लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा, सुखाचा क्षण असतो. आणि तो आनंद कायम लक्षात राहावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. यामुळे साखरपुडा पार पडल्यापासूनच अनेकजण लग्न सोहळ्यासाठी प्लॅनिंग सुरू करतात. लग्न कार्यामुळे दोन्ही घरात आनंदाचं वातावरण असतं. यात मुलगी सासरी जाणार या विचाराने रडणारी आई, तर बहिणीच्या लग्नात कोणती साडी नेसू म्हणून मिरवणारी ताई, अशा अनेक कडू-गोड आठवणी होणारी नववधू अनुभवत असते. दागदागिने, पत्रिका, विवाहस्थळ, जेवणातील मेन्यू सगळ्या गोष्टींसाठी धावपळ सुरू होते. हे सगळं करताना नवऱ्या मुलीला स्वतःच्या दिसण्याकडेही लक्ष द्यायचं असतं. त्यासाठी तिची अतोनात मेहनत सुरू असते. त्यामुळे ती लग्न ठरल्यापासून जोरदार तयारीला सुरुवात करते. दागिने, चप्पला, साड्या खरेदीवर ती सर्वाधिक वेळ घालवते. मेकअपपासून फोटोग्राफरपर्यंत ती सगळीकडे जातीने लक्ष घालते. पण एवढं सगळं करूनही सगळा प्लान फिस्कटला तर? असाच काहीसा अनुभव सुनिषा आणि मोनिषला देखील आला. दोघांनी आपल्या लग्नासाठी स्वप्नांचे अनेक डोलारे उभे केले, मोठ-मोठी स्वप्न रंगवली, पण ऐन लग्न सोहळ्यात सगळ्या नियोजनावर पाणी पसरलं. या प्रसंगामुळे आता सुनिषावर ‘असा लग्नसोहळा नको गं बाई’ असं म्हणण्याची वेळ आली आहे.
मोनिष भारताबाहेर राहतो. त्यामुळे त्याला लग्नासाठी अधिकची सुट्टी काढणं शक्य नव्हतं. म्हणून दोघांच्या घरच्यांनीच लग्नाचं नियोजन केलं. मोनिष भारतात परतताच सातव्या दिवशी दोघांचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचे नियोजन मनाप्रमाणे झाले नाही. हॉल खूपच लहान पडल्याने अनेकांनी आम्हाला हॉलच्या बाहेरुनच शुभेच्छा दिल्या. या प्रसंगामुळे मोनिष आणि सुनिषाला खूप वाईट वाटले. यानंतर लग्नाचा हॉल तरी पुरेल की नाही अशी धाकधूक दोघांच्या मनात होती, शेवटी जे व्हायचे नव्हते तेच झाले. साखरपुड्याप्रमाणे लग्नाचा हॉलदेखील पाहुण्यांनी गच्च भरून गेला आणि अनेकांना उभं राहून हा लग्न सोहळा पाहावा लागला.
मुळात सुनिषाला कोर्ट मॅरेज करायचं होतं. परंतु, मोनिषच्या घरातील शेवटचे लग्नकार्य असल्याने त्याच्या घरच्यांनी दणक्यात बार उडवून लावण्याची इच्छा होती. तशी दोघांचीही आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य कुटुंबासारखीच. पण यात सुनिषाची मात्र कोंडी झाली. आर्थिक नियोजन आणि आई -वडिलांवर पडणारा आर्थिक भार लक्षात घेत थाटामाटात लग्न करण्यास तिने नकार दर्शवला. पण यावरून रोज तिचे मोनिषसोबत खटके उडू लागले. अखेर सुनिषाने घरच्यांना विश्वासात घेत अगदी मोजक्या पैशात लग्नाचे नियोजन केले. यात हॉल, सजावट, नावांचे पोस्टर, हार, नारळ, जेवण अशा अनेक गोष्टी दोघांनी बजेटमध्ये बसवल्या. ज्यासाठी सुनिषाला काकांच्या मुलाने मदत केली. यानंतर मेकअपसाठी तिने मोनिषच्या नात्यातील एकीला ऑर्डर दिली. तर फोटोग्राफीसाठीही दोघांनी एका ओळखीच्या मैत्रिणीला ऑर्डर दिली. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टी सेट झाल्या आणि हळदीच्या कार्यक्रमानंतर अखेर लग्नाचा तो दिवस उजाडला.
