संचिता आणि वरुण यांचं लग्न ठरलं तेव्हा वरुणनं प्रामाणिकपणे तिला त्याच्या आधीच्या गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं. त्याच्या आयुष्यात मानसी आली होती, त्यांचं प्रेम कसं जमलं, त्यांचं नातं कसं होतं, त्यांचं ब्रेकअप कशामुळे झालं, याबद्दल पूर्ण कल्पना दिली. आणि या नात्यातून पूर्ण बाहेर पडल्याचंही सांगितलं.
स्वत:बरोबरच तिचं कुणावर प्रेम आहे किंवा होतं का याचीही त्यानं चौकशी केली. तिचा कुणी बॉयफ्रेंड नव्हता, पण तिला मित्र आहेत, हे संचितानंही मोकळेपणानं सांगितलं. वरुणचं असं दिलखुलास असणं आवडलं तिला. त्यांनी एकमकांना पसंत केलं आणि दोघांचं थाटामाटात लग्न झालं. सगळं स्वप्नवत आणि छान छान होतं. त्यात एक दिवस दोघं निवांत गप्पा मारत असताना मानसीचा फोन आला.
वरुणनं स्पीकर ऑन ठेवून संचिताला संभाषण ऐकवलं. मानसीला आता तिच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. तिला वरुणला भेटायचं होतं. त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी. तिला तिची बाजू मांडायची होती. मानसी फोनवर रडत वरुणची माफी मागत होती. त्याला भेटायला येण्याची गळ घालत होती. संचितानं खुणेनं ‘हो म्हण’ असं सांगितलं आणि वरुण मानसीला भेटायला कबूल झाला.
“तू का मला तिला भेटायला भाग पाडते आहेस संचिता?” त्यानं विचारलं. “अरे, आज तू नाही म्हणालास तर ती उद्या पुन्हा फोन करेल. तिचं मन तिला खातंय. काय तो विषय एकदाचा संपवून टाक आणि पूर्णत: मोकळा हो.”
हेही वाचा… गच्चीवरची बाग: पुष्पलता दारात रंगगंधांची बरसात!
वरुण मानसीला भेटला. तिनं त्याची माफी मागितली. मन मोकळं केलं, पण विषय मात्र तिथेच संपला नाही. ती त्याला वारंवार फोन करू लागली. ऑफिसमध्ये असताना, रात्री उशिरा, पहाटे लवकर असं कोणत्याही वेळी ती कॉल करू लागली. एक दिवस सांचिताने फोन घेतला आणि स्पष्टपणे फोन न करण्याबाबत खडसावून सांगितलं. पण मानसी थांबली नाही. एक दिवस तर सरळ घरी आली. त्यानंतर मात्र सांचिता सरळ मानसीच्या घरी गेली. जे काही घडतंय त्याबद्दल तिच्या आई वडिलांशी बोलली. मानसीला एकटेपणा जाणवत होता. तिला समुपदेशनाची आणि एका चांगल्या जोडीदाराची गरज होती. सुदैवानं मानसीच्या आईवडिलांना आपल्या मुलीची चूक समजली. संचितानं मानसीसाठी काही स्थळं सुचवली. काही काळातच तिला योग्य जोडीदार मिळाला आणि संचिता- वरुणने सुटकेचा निःश्वास टाकला .
लग्नाला तीन वर्षं झालेल्या वीणाच्या नवऱ्यालाही त्याच्या पूर्वीच्या गर्लफ्रेंडचे अचानक फोन यायला सुरुवात झाली आणि त्याचं वागणं बदललं. तो जास्त काळ बाहेर राहू लागला. फोन आला, की उठून दुसरीकडे जाऊ लागला. त्यानं वीणाला लग्नाआधी त्याच्या प्रेमाबद्दल सांगितलं होतं, पण आता त्यांचे अजिबात संबंध नाहीत हेही सांगितलं होतं.
एक दिवस वीणाला त्या दोघांचं संभाषण ऐकता आलं. त्यांनी पुन्हा भेटायला सुरुवात केली आहे हे तिच्या लक्षात आलं. तिनं नवऱ्याजवळ स्पष्टपणे हा विषय काढला, पण त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली.
हेही वाचा… समुपदेशन: मुलांना परावलंबी करताय?
बऱ्याच दिवसांच्या अस्वस्थतेनंतर एके दिवशी तिनं त्याचा पाठलाग केला आणि दोघांना एकत्र पकडलं. घरात बराच गोंधळ झाला. त्याला आता पुन्हा त्याची गर्लफ्रेंड आवडू लागल्याचं त्यानं कबूल केलं. अशावेळी वीणानं त्या संसारात राहाण्यात अर्थ नव्हता. ओढून ताणून नातं टिकवण्यामध्ये ऊर्जा घालवण्यापेक्षा वेळीच वेगळं होण्याचा निर्णय तिनं घेतला आणि मोकळी झाली .
आपल्या लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधांची सावली संसारावर पडून नातं काळवंडून जाण्याची शक्यता असेल तर त्याचा विचार लग्न आधीच करायला हवा. आपला संसार आपल्याला हवा असेल तर दुसऱ्या जुन्या- नव्या नात्यात न अडकता त्यातून वेळीच बाहेर पडण्याची काळजी दोघांनी – नवरा-बायकोने घ्यायला हवी, तरच संसार कायम सुखाचा होईल.
adaparnadeshpande@gmail.com