एरवी सणवार म्हटलं, की महिला वर्गाच्या मनात धास्ती असते. अधिकची विविध कामं उरकण्यासाठी यंत्रवत चालणारे हात, जमलेल्या नातेवाईकांच्या ‘कानगोष्टीं’ना वैतागलेले कान, अशी अनुभूती सर्वसाधारणपणे स्त्रिया घेतात. मात्र या धावपळीत श्रावणातल्या मंगळागौरीचं बोलावणं यावं, यासाठी पुष्कळ स्त्रिया आसुसलेल्या असतात. नवविवाहिता आणि इतरही अनेक महिलांसाठी आजही मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटानं मंगळागौरीस अधोरेखित करून स्त्रियांच्या मनातला त्याबद्दलचा उत्साह द्विगुणित केलाय. बहुतेक स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मंगळागौरीच्या भोवती आता भक्कम आर्थिक संधी उभ्या राहिल्या आहेत.
मंगळागौर खेळणाऱ्या गटांमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांसाठी हे औचित्य म्हणजे एक चांगली व्यवसाय संधी झाली असून अशा अनेक ग्रुप्सनी वर्षभर विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करत ती संधी व्यापक केली आहे. मंगळागौरीसाठी ब्यूटी पार्लर्सकडून देण्यात येणारी ‘पॅकेजेस’ आणि मंगळागौरीत आपल्या आवडत्या अभिनेत्रीप्रमाणे दिसण्यासाठी साड्या-दागिन्यांच्या खरेदीस सध्या आलेला भर, याचाही मंगळागौरीच्या आर्थिक बाजूत समावेश आहे.
श्रावण म्हटला, की हिरव्यागार रंगाने नटलेला निसर्ग आणि ऊनपावसाचा खेळ! या उत्साहाच्या वातावरणात मंगळागौरीचे खेळ वेगळाच रंग भरतात. आजूबाजूला, वसाहत परिसरात नुकत्या लग्न झालेल्या कुटुंबातून किंवा अगदी दूरच्या नात्यातूनही यंदा मंगळागौरीचे आमंत्रण यावं, यासाठी पुष्कळ महिलांचे कान आतुर असतात. खरंतर मंगळागौर हे एक निमित्त असतं, सगळ्यांनी एकत्र येण्याचं, गप्पागोष्टी करत मन मोकळं करण्याचं. गेल्या काही वर्षांत मंगळागौर खेळणाऱ्या गटांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्यात येणाऱ्या खेळांमुळे हे कार्यक्रम अधिक रंजक होऊ लागले आहेत.
हेही वाचा… आहारवेद: पचनशक्तीवर्धक बडीशेप
‘हिरकणी’ ग्रृपच्या मृणाल कुलकर्णी सांगतात, “आमच्या ग्रुपमध्ये १० हून अधिक सख्या आहेत. श्रावणाच्या आधी महिनाभरापासून दररोज खेळांचा सराव होतो. या वेळेस अनेकींकडून आम्हाला मंगळागौरीचे खेळ शिकवा, अशीही मागणी झाली. यामुळे २० वर्षांच्या मुलींपासून ६५ वर्षांच्या आजींपर्यंत अनेकींनी मंगळागौरीच्या खेळांचा आमच्याबरोबर सराव केला. नंतर त्यांना आपापल्या घरातील मंगळागौरीत ते खेळ खेळून दाखवायचे होते.” ही कार्यशाळा आणि ग्रुपची प्रॅक्टीस हे दोन्ही सांभाळणं आव्हानात्मक असतं, असं मृणाल सांगतात. यंदा मागच्या वर्षीपेक्षा खेळांसाठी मागणी खूप असून दिवसाला दोन खेळ (दोन कार्यक्रमांत सादरीकरण) केलं जात आहे. तसंच त्यांच्या गटास नाशिकसह अन्य ठिकाणीही खेळांसाठी बोलावणं येत आहे.
