माझ्या बाबतीत घर आणि करिअर सांभाळणं फारसं अडचणीचं नाही. लग्नाच्या आधीच माझं ठरलेलंच होतं की मी अभिनय क्षेत्रात काम करणार आहे. त्यामुळे हे ज्यांना चालेल असंच घर मला हवं होतं आणि तसंच माझं घर आहे. माझा नवरा चिन्मय केळकर हा खूपच ‘सपोर्टिव्ह’ आहे. मुळात तोही याच क्षेत्रात असल्यामुळे नटाचं आयुष्य कसं असतं, कामाला प्राधान्य कसं आणि किती द्यावं लागतं हे त्याला माहिती आहे. चिन्मय आता लेखन- दिग्दर्शन करतो. प्रायोगिक रंगभूमीवर काम करतो, कार्यशाळा घेतो. लहान मुलांसाठी तो खूप काम करतोय त्याला त्याच्या कामातून समाधान मिळतंय. मला माझ्या कामातून समाधान मिळतं.
पण आम्ही नवरा – बायको म्हणून कधी एकमेकांवर अपेक्षा लादल्या नाहीत. लग्न झालंय म्हणजे मी घरातल्या सगळ्या समारंभांना असलेच पाहिजे असं नाही. म्हणजे आमचं लग्न झाल्या झाल्या मी एक नाटक करत होते. त्यामुळे सगळे शनिवार – रविवार किंवा सगळे सण याला माझा नाटकाचा प्रयोग असायचा. मग आमचा लग्नानंतरचा पहिला सण होता तरी मी प्रयोगाला होते. म्हणजे मी सणासुदीला घरी नाही याचं सासरच्या मंडळींना वाईट वाटायचं पण त्याचं ‘गिल्ट’ त्यांनी कधी मला दिलं नाही. या माझ्या क्षेत्रातल्या सगळ्या गोष्टी उलट सासरच्या मंडळींनी नेहमीच समजून घेतल्या.
मला स्वतःला सणाच्या दिवशी भरपूर काम करायला खूप आवडतं आणि सगळे माझ्या कामाचं कौतुक करतात. सासरच्या सगळ्यांशी मी छान ‘कनेक्टेड’ आहे. म्हणजे आमचा इकडचा गोतावळा फार मोठा नाही पण माझा सगळ्यांशी खूप छान संबंध आहे. सासूबाईंशी तर माझी छान मैत्री आहे. मी त्यांना आई नाही काकूच म्हणते. त्यांच्याविषयी ममत्व वाटतंच मला किंवा त्यांना जाऊन भेटावसं वाटतं, त्यांच्याशी बोलावंसं वाटतं, त्या ट्रेकला जातात तेव्हा त्यांची चौकशी करावीशी वाटते. त्यामुळे चिन्मयची आई, बहीण, त्याची भाची या सगळ्यांशीच माझे खूपच चांगले संबंध आहेत. मुळात ती सगळीच मंडळी मोकळ्या स्वभावाची आहेत. म्हणजे लग्नानंतरही मी अनिता दाते हेच नाव लावते म्हणून चिन्मय किंवा या बाकीच्या मंडळींनी मला कधीच विचारलंही नाही. उलट आई – बाबांकडूनच एकदा-दोनदा आलं असेल की आता लग्न झालंय ना तर मग केळकर नाव लाव.
मुळात माझ्या माहेरी मी एकत्र कुटुंबात वाढले. पुण्यात वाड्यात माझं बालपण गेलं. त्यामुळे सगळं काही करताना आम्ही सख्खी-चुलत भावंडं एकत्र असायचो. प्रत्येक निर्णयात, प्रत्येक माणूस सहभागी असायचा. पण लग्नानंतर तसं बघायला गेलं तर ही सगळी मंडळी खूपच ‘सॉर्टेड’ होती. म्हणजे एखादी गोष्ट घडताना मी त्यांच्या अपेक्षेपेक्षा जर काही वेगळी वागले तरी कुणी ते मनात ठेवत नाही. उलट मी घेतलेल्या कोणत्याही निर्णयात ते माझ्या बरोबर असतात. माझ्या सासूबाई माझी प्रत्येक कलाकृती पाहतात. नाटक बघायला येतात, कौतुक करतात. आवडलं नाही तर स्पष्टपणे तेही सांगतात. आम्ही खूप गप्पा मारतो. चर्चा करतो.