मेकअप आणि फोटोसाठी मोनिष आणि सुनिषाला ९ च्या ठोक्यावर हॉलमध्ये पोहचण्यास सांगण्यात आले होते. मात्र १० वाजले तरी दोघे काही पोहचले नव्हते. ज्यानंतर पुढच्या सर्व विधींना उशीर झाला. यामुळे सुनिषाच्या नातेवाईकांनी हॉल अक्षरशः डोक्यावर घेतला. एव्हाना सुनिषा तिच्या मामा – मामींसह हॉलवर पोहचली होती. सुनिषाची चेजिंग रुममध्ये एन्ट्री होत नाही तोवर काकांनी उशिरा आल्याबद्दल जाब विचारायला सुरुवात केली. यावेळी अगदी शिक्षणावरूनही तिला झापले. लग्नाच्या नाजूक क्षणीही कोणी उत्सवमूर्तीलाच बोल लावले तर डोळ्यांतून अश्रू येणारच. यानंतरही मेकअपसाठी वेळ लागल्याने सतत कोणीतरी येऊन दरवाजा ठोकवून जात होते. यामुळे मेकअप आणि साडी नेसू की नको अशी मनस्थिती झाली होती. अखेर अनेकांची बोलणी सहन करत एका तासात मेकअप अन् सर्व गेटअप रेडी झाला, तिचा तो मराठमोळा गेटअप सर्वांना आवडला. अखेर सुनिषा मस्त नऊवारी साडी आणि दागदागिन्यांनी नटून मंडपात पोहचली आणि अखेर लग्नाच्या विधींना सुरुवात झाली.
अनेकांची बोलणी खाऊन सुनिषाचा चेहरा काहीसा रडवेला झाला होता, तिची ही अवस्था पाहून तिच्या मैत्रिणी आणि बहिणी आज तरी काकांनी असं नव्हत ओरडलं पाहिजे असं दबक्या आवाजात कुजबुजल्या. हे संपत नाही तोवर तिच्या मेकअपने दगा देण्यास सुरुवात केली. फोटोग्राफर स्माइल दे, स्माइल दे म्हणत ओरडत होता पण तिला चेहऱ्यावर इतका घाम येत होता की तो आता पुसू कसा असा प्रश्न पडला. यात दिलेले सर्व टिश्यू घामाने भिजले. त्यामुळे ते पुन्हा वापरले तर चेहऱ्यावरचा मेकअप निघत होता.
यात मेकअप जोर लावून पुसू नकोस फक्त टिश्यूने टॅप कर असं मेकअपवालीने आधीच बजावले होते. त्यामुळे आता करायचे तर काय अशा प्रश्नात ती पडली, पण घाम खूपच दिसू लागल्याने कोणीतरी तिच्या हातात रुमाल आणून दिला, ज्यानंतर खऱ्या अर्थाने मेकअप होता नव्हता सगळा विस्कटला. मेकअपची पूरती वाट लागल्यानंतर फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी वाट पाहत होता. पैसे तर दोघांना दिले पण कोणाला कसा वेळ द्यायचा तिला समजेना. यात मेकअपच खराब झाला तर फोटो कसे चांगले येणार असंही तिच्या मनात येऊन गेले. पण विधी संपताच मेकअप आर्टिस्टने थोडाफार टचअप करून तो नीट केला आणि अशारितीने फोटोग्राफरने फोटो काढले. हे झालं लग्नाच्या विधीपर्यंत, खरी मज्जा तर पुढे आहे….
सुनिषानंतर भटजीने मोनिषच्या पुण्यवचनाच्या विधींना सुरुवात केली, या सगळ्या गडबडीत सुनिषाला आपल्या लग्नात आपला पती मोनिष कसा दिसतोय हेही नीट पाहता आले नाही. अशाप्रकारे घाईगडबडीत दोघांचे विधी आटोपले आणि लग्न पार पडले. लग्न लागल्यांतर लागलीच सगळे स्टेजवर भेट देण्यासाठी गर्दी करत होते. परंतु, रिसेप्शनच्या तयारीसाठी आम्ही दोघेही चेजिंग रुममध्ये गेलो. रिसेप्शनसाठी तिने आवडीने घेतलेला लाल शालू परिधान केला. त्यावर साजेसे दागिने घातले. मेकअप आर्टिस्टने लूकप्रमाणे मेकअप केला. निदान रिसेप्शनतरी मनाजोगं होईल, असं सुनिषाला वाटलं होतं. पण नाही. मेकअप करून रिसेप्शनला उभी राहताच तिच्या मेकअपने पुन्हा दगा दिला. चेहऱ्यावरील मेकअप निघू लागला. मेकअपच्या अक्षरशः पापड्या निघू लागल्या. मेकअप खराब होण्यामागे अनेक कारणं असतील, हॉलमधील वातावरण थंड नसेल, स्कीन खराब असेल किंवा घाई-घाईत मेकअप झाल्याने असेल. पण ही परिस्थिती मेकअप आर्टिस्टने हँडल करणं गरजेचे होते.
या प्रकारामुळे स्वतःच्याच लग्नमंडपात सुनिषा आणि मोनिष खजिल झाले. यावेळी तिच्या मैत्रिणी आणि मोनिषच्या भाचींनी काही डान्स करुन उपस्थित पाहुण्यांना थोडे खिळवून ठेवले. यानंतर सुनिषा पुन्हा मेकअपला टचअप करुन स्टेजवर रिसप्शनसाठी उभी राहिली. पण मेकअप सतत व्हायचा तो खराब होतच राहिला. अशावेळी चारचौघांत आपली फजिती होतेय असं दोघांना वाटू लागलं.
