UPSC Success Story: एखादं स्वप्न पाहिलं की ते पूर्ण करण्यासाठी जिद्द, मेहनत, चिकाटी आणि खूप संयम असणे गरजेचं असतं. काही जण एकदा प्रयत्न करून हार मानतात, तर काही जण यशस्वी होण्याच्या मार्गावर कितीही संकटे आली तरीही चिकाटी, संयमाने यश प्राप्त करून स्वतःचे स्वप्न पूर्ण करतात. तर आज आपण अशाच एका तरुणीबद्दल जाणून घेणार आहोत. या तरुणीच्या घरची परिस्थिती बिकट असतानादेखील तिने पाच वेळा यूपीएससीची परीक्षा दिली आहे. सहाव्या प्रयत्नात ती यशस्वी झाली. चला तर जाणून घेऊया, सोलापूरच्या या खास तरुणीबद्दल…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वाती मोहन राठोड महाराष्ट्रातील सोलापूर या शहरातील रहिवासी आहे. स्वातीच्या कुटुंबात आई-बाबा आणि चार बहिणी आहेत. स्वातीचे आई-बाबा भाजीविक्रेते आहेत. घरात आर्थिक अडचणी असतानादेखील तिने स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याचे धाडस दाखवले. तिने सर्वप्रथम सरकारी शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने सोलापूरच्या वालचंद कॉलेजमध्ये भूगोल विषयात बॅचलर आणि पदव्युत्तर पदवी घेतली. तिच्या कॉलेजच्या दिवसांमध्येच पहिल्यांदा यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा देण्याचे तिने ठरवले.

हेही वाचा…चोरी, छेडछाड, लैंगिक छळाविरोधात ७१ टक्के महिलांचा तक्रार करण्यास नकार; कारण काय? अभ्यासातून ‘ही’ माहिती समोर

मात्र, स्वातीचा यशाचा मार्ग थोडा कठीण होता. कारण तिला यूपीएससी परीक्षेत पाच वेळा अपयश आलं. पण, प्रत्येक धक्क्याने तिचा निश्चय आणखीन मजबूत केला आणि पाच प्रयत्नांनंतर ती अखेर विजयी झाली. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या स्वातीच्या आईने आपल्या लेकीच्या शिक्षणासाठी सोनेही गहाण ठेवले होते. त्यानंतर २०२३ च्या स्पर्धात्मक यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत स्वातीने ४९२ वा क्रमांक पटकावला, तेव्हा कष्टाचे फळ तिच्या पदरात पडले.

आर्थिक परिस्थिती आणि आव्हानात्मक गोष्टींचा सामना करताना स्वाती तिच्या कुटुंबाचे चांगले भविष्य घडवण्याच्या तिच्या संकल्पावर ठाम राहिली. गरिबीला बळी न पडता तिने यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीत स्वतःला झोकून दिले आणि आई-वडिलांचा संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केला. तिचे यश ऐकून तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, ते तिच्यासाठी कोणत्याही कौतुकापेक्षा किंवा प्रसिद्धीपेक्षा जास्त मोलाचे होते. महाराष्ट्रातील सोलापूर येथील भाजीविक्रेत्याची लेकं स्वाती मोहन राठोडने पाच प्रयत्नांनंतर यूपीएससी सीएसई २०२३ मध्ये AIR-492 रँक मिळवला आणि ती सनदी अधिकारी (IAS) बनली आहे. आर्थिक अडचणींवर मात करण्याचा आणि समस्यांपेक्षा उपायांवर लक्ष केंद्रित करण्याचा तिचा प्रवास तिच्या पालकांसाठी व इतर विद्यार्थ्यांसाठी खूपच अभिमानास्पद आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra solapur swati mohan rathod daughter of a vegetable vendor achieved upsc cse after five attempts chdc asp