चिन्मयची आणि माझीही नेहेमी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते. म्हणजे सकाळी उठल्यावर शूटिंगला निघण्यापूर्वी सकाळचा चहा आम्ही एकत्र घेतो. मग तेव्हा आमच्या खूप गप्पा होतात. ज्या दिवशी दोघांनाही काम नाही असा दिवस मिळाला की तो दिवस आमचा होऊन जातो. मग आम्ही दोघं एकत्र काही वर्कशॉप्सना जातो. या क्षेत्रातल्या काही मंडळींना भेटतो किंवा मग दोघं एकत्र असलो की घर साफ करतो. काही कामांची लिस्ट केलेली असते. एकत्र खरेदी करतो. चिन्मयने काही लिहिलेलं असेल तर तो वाचून दाखवतो. मग त्यावरही चर्चा करतो. घरी कुणी येणार असेल तर चिन्मय माझ्याहीपेक्षा छान स्वयंपाक करतो. म्हणजे आमच्याकडे बऱ्याचदा बँकेत जाणं किंवा बँकेचे व्यवहार पाहणं प्लंबरला बोलावून त्यांच्याकडून काम करून घेणं, किंवा कोणाशी बोलणं ही सगळी टेक्निकल कामं मी करते.
घरात काय हवं नको ते पाहणं किंवा घरात काही आणायचं तर ते बऱ्याचदा चिन्मय पाहतो. खरंतर या बाबतीत मी खूप गलथान आहे. तो खूप ‘पर्टिक्युलर’ आहे. वस्तू जागच्या जागी ठेवणं हे त्याला जमतं. मी मात्र कधीतरी काही गोष्टी विसरून जाते. म्हणजे एरवी आमच्या कामाच्या बाबतीत आमचं ‘अंडरस्टॅण्डिंग’ उत्तम आहे. पण या बाबतीत मात्र आम्ही खूप भांडतो. कधी कधी चुका कबूल पण करतो. त्यामुळे भांडलो तरी फार काळ न बोलता वगैरे आम्ही राहू शकत नाही.
मुळात आमच्या दोघांच्याही बाबतीत एक गोष्ट नक्की आहे की आम्हाला साधं राहायला आवडतं. आमच्या गरजा जास्त नाहीत त्यामुळे बाहेर गेलो, पार्ट्या केल्या, उंची कपडे घातले, ऑनलाईन उगाचच खरेदी केली हे आम्ही कधीच करत नाही. घरात अमुक ‘ब्रॅण्ड’च्या वस्तू हव्यात असाही आमचा अट्टाहास नसतो. आमच्या घरात खूप पुस्तकं असतात. आम्ही ती वाचतो. आमच्या सहजीवनातला हा महत्त्वाचा दुवा आहे. मुळात जी माणसं आम्हाला भेटली त्यामुळे आमचा संसाराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. आपल्याकडे समाजाचं एक वेगळंच प्रेशर मुलांवर असतं. दोघांनी कसे पैसे मिळवले पाहिजेत किंवा नवरा बायको म्हणून काय जबाबदाऱ्या घ्यायला हव्यात या गोष्टी ठरलेल्या असतात. पण माझं म्हणणं थोडं वेगळं आहे.
माझी आर्थिक जबाबदारी मला घेता आली पाहिजे आणि हे लग्नाच्या वेळी मी चिन्मयला सांगितलं होतं. त्यामुळे आज आम्ही दोघंही ज्या कामात आम्हाला समाधान मिळतंय ते काम करू शकतोय. शिवाय मला असं वाटतं की लग्नानंतर दोन कुटुंब एकत्र येतातच पण त्यासोबतच एक ‘सपोर्ट सिस्टीम’ही लागते.
आमचे खूप मित्र मैत्रिणी आहेत, जे आमच्यासाठी आणि आम्ही त्यांच्यासाठी नेहमी असतो, आयुष्यातल्या समस्या सोडवायला. कदाचित घर – करिअर सांभाळताना हा खूप मोठा ‘सपोर्ट’ आमच्याकडे आहे. नवरा – बायको म्हणून एकमेकांच्या कामांनाही आम्ही छान पाठबळ देऊ शकतो. आज चिन्मय लेखन, दिग्दर्शन, अभिनय करतो. तो खूप ‘क्रिएटिव्ह’ काम करतो. त्याची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे.
आज मुलांसाठी तो जे काम करतोय. त्याच्या या कामासाठी अनेक संस्था जोडल्या जाव्यात, तो करत असलेलं काम खूप महत्त्वाचं आहे. त्या कामाकडे या क्षेत्रातल्या मंडळींनी ‘सिरिअसली’ पहावं असं मला फार वाटतं. तसंच मी सध्या खूप व्यावसायिक काम करते आहे. तर मी नाटक केलं पाहिजे, प्रायोगिक नाटक केलं पाहिजे, चांगल्या भूमिका केल्या पाहिजेत असं त्यालाही आवर्जून वाटतं. माझ्यातल्या कलाकाराशी त्याचं असलेलं नातं मला अधिक महत्त्वाचं वाटतं आणि तेच जपण्याचा प्रयत्न आम्ही दोघंही करतो. म्हणूनच आमच्या करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर आमचं नातं मात्र अधिकंच समृद्ध होत जातं.
शब्दांकन-उत्तरा मोने