सुनिषाचा मेकअप करुनही खराब दिसणार चेहरा आणि त्यामुळे तिची झालेली अस्वथता पाहून तिच्या मैत्रीणींनी तिला पुन्हा मेकअप रुममध्ये घेऊन गेल्या. तिच्या चेहऱ्यावरचा सगळा मेकअप काढला आणि हलकासा टचअप करून तिला पुन्हा तयार केलं. यात आधीच लग्नाला उशीर झाल्याने अनेक नातेवाईक वाट बघून निघून गेले, पण पुन्हा मेकअप चढल्यावर नववधू आणि वराचे फोटो काढण्यासाठी स्टेजवर पोहोचले. यावेळी बहुतेक हॉल रिकामी झाला. याच खराब चेहऱ्यावर तिचे रिसेप्शनचे फोटो काढले गेले. जे अजिबात न आवडणारे होते. एकीकडे लग्नाचा आनंद आणि दुसरीकडे मनासारख्या गोष्टी न झाल्याने काहीसे निराश आणि काहीश्या आनंदी वातावरणात तिची वरातही निघाली. अशापद्धतीने हा सोहळा पार पडला. मेकअपने वाट लावलेली असताना निदान फोटो तरी चांगले आले असतील असं या नवदाम्पत्याला वाटत होतं. पण कसलं काय? फोटोंतूनही त्यांच्या चेहऱ्यावरील तणावग्रस्त भाव अधिक दिसत होते. एकाही फोटोत नववधूचा हसरा-लाजरा चेहरा दिसत नव्हता. तसेच फोटोग्राफीसाठी आलेल्यााही अनेक फोटो काढायचे म्हणून काढले असेल दिसले. लग्नात मेकअपची वाट लागलीच पण त्यानंतरही अनेक दिवस चेहऱ्याचीही पुरती वाट लागलेली दिसली, अनेक दिवस तिचा चेहरा खूप काळपट दिसत होता, त्यामुळे स्वतःच्याच लग्नात चहूबाजूंनी झालेली ही फजिती पाहून सुनिषा सहज म्हणाली, असा सोहळा नको गं बाई!
एकूणच तिला आलेल्या या अनुभवावरुन तरी असेच सांगणे आहे, लग्नाच्या वेळेच्या तीन तास आधी हॉलवर पोहोचा, तुमच्या लग्नाच्या आठवणी तुम्हाला खूप मोमोरेबल बनवायच्या असतील तर तुमचे अधिकचे पैसे गेले तरी चालतीच चांगली मेकअप आर्टिस निवडा. लग्नाच्या काही महिने आधी तिच्याकडून काही ब्राइडल ब्यूटी टिप्स घ्या. याशिवाय लग्नाआधी तुमच्या स्कीन टोनची माहिती मेकअप आर्टिस्टला द्या आणि त्याप्रमाणे तुम्ही तिला मेकअप करा असे सांगा, यासाठी लग्नाच्या काही दिवस आधी तुम्ही तिच्याकडून मेकअपचा डेमो घेऊ शकता. सरसकट कमीमध्ये होतय म्हणून ओळखीमध्ये कोणालाही मेकअपची ऑर्डर देण्याची चुक करु नका. जर तुम्हाला खात्री असेल तुम्ही तिचे काम बघितले असेल तरचं ऑर्डर द्या, विशेषत: अनेक वर्षे लग्नासाठी नवरीचा मेकअप करण्याचा अनुभव ब्युटीशियनला ऑर्डर द्या, अन्यथा तुमचा चेहरा खूप खराब होऊ शकतो.
याशिवाय फोटोग्राफीच्या बाबतीतही तेच आहे, तुमच्या बजेटनुसार फोटोग्राफर निवडताना काळजी घ्या, ओळखीमध्ये जरी तुम्ही लग्नाच्या फोटोंची ऑर्डर देणार असाल तरी त्याकडून अल्बमशिवाय आणखी कोणत्या गोष्टी मिळणार, अब्लमचा रंग कसा असणार याची सर्व सविस्तर माहिती लग्नाआधीच घ्या. तसेच पेनड्रायव्ह किंवा हार्डडिक्स तुम्ही द्याची की ते देणार हे विचारा, नाहीतर एवढा खर्च करुन त्याच तुमचे आणखी हजार दोन हजार रुपये जातील. याशिवाय पेमेंटच्या गोष्टी आधीच क्लिअर करा, अन्यथा अनेकदा यामुळे गैरसमज होतात आणि सर्व पैसे आधीच देऊन फसल्यासारखे होऊ शकते. याशिवाय तुम्हाला कोणत्या पद्धतीने फोटो पाहिजेत याची फोटोग्राफरला कल्पना द्या, अन्यथा लग्नानंतर आलेले फोटो पाहून तुम्हाला पश्चाताप सहन करावा लागू शकतो. अशापद्धतीने काळजी घेतल्यास तुम्ही तुमच्या लग्नाचा आनंद घेऊ शकता.
(या लेखातून कोणत्याही फोटोग्राफर किंवा मेकअप आर्टिस्टला दुखावण्याचा उद्देश नाही, पण लेखिकेला तिला जो अनुभव आला तो सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी असावी.)