्न करूनही बऱ्याच लोकांना जोडीदार शोधण्यात अपयश येते. अशावेळी हे लोक वेगवेगळ्या मॅट्रिमोनिअल साइट्सची मदत घेतात. या साइट्सच्या मदतीने आपल्याला जोडीदार शोधण्यात मदत मिळत असली तरीही काही गोष्टींची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजकाल ऑनलाइन डेटिंग आणि मॅट्रिमोनिअल साइट्सवर जोडीदार शोधणे अत्यंत सामान्य झाले आहे. मात्र, तंत्रज्ञानाने आपले आयुष्य जितके सुलभ बनवले आहे, त्याचप्रमाणे यामुळे फसवणूक होण्याच्या घटनांमध्येही कमालीची वाढ झाली आहे. अनेक गुन्हेगार अशा ऑनलाइन साइट्सच्या वापर लोकांची फसवणूक करण्यासाठी सर्रास करतात. त्यातच अशा घटनांमध्ये महिलांची फसवणूक होण्याचे प्रमाण अधिक असते. अशा परिस्थितीत महिलांनी विशेष काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे.

ऑनलाइन पद्धतीने जोडीदार शोधणे कितीही सोपे असले तरीही काही महिलांसाठी ही प्रक्रिया अतिशय किचकट असू शकते. यामुळेच या महिला सायबर फसवणुकीला अगदी सहज बळी पडतात. आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे सायबर फसवणुकीच्या धोक्यापासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो, त्याचबरोबर मॅट्रिमोनिअल साइट्सवर चांगला जोडीदार शोधणे सोपे होऊ शकते.

  • प्रोफाइल नीट तपासून पाहा

मॅट्रिमोनिअल साइट्सवर काही प्रोफाइल्स खूपच आकर्षक असतात. अनेक मुली अशा प्रोफाइल्सला भुलून संबंधित व्यक्तीशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशा प्रोफाइल्स बनावटही असू शकतात. म्हणूनच, मॅट्रिमोनिअल साइट्सवर कोणत्याही व्यक्तीशी संपर्क वाढवताना त्यांची प्रोफाइल नीट तपासून आणि सर्व गोष्टींची खात्री करूनच पुढे जा.

  • वैयक्तिक गोष्टी शेअर करू नका

मॅट्रिमोनिअल साइटवर कोणाशीही बोलत असताना तुमची वैयक्तिक माहिती अजिबात शेअर करू नका. खरं तर, अशा साइटवर भेटलेले लोक अनेकदा एकमेकांशी त्यांच्या बँक तपशीलासारखी अनेक वैयक्तिक माहिती शेअर करतात. यामुळे तुम्ही फसवणुकीचे शिकार होऊ शकता. म्हणूनच, मॅट्रिमोनिअल साइटवर कोणावरही अति विश्वास ठेवून त्यांना आपल्या वैयक्तिक बाबी सांगणे टाळा.

  • कुटुंबीयांची मदत घ्या

अनेकदा लोकं आपल्या कुटुंबियांच्या नकळत मॅट्रिमोनिअल साइट्सवर प्रोफाइल तयार करतात. त्यांना सर्व गोष्टी स्वतःच्या मर्जीने करायच्या असतात. मात्र लग्न ही एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये कुटुंबियांचे मत लक्षात घेणेही गरजेचे असते. विशेषतः घरातील वडिलधाल्या लोकांशी याबद्दल बोलल्यास ते आपल्याला योग्य जीवनसाथी शोधण्यासाठी मदत करू शकतात. तसेच, फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्हाला कुटुंबीयांची मदत मिळू शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Looking for a life partner on matrimonial sites keep these tips in mind to avoid scams pvp