सायंकाळी फावल्या वेळात सहज फेसबुक पाहात बसले होते. फीड स्क्रोल करत असताना अमृता प्रितम यांचं एक अवतरण (quote)  समोर आलं. ते वाक्य होतं “आजही भारतीय पुरूषांना महिलांना परंपरागत कामं करताना पाहण्याची सवय आहे. त्यांना हुशार मुली आयुष्यात हव्या असतात, पण पत्नीच्या रुपात नाही.” हे वाक्य वाचलं आणि डोक्यात विचारांचं काहूर सुरू झालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमृता प्रितम यांचं निधन २००५ साली झालं. अर्थात, त्यापूर्वीचं कधीचंतरी हे वाक्य असणार… म्हणजे किमान दोन दशकांपूर्वी; पण ते आजही तंतोतंत लागू पडतंय. इतकी वर्ष झालीत, पण पुरुषांची मानसिकता बदललेली नाही. अर्थात सर्वच पुरुष या मानसिकतेचे आहेत, असं मला म्हणायचं नाही. पण, पत्नी कशी असावी याबाबत संकुचित विचार करणाऱ्या पुरुषांचं प्रमाण तुलनेनं खूपच जास्त आहे. याचाच विचार करत असताना माझ्या आजुबाजूला, परिचयात घडलेले काही प्रसंग आठवले. त्यातलाच हा एक… 

हेही वाचा – “आम्ही पुरुषांमध्ये बोलत नाही”, हे जेव्हा एक महिलाच दुसरीला सांगते तेव्हा…

वय वर्ष २७ असलेली माझी एक मैत्रीण आहे. अर्थात लग्नाचं वय झालंय. घरचे तिच्या लग्नासाठी आता मुलगा शोधत आहेत. ती उच्चशिक्षीत आहे आणि नोकरी करते. लग्नासाठी नातेवाईकांनी काही स्थळ सुचवली आणि त्यातली काही मुलं पाहायलाही येऊन गेली. त्यातल्या बहुसंख्य मुलांनी उच्च शिक्षणाचं कारण देऊन नकार दिला. यामध्ये महिन्याला अगदी लाखभर पगार असलेल्या इंजिनिअरपासून ते विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या प्राध्यापकांचाही समावेश होता. शिक्षण जास्त आहे, स्वतंत्रपणे विचार करते, स्वतःचं मत ठामपणे मांडते, हुशार आहे, निर्भिड आहे म्हणून तिला नकार दिला. एका ‘सो कॉल्ड’ उच्चशिक्षित मुलानं तर तुमची मुलगी फार आगाऊ आहे, आमच्या घरात असं चालणार नाही, असं म्हणत नकार दिला.

एकदा बर्थ कंट्रोल गोळी घेतल्यावर भविष्यातही बाळ होऊ शकत नाही का? वंध्यत्वाविषयी काय सांगतात तज्ज्ञ, पाहा

आता अशी काहीतरी फुटकळ कारणं देऊन मुलीला नकार देणाऱ्या याच मुलांच्या मैत्रिणी मात्र बोल्ड, बिंदास, चांगली नोकरी करणाऱ्या असतात. जेव्हा लग्न करण्यासाठी मुलगी निवडायची असते, तेव्हा मात्र ती परंपरागत कामं करणारी, घर सांभाळणारी, कमी बोलणारी असावी, अशी अपेक्षा असते. थोडक्यात काय तर मैत्रीण म्हणून बुद्धिमान आणि मोकळ्या विचारांची मुलगी आम्हाला चालते पण बायको म्हणून नाही!

जर मैत्रीण अशी चालत असेल तर बायको म्हणून का नाही? हा दुटप्पीपणा कशासाठी?  मुलापेक्षा मुलगी जास्त हुशार आहे, हे पचवणं किंवा स्वीकारणं आजच्या काळातही इतकं अवघड आहे का?

बळ आणि प्रेम देणारे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणीही!

मुलीला तिच्या शिक्षणापासून ते अगदी तिच्या वागण्या-बोलण्यावरून उच्चशिक्षित मुलांकडून जज केलं जात असेल तर कमी शिक्षण असणाऱ्या मंडळींकडून अपेक्षाच काय करणार? उद्या याच कारणांमुळे जर तुमच्या मैत्रीणीला किंवा बहिणीला एखाद्या पुरुषाने नकार दिला तर? मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव न करता मुलीचे पालक जर तिला उच्च शिक्षण देऊ शकतात, तर त्यांच्यापेक्षा पुढारलेली पिढी म्हणून तुम्हाला ते स्वीकारणं इतकं जड का जातं? उच्चशिक्षित आहे म्हणून तिला नाकारणं सोपं वाटत असेल तर तुम्ही तिच्या पगाराइतका खर्च तिच्यावर कराल का? महत्त्वाचं म्हणजे ती जितकं कमवते त्यातून मदत तर तुम्हालाच होते ना? तरीही जर स्वीकार करणं शक्य होत नसेल, तर पुरुषांनी खरंच विचार करण्याची गरज आहे. कारण जोपर्यंत पुरुष आपला ‘पुरुषी अहंकार’ बाजुला ठेवून मुलींचं यश किंवा तिचं एखाद्या गोष्टीत आपल्यापेक्षा हुशार असणं स्वीकारणार नाहीत, तोपर्यंत बदल घडणार नाहीत, एवढं मात्र नक्की!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man wants open minded working girl as friend but not wife in progressive society hrc