पद्मावती घोडके यांनी सांगितलं, “मंगळागौर खेळाचे कार्यक्रम आम्ही खूप वर्षांपासून करत आहोत. आमच्यात काही गृहिणी आहेत, तर काही हौस म्हणून यात सहभागी झालेत. खेळ खेळताना पारंपरिक पद्धतीनं खेळांच्या सादरीकरणाकडे आमचा भर असतो. त्यामध्ये फुगड्यांचे वेगवेगळे प्रकार, होडी, ‘अटुश पान बाई अटुश’, असे वेगवेगळे प्रकार आम्ही खेळतो.”
खरंतर आपल्याकडे मंगळागौर ठरल्यावर त्यासाठीच्या खेळांची तयारी, महिलांची जमवाजमव ही एकप्रकारे डोकेदुखी असते. पण हल्ली अनेक सामान्यजनांचाही कल मंगळागौरीचे खेळ सादर करण्यासाठी व्यावसायिक ग्रुप्सना बोलावण्याकडे आहे.
‘जिज्ञासा मंगळा गौरी’ गटाच्या पूर्वा कुलकर्णी सांगतात, “बायकांनी स्वत:साठी किंवा स्वत:च्या छंदांसाठी वेळ काढणं म्हणजे घोर पाप, असं मानणारेही काही जण समाजात आहेत. आमच्या ग्रुपमध्ये सर्व महिला ३२ ते ४० वयोगटातल्या आहेत. त्या नोकरी-व्यवसाय, घरातील जबाबदाऱ्या सांभाळत मंगळागौरीच्या खेळ सादरीकरणात आनंदानं सहभागी होता. १२ वर्षांपासून आमचा ग्रुप सक्रिय आहे. माझ्या मंगळागौरीपासूनच मला स्वत:चा एक ग्रुप असावा असं वाटत होतं. सासूबाईंनी आणि घरातील अन्य सदस्यांनी साथ दिली व ग्रुप सुरू झाला. यामध्ये पहिल्या वर्षी प्रत्येकीनं आपल्याकडे असलेली नऊवार साडी, नसेल तर दुसऱ्या कोणाची मागून आणत मंगळागौरीचे खेळ केले. पहिल्या वर्षी आम्ही केवळ दोन हजार रुपये मानधन घेतलं. आता मानधनाचा आकडा वाढला आहे. ग्रुपमधील महिलांमध्ये प्रत्येक खेळाचे मानधन समप्रमाणात आम्ही वाटून घेतो. आज ग्रुपकडे स्वत:ची ध्वनी यंत्रणा, मंगळागौर खेळांचं साहित्य आहे.”
हेही वाचा… कंपन्यांच्या CEO पदावर पुरुषांची मक्तेदारी? महिला अधिकाऱ्यांची संख्या घटली; नेमकं कारण काय?
मंगळागौरीच्या भोवतालच्या आर्थिक बाजूचा आणखी एक भाग म्हणजे ब्यूटी पार्लर्सवर या निमित्तानं केला जाणारा खर्च! आपण सगळ्याजणींत उठून दिसावं यासाठी सध्या सासू-सुना, जावा-नणंदा एकाच्या जोडीनं एक अशा ब्यूटी पार्लरमध्ये जात आहेत. या कार्यक्रमांमध्ये नटण्यासाठीही ब्यूटी पार्लर्सची पॅकेजेस निघाली आहेत. ‘बाईपण भारी’ची क्रेझ तर आहेच! त्यामुळे आपल्या आवडत्या नायिकांसारख्या साड्या, दागिने खरेदी करून मंगळागौर खेळण्याचे मनोरथ अनेक जणी करत आहेत.
अर्थात मंगळागौर असो वा अन्य काही, स्त्रियांना स्वत:साठी काही करावंसं वाटतं आहे आणि या निमित्तानं का होईना, त्या मैत्रिणींना भेटतील, खेळांची प्रॅक्टिस करता करता शारीरिक व्यायाम गरजेचा आहे, याचंही महत्त्व पटेल, हेही नसे थोडके!
lokwomen.online@gmail.com