अनघा सावंत
‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला,’ या शुभकामना देत परस्परांतलं प्रेम, जिव्हाळा वृद्धिंगत करण्याचा सण म्हणजे मकर संक्रांत. इंग्रजी नववर्षातला हा पहिलाच सण. तमाम महिला वर्ग याची आतुरतेनं वाट पाहतो. खरंतर संक्रांत म्हणजे एकप्रकारे निसर्गाचा उत्सव. पौष महिन्यात येणारा शेतीशी संबंधित आगळंवेगळं महत्त्व असणारा हा सण. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी, संक्रांत, किंक्रात ते रथसप्तमी असा हा जणू आनंददायी सोहळाच!
संक्रांत येते थंडीच्या दिवसात. या दिवसांत बाजारात सर्वत्र हरभरे, वांगी, पावटा, गाजर, घेवडा, तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, यांचा आलेला रंगीबेरंगी बहर नजरेला सुखावणारा असतो. त्यामुळे संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या भोगीला ‘भोगीच्या भाजी’चं महत्त्व अनन्यसाधारण असतं. भोगीच्या दिवशी या भाजीला जी विशिष्ट चव येते, ती पुढे वर्षभर कधीही अशी एकत्रित भाजी केली तरी येत नाही, हे मात्र अगदी खरं!
हेही वाचा >>>मुलांच्या मनात अभ्यासाविषयी प्रेम कसं निर्माण करायचं? ‘या’ सोप्या ट्रीक्सने लागेल अभ्यासाची गोडी
महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतानुसार भोगीची भाजी करण्याच्या पध्दतीही वेगळ्या आहेत. काही ठिकाणी भोगीच्या भाजीला ‘पंचमेळी भाजी’, काही ठिकाणी ‘लेकुरवाळी भाजी’, काही ठिकाणी ‘खेंगाट’ असंही म्हणतात. कोकणात अनेक ठिकाणी पावटा, पापडी, घेवडा, वांगी, हरभरे, ओला वाटाणा (सोलाणे), बटाटा, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, या सगळ्या भाज्या एकत्रित करून कांद्याच्या फोडणीवर परतून, लाल तिखटाची, कांद्याखोबऱ्याचं वाटण लावलेली थपथपीत, रसाळ भाजी केली जाते. जोडीला तीळ लावलेल्या बाजरीची भाकरी असा बेत असतो. या भाजी-भाकरीची लज्जतच न्यारी असते. देशावर मात्र या सगळ्या भाज्या एकत्रित करून वाफवून घेतल्या जातात आणि कांद्यावर काळ्या तिळाचं कूट, लाल तिखट, हळद घालून, त्यात वाफवलेल्या भाज्या घालून चांगल्या परतून सुकी भाजी केली जाते. इथेही जोडीला भरपूर तीळ घातलेली बाजरीची भाकरी!
आरोग्यासाठी हितावह असलेल्या या भाजीविषयी आहारतज्ञ डॉ. लीना पेडणेकर सांगतात, “या हंगामी भाज्या असल्यामुळे पचनशक्तीसाठी अतिशय चांगल्या असतात. या भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वं, खनिजं आणि भरपूर तंतूमय पदार्थ असतात. त्यामुळे हा भाजीपाला पचनासाठी चांगला असून पोट साफ करण्यासही मदत करतो. तसंच लहानपणापासूनच आपण ही भोगीची खास भाजी खात आलो आहोत, त्यामुळे तिच्याशी एकप्रकारे भावनिकतेनंही जोडले गेलो आहोत.”
भोगी या दिवसाचं महत्त्व आणि ‘जो न खाई भोगी तो सदा रोगी’ ही म्हण आपल्या ऐकीवात असेल. भोगीची भाजी म्हणजे ‘विविधतेतून एकता’ याचं जणू प्रतीकच!
भोगीच्या दुसऱ्या दिवशी येणारी मकर संक्रांत म्हणजे महाराष्ट्रातल्या महिला वर्गाचा आवडता सण असतो. एकमेकांविषयीची कटुता, मतभेद विसरून, नात्यात तिळगुळाप्रमाणे मधुरता यावी या भावनेनं, अतिशय उत्साहात साजरा करण्यात येणारा हा विशेष सण. या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचं खास महत्त्व, तसंच दानाचं महत्त्वही अनन्यसाधारण.
हेही वाचा >>>परिस्थितीला न डगमगता बांधकाम कामगाराची लेक ‘एस अस्वथी’ झाली IAS, वाचा प्रेरणादायी गोष्ट
मकरसंक्रांतीच्या सणाचा महत्त्वाचा भाग म्हणजे हळदीकुंकू समारंभ! कुंकू हे पारंपरिकरित्या मंगलतेचं प्रतीक मानलं गेलं आहे आणि प्रत्येक स्त्रीचा जन्मतःच त्यावर हक्क आहे. मात्र हळदीकुंकू म्हटलं, की मकरसंक्रांतीला तो मान फक्त सुवासिनींचाच, ही आपल्याकडे वर्षांनुवर्षं चालत आलेली प्रथा. हळूहळू समाजाच्या या मानसिकतेत बदल होत असला, तरी आजही काही ठिकाणी हळदीकुंकवासारख्या कार्यक्रमात विधवांना, एकल स्त्रियांना पटकन स्वीकारलं जात नाही. वैधव्य येणं वा एकल असणं, यात स्त्रीचा दोष का मानावा?… हे आपण जाणतो. केवळ विधवा आहे म्हणून मुळातच स्त्रीवर अनेक बंधनं कळत-नकळत लादली जातात. खूप विधवांना सन्मानानं जगण्याचा अधिकार नाकारला जातो. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही प्रथा बदलायला वेळ लागत असला, तरी आता हळूहळू मानसिकता बदलताना दिसतेय. मात्र बदल पूर्णपणे घडवायचा असेल, तर प्रत्येकीनं स्वतःपासून सुरुवात करणं आवश्यक आहे. विधवा-सधवा असा भेदभाव न करता स्त्रीचा, तिच्या कर्तृत्वाचा सन्मान करणं, तिच्या भावनांची कदर करणं हा दृष्टिकोन ठेवून हे कार्यक्रम साजरे व्हायला हवेत. हळदीकुंकू समारंभ म्हटलं, की त्याचा संबंध ‘सुवासिनी’, ‘सवाष्ण- म्हणजे पती असलेली स्त्री’, असा जोडला न जाता स्त्रियांसाठी हेवेदावे, भेदभाव विसरून केवळ आनंद वाटण्याचा दिवस म्हणून हा सण साजरा झाला पाहिजे असं वाटतं.
sawant1971a@gmail.com