मुली म्हणजे यांना खेळ वाटतो का? या वाक्यानेच मला नेहमी भेटणाऱ्या आणि माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीने माझ्याशी संवाद साधायला सुरुवात केली. तिच्या चेहऱ्यावरील संताप मला दिसत होता. पण नेमकं काय घडलं? हेच मला कळेना. मी पुढे विचारताच तिने सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली, गावी बसने चिपळूणला निघाले होते. उत्सव असल्यामुळे आई-बाबा, भावंड गावी आधीच पोहोचले होते. कामानिमित्त मी अडकले होते हे तुला माहितच आहे. एकटीच बसने जायची माझी ही पहिलीच वेळ नव्हे. परेलवरून आमची बस निघाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रात्रीचा प्रवास… बरं बसमध्ये बऱ्यापैकी प्रवासी होते. मी या प्रवासाचा आनंद घेत होते. दिवसभर ऑफिसच्या कामामुळे थकलेली मी या प्रवासाचा अधिक आनंद घेऊ शकले नाही. कारण मला झोप काही आवरत नव्हती. माझ्या शेजारीही बसायला कोणी नव्हतं. त्यामुळे जागाही ऐसपैस मिळाली. पेणपर्यंत पोहोचले आणि तेव्हा मात्र मला झोप अनावरच झाली.

खिडकीच्या बाजूला हातात असलेली बॅग ठेवून आरामात सीटवरच डोकं टेकवलं आणि मला झोप कधी लागली हे कळलंच नाही. मी झोपेतच असताना कोणीतरी स्पर्श केल्याचं मला जाणवलं आणि मला लगेचच जाग आली. सेकंदामध्ये नक्की काय घडलं मला कळलं नाही? मी इकडे तिकडे पाहिलं कोणीच नव्हतं. नंतर सीटच्या मागे वळून पाहिलं. एक व्यक्ती बसली होती. साधारण पन्नाशीतली असावी. मी त्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर त्याने खिडकीकडे मानच फिरवली.

आणखी वाचा – वयाच्या ३१व्या वर्षी नशिबाने माझा नवरा हिरावून नेला पण…

चांगला व वाईट स्पर्श आपल्याला मुलींना लगेचच कळतो. तरीही चुकून काहीतरी झालं असावं असं मी मलाच समजावलं. पण यावेळी मात्र माझी झोप चांगलीच उडाली. साधारण रात्रीचे तीन वाजले असावेत. मला काही केल्या झोप येईना. अस्वस्थ वाटत होतं. १० ते १५ मिनिटं गेली असतील. त्या पन्नाशीतल्या राक्षसाने होय राक्षसानेच चक्क माझ्या मानेला स्पर्श केला. मी रागाने पाठी वळून पाहिल्यावर म्हणतो कसा सॉरी ताई ब्रेक लागल्यामुळे माझा तोल गेला. मी मोठ्या आवाजातच त्याला म्हटलं जरा नीट बसा म्हणजे तोल जाणार नाही…

प्रवास सुरूच होता. काही वेळाने पुन्हा त्याने मला स्पर्श करत तेच कृत्य केलं. मग मात्र मी संतापले. महत्त्वाचं म्हणजे त्याक्षणी न घाबरता सीटवरून उठले आणि म्हणाले तुमच्या घरी आया-बहिणी नाहीत का? त्यावर तो म्हणाला, ताई मी तर शांत बसलो आहे. मी कुठे काय केलं? मग माझा पारा आणखीनच चढला. तोंड बंद करा वयाचा मान ठेवून मी अरे-तुरे करत नाही नाहीतर… इतक्यातच माझा आवाज चढलेला आहे हे ऐकताच बसमधील कंडक्टर काका आणि इतर मंडळी जागेवरून उठले. काय झालं म्हणून कंडक्टर काकांनी माझ्या जवळ येत मला विचारलं. मी घडलेला सगळा प्रकार सांगितला.

आणखी वाचा – वयाच्या तिशीमध्ये नवरा मी गमावला, पण तुम्ही मात्र…

मी सगळं सांगताच त्या माणसाची अरेरावी सुरू झाली. तुम्ही तुमचं काम करा असं उलट कंडक्टर व बसमधील इतर मंडळींना तो बोलू लागला. त्याचा वाढता आवाज व बोलण्याची पद्धत पाहता चक्क कंडक्टर काकांनी बस थांबवायला सांगितली आणि त्याला रस्त्यातच गाडीमधून खाली उतरवलं. मी हिंमत करून आवाज उठवला खरा पण कंडक्टर काकांनी त्याला योग्य ती शिक्षा दिली. त्याचक्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझ्यासाठी त्यावेळी कंडक्टर काका म्हणजे देव होते. म्हणूनच माझा पुढचा प्रवास सुरक्षित झाला.

माझ्या मैत्रिणीबरोबर जे घडलं ते इतर मुलींबरोबरही प्रवासादरम्यान अनेकदा घडत असावं. पण त्याविरूद्ध आवाज उठवण्याची ताकद व हिंमत ही प्रत्येक मुलीमध्ये असायला हवी. शिवाय कंडक्टर काकांसारखीही माणसं आजूबाजूला हवीत. मुलींना स्पर्श करून या राक्षसांना कोणतं सुख मिळतं हे माहीत नाही. पण अशी राक्षसी वृत्तीची लोकं बरीच आहेत. ठाण्यामध्ये एका शाळकरी मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न रिक्षावाल्याने केला ही ताजी घटना आपल्यासमोर आहेच. शिवाय दिवसेंदिवस मुलींची छेड काढणं, विनयभंग ही प्रकरणं सुरुच आहेत. पण अशा हैवानांना वेळोवेळी शिक्षा ही मिळालीच पाहिजे. तसेच मुलींनीही अधिक हिंमत दाखवून अशा राक्षसांना धडा शिकवला पाहिजे हाच एकमेव उद्देश…