आजपर्यंत आपण रोमिओ-ज्युलिएट, हीर-रांझा यांच्यासारख्या प्रेमवीरांच्या अनेक कथा आणि किस्से ऐकले असतील. प्रेमासाठी कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीवर पाणी सोडल्याच्या कथा आपण कित्येक चित्रपटांतून बघितल्या असतील. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेबद्दल सांगणार आहोत; जिने आपल्या प्रियकरासाठी वडिलांच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीवर लाथ मारली. एवढंच नाही, तर तिने प्रियकराशी लग्न करण्यासाठी आपल्या ऐषारामी जीवनाचाही त्याग केला. अँजेलिन फ्रान्सिस, असे त्या महिलेचे नाव आहे.
अँजेलिन ही मलेशियातील बिझनेस टायकून खू के पेंग व माजी मिस मलेशिया पॉलीन चाय यांची मुलगी आहे. खू के पेंग हे मलायन युनायटेड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आहेत. ही मलेशियाची टॉप लाइफस्टाईल फर्म आहे आणि यूकेची प्रसिद्ध जीवनशैली ब्रॅण्ड लॉरा अॅशलेमध्ये या फर्मचा हिस्सा आहे. खू के पेंग मलेशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. पेंग यांना पाच मुले आहेत. अँजेलिनच्या वडिलांची एकूण ३०० दशलक्ष डॉलरची संपत्ती आहे. भारतीय रुपयांनुसार या संपत्तीची किंमत दोन हजार ४८४ कोटी रुपये आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकताना २००८ साली अँजेलिनची जेदेडियाशी पहिल्यांदा भेट झाली. पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. काही काळानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेडेदिया कॅरेबियन असून, व्यवसायाने तो डेटा सायंटिस्ट आहे. अँजेलिनने तिच्या घरी आपल्या प्रेमाबद्दल कल्पना दिली. मात्र, दोघांच्या या नात्याला अँजेलिनच्या घरून कडाडून विरोध होता.
हेही वाचा- वडिलांची साथ अन् मुलगी पहिल्याच प्रयत्नात झाली IAS; कोण आहेत स्वाती मीना? जाणून घ्या खास कहाणी
अँजेलिनाच्या वडिलांनी तिच्यासमोर संपत्ती किंवा प्रियकर यांच्यापैकी एकाचीच निवड करण्याची अट घातली. अखेर अँजेलिनने जेदेडियाची निवड केली आणि प्रेमाखातर तिने वडिलांच्या कोट्यवधींच्या संपत्तीला लाथ मारली. केंब्रिजच्या पेम्ब्रोक कॉलेजच्या चर्चमध्ये अँजेलिन व जेदेडियाचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नात केवळ २,७०० डॉलर्स खर्च करण्यात आले होते आणि या लग्नाला फक्त ३० पाहुणे उपस्थित होते; परंतु त्यामध्ये अँजेलिनच्या कुटुंबातील कोणीही नव्हते.