वृषाली पटवर्धन देशपांडे

सोलोट्रिपमध्ये सतर्कता आवश्यक आहे याचा अनुभव लगेचच आला. रिक्षावाल्याने थोडे जास्त पैसे घेतले, पण अमृतसरच्या छोट्या गल्ल्या, दुकानं, लोकल बाजार फिरले. व. पु. काळे म्हणतात तसं- ‘ज्याला काय मिळवायचं हे कळलं, त्याला कोणीच, कधीच फसवू शकत नाही.’ बसनं प्रवास केला. दिसणं, कपडे, बोलणं वेगळं यामुळे स्थानिकांचं लक्ष माझ्याकडे जात होतं. ते आस्थेनं चौकशी करत होते. फॉरेनर मुली एकटीनं प्रवास करत जग फिरतात, पण महाराष्ट्रातून कोणी मुलगी एकटीच प्रवास करत अमृतसरला आली आहे हे कळल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी काळजी व कौतुक यामुळे मला एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला. अनुभवांच्या गाठोड्यात मोलाची भर पडल्यानं आपण खूप काहीतरी भन्नाट केलंय हे जाणवलं.

‘‘ मी विमानामध्ये बसले आहे, मला घ्यायला ये…’ हा मेसेज माझी मैत्रिण राधिकाला (राधाला) करून मोबाईल बंद केला. माझ्या लेखी या प्रवासाचं मोल जरा अधिकच. कारण आयुष्यात प्रथमच स्वतःच स्वतःला दिलेल्या सुट्टीची ही सुरुवात झाली होती. विमानतळावर सामान घेऊन बाहेर आले तर राधा स्वागताला उभी होती.मोहालीमध्ये अजून गारवा होता… वातावरणातला, जागेतला बदल मनाला सुखावत होता. दुसऱ्याच दिवशी राधानं स्वयंपाकघराची यात्रा घडवली. साधा साखरेचा वेगळा डबा आणि त्याची बदललेली जागासुद्धा चहाला एक वेगळीच गोडी देऊन गेली. सकाळच्या कोवळ्या उन्हात गच्चीत उभं राहून ‘डी’ व्हिटामिन घेत, समोरच्या झाडावरचे पक्षी पाहात माझं पुढील काहीदिवस चाहापान सुरू होतं. ज्या शांततेसाठी मी येथे आले होते, ती मला पुरेपूर मिळत होती. राधाकडे येताना मी माझी स्केचिंग बुक, रंगीत पेन्सिली आणल्या होत्या. स्वतःसाठी वेळ काढायला नव्यानं शिकत होते…. फुला-पानांची, बागेत खेळणाऱ्या मुलांची ड्रॉइंग्स करू लागले. कवितांच्या पुस्तकांमध्ये रमत होते… राधाच्या गाण्याच्या रियाजात तल्लीन होणं माझा नित्य नियम झाला होता.

स्वतःसाठी सुट्टीवर गेले होते, पण वर्क फ्रॉम होम सुरूच होतं. ऑफिस आणि रोजची कामं करताना आनंद शोधत होते. गच्चीत कपडे वाळत घालताना वाऱ्यामुळे होणारी पानांची सळसळ मनात टिपत होते. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना गिरकी घेत होते. बालपणीचा निरागस आनंद आपण आता विसरलो आहोत, असंही वाटून गेलं जरा… पण तोच क्षण पुन्हा ओंजळीत घ्यावा असं वाटत होतं… घरकामाला येणारी किरण, सरदारजी काका यांच्यासोबत स्नेहाचा धागा नकळत जुळला. आपल्या विचारांना कोणी जज करणारं नसेल तर आपण खूप मोकळ्या गप्पा मारतो, स्वतःचेच मुखवटे टराटरा फाडतो याची जाणीव होत गेली. अशाच, विषय व वेळेचं बंधन नसलेल्या राधाच्या आणि माझ्या गप्पा रात्री दोन वाजेपर्यंत चालायच्या.
‘स्वतःला कुठल्याच गोष्टीत बांधायचं नाही’ हे माझं ब्रीदवाक्य आहे. पण आपण स्वतःच स्वतःला किती बांधलं आहे याची जाणीव मोकळं झाल्याशिवाय होत नाही. इथे रोजच माझा मला नव्याने शोध लागत होता. मोहाली-चंदीगड दर्शन, गुरुद्वारे, लंगर, खाऊगल्या ते लोकल बाजारापर्यंत मनसोक्त बागडलो. डलहौसी धरमशाला येथे ट्रीप केली. या ट्रिपमध्ये वारा, पाऊस, धुकं, बर्फ, झरे, नद्या, पानफुलं, तारे, डोंगर, पशुपक्षी अशी निसर्गाची सगळी रूपं दोन्ही हात पसरून आम्ही स्वतःमध्ये सामावून घेतली.

