अॅमेझॉनचे संस्थापक सीईओ जेफ बेझोस यांची माजी पत्नी मॅकेन्झी स्कॉट पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. गेल्या वर्षी त्यांनी कंपनीचे ६.५३ कोटी शेअर्स विकले होते. २०१९ मध्ये मॅकेन्झी यांनी जेफ बेझोस यांच्याशी घटस्फोट घेतला. त्यावेळी मॅकेन्झीला सेटलमेंटमध्ये कंपनीचे ४ टक्के शेअर्स मिळाले होते. तेव्हा या शेअर्सची किंमत सुमारे ३६ अब्ज डॉलर्स होती घटस्फोटानंतर मॅकेन्झी एका झटक्यात जगातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या. मिळालेल्या माहितीनुसार मॅकेन्झी यांची एकूण संपत्ती ३७.६ अब्ज डॉलर आहे. त्या जगातील पाचव्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत.
हेही वाचा- घटस्फोटानंतर दोन मुलांचा साभाळ करत ४५ व्या वर्षी गॅरेजमधून सुरू केली कंपनी, कोण आहेत मीरा कुलकर्णी?
जेफ बेझोस व मॅकेन्झी स्कॉट यांची १९९२ साली पहिल्यांदा ओळख झाली. एका नोकरीच्या मुलाखतीदरम्यान दोघे भेटले होते. त्यानंतर एक वर्षाने म्हणजे १९९३ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या एक वर्षानंतर १९९४ मध्ये जेफ बेझोस यांनी ॲमेझॉन कंपनी सुरू केली. मॅकेन्झी ॲमेझॉनची पहिल्या कर्मचारी होत्या. सुरुवातीला ही कंपनी फक्त जुनी पुस्तके विकायची. त्यानंतर बेझोस यांनी जुलै १९९५ मध्ये ॲमेझॉनची बेबसाईट सुरु केली. त्यानंतर बेझोस यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. १९९७ च्या अखेरीस ॲमेझॉनचे १५० पेक्षा जास्त देशांमध्ये १.५ दशलक्षहून अधिक ग्राहक होते. आज ॲमेझॉनचा व्यवसाय जगभर पसरला आहे. ही जगातील पाचवी सर्वात मोठी कंपनी आहे. बाजारात या कंपनीची किंमत १ हजार ६४४ ट्रिलियन डॉलर आहे.
हेही वाचा- बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा?
लग्नाच्या २५ वर्षानंतर म्हणजे २०१९ मध्ये बेझोस आणि स्कॉट यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर स्कॉट बेझोसयांच्या संपत्तील अर्ध्या वाटेकरी बनल्या होत्या. वॉशिंग्टन कायद्यानुसार, लग्नानंतर मिळवलेली संपत्ती घटस्फोटाच्या वेळी पती-पत्नीमध्ये समान प्रमाणात विभागली जाते. या कायद्यानुसार मॅकेन्झी आज सुमारे १८४ बिलियन डॉलर्स संपत्तीच्या मालकीण बनल्या असत्या. मात्र, त्या कंपनीतील चार टक्के भागभांडवल घेऊन जेफ बेझोस यांच्यापासून वेगळ्या झाल्या.
बेझोस हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. घटस्फोटानंतर मॅकेन्झी यांनी ॲमेझॉनचे लाखो शेअर्स विकले आहेत. मॅकेन्झी या दानशूर व्यक्ती म्हणूनही ओळखल्या जातात. २०१९ मध्येच त्यांनी त्यांची अर्धी संपत्ती दान करण्याची घोषणा केली होती. आतापर्यंत त्यांनी विविध धर्मादाय कार्यांसाठी १,३८,०१५ कोटी रुपये दान केले आहेत. कोरोना काळात त्यांनी मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. तसेच, अनेक वेळा त्यांनी कोट्यावधी रुपयांच्या देणगीही दिल्या आहेत.
हेही वाचा- वडिलांना लहानपणीच गमावले, आई शेतावर मजूर; क्लास न लावता बनलेल्या IAS अधिकारीचा खडतर प्रवास पाहा..
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मॅकेन्झी यांच्याडे आलिशान घर आणि अनेक महागड्या गाड्या आहेत. २०१९ मध्ये, मॅकेन्झी यांनी गिव्हिंग प्लेजवर स्वाक्षरी केली होती. याचा अर्थ त्या आपली बहुतेक संपत्ती धर्मादाय कार्यासाठी दान करेल. गिव्हिंग प्लेज ही जगातील उच्चभ्रू आणि श्रीमंत कुटुंबांकडून तयार करण्यात आलेली वचनबद्धता आहे. यानुसार जगातील श्रीमंत व्यक्ती आपल्या संपत्तीतील काही वाटा समाजाच्या कल्याणासाठी दान स्वरुपात देतील. याची सुरुवात बिल गेट्स, मेलिंडा गेट्स आणि वॉरेन बफे यांनी २०१० मध्ये केली होती. ‘स्टार वॉर्स’ चित्रपटाचे निर्माते जॉर्ज लुकास यांच्यासह अनेक श्रीमंत लोकांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. मात्र जेफ बेझोस यांनी त्यावर अद्याप स्वाक्षरी केलेली नाही.