‘‘जे पटत नाही त्या त्या वेळेस आजवर मी व्यक्त झाले आहे. पण पुरुषांना सोडाच, अनेक स्त्रियांनाही दुसऱ्या एका स्त्रीनं असं वागणं पटत नाही, असं मी अनुभवलं. मी पुरूषी (‘मॅनली’) आहे, असं मला तोंडावर ऐकायला मिळालं! ते ऐकून चीड आली, पण आश्चर्यही वाटलं. माझी बाजू असू नये का? आणि मी ती मांडू नये का? माझ्यावर जर अन्याय होत असेल तर त्याबद्दल मी बोलू नये? यावर मी पुरूषी आहे, असं विधान का व्हावं?’’ हे म्हणणं आहे मॉडेल- अभिनेत्री बिदिता बाग हिचं.
‘मॅरिटल रेप’ या विषयावर आधारित असलेला ‘लकीरे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. दुर्गेश पाठक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात बिदिता बागसह प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा, टिया बाजपेयी आणि गौरव चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बिदितानं या चित्रपटात ‘गीता विश्वास’ ही वकील स्त्रीची भूमिका साकारली आहे. ‘या व्यक्तिरेखेशी तुझा स्वभाव कितपत सुसंगत आहे,’ या प्रश्नावर बिदिता बोलत होती. “माझ्यासाठी ही भूमिका ‘रीलेटेबल’ होती. कारण मी सत्याची बाजू नेहमी मांडते; मग मुद्दा माझ्याशी निगडित असो किंवा अन्य कुणाचा असो. परंतु आपला समाज प्रगत, सुशिक्षित झाला आहे; मात्र परिपक्वता आणि सुसंस्कृतपणा यांपासून आपण लांब आहोत, असं वाटण्याजोगे अनुभवही येतात.”
‘लकीरे’ या चित्रपटातली वकील तिच्या अशिलाला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाचं रान करते, असं सांगताना बिदिता म्हणाली, “विवाहानंतर पत्नीवर शारीरिक सुखासाठी बळजबरी करणं हा शृंगार नाही, तर तो बलात्कारच आहे. अशा बलात्काराला अनेक विवाहित स्त्रियांना तोंड द्यावं लागतं. पती हा परमेश्वर नाही; किंबहुना पत्नी त्याची दासी नाही! मी या मताची आहे, की पती-पत्नी एकमेकांचे जोडीदार- सहचर असावेत. पण आजही पतीला देवत्व बहाल करणारे सण आहेत, त्यांचा मोठा ‘इव्हेन्ट’ झाला आहे. आपल्या दांभिक समाजात आजही स्त्रीनं तिच्या प्रतिक्रिया- विशेषतः विरोधी सुराच्या व्यक्त करू नयेत असं अनेकांना वाटतं. जी स्त्री आपली सामाजिक, राजकीय मतं मांडते तिच्याबद्दल राळ उडवली जाते हे कटू सत्य आहे. म्हणूनच मला स्त्रीप्रधान चित्रपट करायला आवडतं.”
हेही वाचा… समुपदेशन: नाती फुलतात… ऑनलाइनही!
समाजमाध्यमांवर स्त्रियांना सामना करावा लागणाऱ्या ‘ट्रोलिंग’विषयी बिदिता म्हणाली, “पूर्वी मी सोशल मीडियावर प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत मांडत असे आणि मला खूपदा ‘ट्रोलिंग’ही झालंय. हळूहळू लक्षात येत गेलं, की माझ्या व्यक्त होण्यानं घडणाऱ्या घटनांवर काहीही बरावाईट प्रभाव पडत नाही. घडणाऱ्या घटना वेगानं घडतच आहेत. मग मी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणं सोडून दिलं. माझ्या चित्रपटांविषयी मी समाजमाध्यमांचा वापर जरूर करते. मात्र समाजमाध्यमं सकारात्मक पद्धतीनं कसा वापरता येईल, याचं वापरकर्त्यांना प्रशिक्षण द्यायला हवं असं मला खूपदा वाटतं.”
बिदितानं कोलकातामध्ये प्रख्यात फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी, किरण उत्तम घोष यांच्याकडे मॉडेल म्हणून काम केलं आहे. काही बंगाली चित्रपट केल्यानंतर ती हिंदीतही अभिनय करू लागली. यापूर्वी तिनं अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीबरोबर ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटात काम केलं आहे.
lokwomen.online@gmail.com