असे म्हटले जाते की, माणसाचे आयुष्य हे श्वासात मोजले जाते. माणूस जन्माला आला की पहिला श्वास घेतो आणि मरताना पहिलाच श्वास सोडतो. हो बरोबर वाचलंत तुम्ही. पहिलाच श्वास सोडतो. कोणत्याही सिनेमामध्ये कोणाला श्वास घेऊन मरताना पाहिले आहे का? नाही ना? प्रत्येक जण श्वास सोडूनच मरतो. आपण या सृष्टीतला साधा एक श्वाससुद्धा घेऊन जाऊ शकत नाही.
म्हणून पहिलाच श्वास… कारण एकदा का आपण तो जन्माच्या समयी घेतला की, तोच आपण मरताना सोडतो. मध्यंतरीच्या काळात तो फक्त आतबाहेर करत असतो. तो ‘प्राण’ बाहेर जाऊन ‘अम्बरपीयूष’ अर्थात ऑक्सिजन पिऊन आत येतो. तो बाहेर जाऊन परत आत आलाच नाही तर मृत्यू. मग यांचा प्राण गेला, पंचत्वात विलीन झाला असे आपण म्हणतो. म्हणून योगसाधनेत, प्राणायामात, आयुर्वेदात या प्राणाला विशेष स्थान आहे. या प्राणाचा आयाम, व्यायाम म्हणजेच प्राणायाम. तो युक्तिपूर्वक केला की सर्व रोग बरे होतात आणि चुकीचा केला की नको असलेले रोगपण मागे लागतात.
पूरक-कुंभक-रेचक करून हळुवार श्वास घेऊन हळुवार श्वास सोडणे म्हणजेच आपण कळत नकळत दोन श्वासांमधले आयुष्य वाढवत असतो. दोन दोन श्वासांमधले आयुष्य वाढवत गेलात की आपोआप एकूण आयुष्य वाढलेले असते. अहो, एवढा सोपा सिद्धांत आहे हा. पण विचार वाढले की श्वास वाढतात. ताण वाढला की विचार वाढतो. सतत चिंता करत बसले की ताण वाढतो. म्हणून माणसाने चिंता करू नये. कारण चिंता जिवंत देहाला भस्म करते व चिता मृत देहाला भस्म करते. जसा हा फरक आहे तसाच आयुर्वेदात श्वास या व्याधीत आणि श्वास या प्राकृत कार्यात फरक आहे. श्वास विकृत झाले की ‘श्वास’ हा व्याधी होतो. यालाच बोलीभाषेत ‘दमा’ असे म्हणतात. याचे पाच प्रकार पडतात. महाश्वास, ऊध्र्व श्वास, छिन्न श्वास, तमक श्वास, क्षुद्र श्वास असे.
हेही वाचा… मुलींच्या साक्षरतेचा प्रजनन दराशी काय संबंध आहे? स्त्रियांविषयी अपमानाची भाषा कधी थांबणार…
पावसाळा आला, आकाशात ढग जमा झाले, धूळ उडाली अथवा साधे एखाद्या सिनेमामध्ये पाहा कोणाचा फोन आला किंवा विपरीत काही घडले तरी माणसाचा दम अचानक वाढतो व त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. मग सिनेमामध्ये तो नाकातून ओढण्याचा पंप शोधत असतो किंवा बऱ्याचदा तो खलनायकाच्या हातात असल्याने त्या रुग्णाचा मृत्यू होतो. हे सतत दाखविल्याने आपल्याला ‘दमा’ म्हणजे ‘अस्थमा’ झाला की ‘अस्थालीन पंप’ एवढेच समीकरण आपल्याला माहिती असते. जुन्या सिनेमामध्ये अशा वेळी कोणीतरी वैद्यबुवा काहीतरी मधातून उगाळून चाटण देत असताना दाखवत असत. आता औषधापुरतेही शिल्लक नसणे या म्हणीप्रमाणे हा सीन दाखवण्यापुरताही राहिला नाही. हा आजार खरंच मृत्यू आणू शकतो म्हणून याला महाश्वास असे म्हटले आहे. बऱ्याचदा तो अन्य आजारांमुळेसुद्धा उत्पन्न झालेला असतो म्हणून श्वासाचे या पाच प्रकारांपैकी कोणता प्रकार आहे हे निदान करणे फार गरजेचे ठरते. त्यात सर्वात जास्त पाहायला मिळणारी जोडगोळी म्हणजे त्वचाविकार आणि श्वास.
हेही वाचा… म्हातारपणी जोडीदाराची साथ सुटल्यानंतर काय?… याचंही नियोजन आवश्यक
दमा कमी झाला की त्वचाविकार वाढतात आणि त्वचाविकार कमी झाले की दमा वाढतो. पण बऱ्याच जणांना याचा संबंधच लक्षात येत नाही. असेच हृद्रोग आणि श्वासाचे आहे. बऱ्याच आजारांचे नाते श्वासाशी जोडलेले असते. साधे एखाद्या दिवशी जेवण जास्त झाले व पोटाला तडस लागली तरी काही वेळ श्वास घ्यायला त्रास होतो. कारण या सर्व आजारांचा शेवट हा श्वासानेच होत असतो. श्वसन संस्था थांबली की मृत्यू. आजकाल स्टेरॉइड वापरूनच श्वासाची चिकित्सा केली जाते. म्हणायला कोणी आयुर्वेदिक औषध चालू आहे असे म्हणतात, पण तेही कोठे पौर्णिमेला मिळते म्हणून घेतात तर कोणाला गुण आला म्हणून तो सांगेल ते घेतात.
वैद्याकडे जाऊन आपल्या श्वास व्याधीचे निदान करून औषध घेण्याकडे अजूनही लोकांचा कल दिसत नाही. विचार करा ज्या शास्त्रात माणसाच्या एका श्वासासंबंधी एवढे सुरेख वर्णन केले असेल त्या शास्त्रात ‘श्वास’ या व्याधीविषयी काय काय माहिती मिळेल. केवळ ‘श्वासावर नियंत्रण ठेऊनसुद्धा कित्येक लोकांनी आपला श्वास (दमा) बरा केला आहे. म्हणून तर आजच्या सदरात आपण फक्त श्वासाची माहिती व प्राणायामाचे महत्त्व पाहिले. पुढील सदरात (१६ जुलै)आपण आज्जीबाईच्या बटव्यात दडलेली त्याची औषधी पाहू यात.