Railways Laws for Female Travellers : तुम्ही रेल्वेने एकट्याने प्रवास करत असाल, तुमच्याबरोबर एखादं तान्ह बाळ असेल, खूप लांबचा प्रवास तुम्हाला एकट्याने करायचा असेल तर तुमच्या सुरक्षेची काळजी घेण्याकरता भारतीय रेल्वेने काही कायदे तयार केले आहेत. या कायद्यांमुळे महिलांचा रेल्वे प्रवास सुखी आणि सुरक्षित होतो. भारतीय रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १३९ मध्ये याबाबत तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. यामुळे महिला प्रवाशांचे संरक्षण होण्यास मदत होते.
अनेक महिला एकट्याने प्रवास करतात. सोलो ट्रॅव्हलर असतात. भारतातील विविध राज्ये, राज्यातील विविध शहरे, विविध पर्यटनस्थळे त्या एकटीने धुंडाळतात. त्यासाठी रेल्वे प्रवास हा अत्यंत सुरक्षित आणि स्वस्त पर्याय आहे. त्यामुळे अनेकजणी ट्रेननेच जाणं पसंत करतात.
१९८९ मध्ये लागू केलेले हे कायदे विशेषत: एकल महिला प्रवासी आणि तान्ह्या बाळाबरोबर प्रवास करणाऱ्या महिलांचं संरक्षण करतात. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, जर एखादी किशोरवयीन मुलगी किंवा महिला तिकीटाशिवाय एकटीने प्रवास करत असेल तर प्रवासी तिकीट परीक्षक (TTE) ट्रेनमधून बाहेर काढू शकत नाही. महिला दंड भरून तिचा प्रवास सुरू ठेवू शकते. महिला दंड भरू शकत नसली तरीही तिला डब्यातून बाहेर काढण्याची परवानगी कायद्यात नाही.
हेही वाचा >> Women Empowerment Schemes : भारतामध्ये महिला आणि मुलांसाठी कोणकोणत्या योजना राबवल्या जातात? घ्या जाणून…
भारतीय रेल्वेचा मेरी सहेली उपक्रम
रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) ने १७ ऑक्टोबर २०२० रोजी ‘मेरी सहेली’ नावाचा एक संपूर्ण भारत उपक्रम सुरू केला. यामध्ये ट्रेनमध्ये चढण्यापासून उतरण्यापर्यंत महिला प्रवाशांचं संरक्षण केलं जातं .हा उपक्रम विशेषत: एकट्या महिला प्रवाशांना सुरक्षा प्रदान करण्यावर भर देतो.
एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना हे सहा नियम माहितच असायला हवेत
- महिला कॉन्स्टेबल सोबत असेल तरच तिला ट्रेनमधून उतरण्यास सांगितलं जाऊ शकतं.
- कलम १६२ नुसार १२ वर्षांखालील मुलांना महिलांच्या डब्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी आहे.
- महिला बोगीत प्रवेश करणाऱ्या कोणत्याही पुरुषाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
- भारतीय रेल्वे कायदा १९८९ च्या कलम ३११ अंतर्गत लष्करी कर्मचाऱ्यांना महिलांच्या डब्यात प्रवेश करण्यास मनाई आहे.
- लांब पल्ल्याच्या मेल/एक्स्प्रेस ट्रेनच्या स्लीपर क्लासमध्ये महिलांसाठी सहा बर्थ राखीव आहेत, तसेच गरीब रथ/राजधानी/दुरांतो/पूर्ण वातानुकूलित एक्स्प्रेस ट्रेनच्या थर्ड-टियर एसी (3AC) डब्यांमध्ये सहा बर्थ राखीव आहेत. हे आरक्षण वयाची पर्वा न करता किंवा एकट्याने किंवा गटात प्रवास करण्याऱ्यांसाठी आहे.
- भारतीय रेल्वेने सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्टेशन मॉनिटरिंग रूम स्थापित करून महिलांच्या सुरक्षिततेत सुधारणा केली आहे.