शेवटच्या वीकेंडला अमृतसरला जायचं ठरलं. पण राधाला अचानक काम आल्यानं अमृतसरची ट्रीप मी एकटीनंच करावी असं दोघींना वाटलं. थोडी धाकधूक वाटत होती, तरीही मी आत्मविश्वासानं आणि विचारपूर्वक जायचं ठरवलं. फक्त आईच्या पोटात आपण एकटे असतो. त्यानंतर सातत्याने आपला परिवार, मित्र-मैत्रिणी आपल्यासह असतात. एकटं फिरायला मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. अनेकदा सोलो ट्रिपचे प्लॅन मनातच ठेवले होते. त्यामुळे या चालून आलेल्या संधीचं सोनं करायचं ठरवलं.सोलोट्रिपमध्ये सतर्कता आवश्यक आहे याचा अनुभव लगेचच आला. रिक्षावाल्याने थोडे जास्त पैसे घेतले, पण अमृतसरच्या छोट्या गल्ल्या, दुकानं, लोकल बाजार फिरले. व. पु. काळे म्हणतात तसं- ‘ज्याला काय मिळवायचं हे कळलं, त्याला कोणीच, कधीच फसवू शकत नाही.’ बसनं प्रवास केला. दिसणं, कपडे, बोलणं वेगळं यामुळे स्थानिकांचं लक्ष माझ्याकडे जात होतं. ते आस्थेनं चौकशी करत होते. फॉरेनर मुली एकटीनं प्रवास करत जग फिरतात, पण महाराष्ट्रातून कोणी मुलगी एकटीच प्रवास करत अमृतसरला आली आहे हे कळल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी काळजी व कौतुक यामुळे मला एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला. अनुभवांच्या गाठोड्यात मोलाची भर पडल्यानं आपण खूप काहीतरी भन्नाट केलंय हे जाणवलं.

हा स्वल्प विसावा होता. सगळ्यांमध्ये असूनही एकटं राहण्यासाठी, स्वतःला बाहेरून आत पाहण्यासाठी, जाणिवा प्रगल्भ करण्यासाठी, स्वतःकडे आणि जगाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्यासाठी. अटारी बॉर्डरला सैन्याच्या घोषणांनी मुठी वळल्या. रात्री गोल्डन टेम्पलला शांतता अनुभवली. जालियनवाला बागेत, पार्टिशन म्युझियममध्ये डोळ्यांच्या कडा ओलावल्या. मी माणूस म्हणून अजून शिल्लक आहे याचं समाधान मिळालं. हा एकटीनं स्वतःसाठी केलेला प्रवास अंतर्मुख करून गेला. शारीरिक, मानसिक, भावनिक, मर्यादा पार करून केलेली ही सोलो ट्रिप माणूस म्हणून समृद्ध करणारी, समाधान देणारी, सजगतेकडून परिपक्वतेकडे नेणारी, खऱ्या अर्थाने माझं सीमोल्लंघन ठरली. सुधीर मोघे यांच्या ‘लहरेन मी, बहरेन मी… शिशिरातुंनी उगवेन मी’ सर गीताप्रमाणे माझी मनोवस्था झाली आहे.

vrushdesh@gmail.com