गिरिजा ओक- गोडबोले
आमचं गोडबोले कुटुंब तसं खूप मोठं आहे आणि आमचा एकमेकांशी असलेला बॉण्डही अगदी घट्ट आहे. आम्ही सगळेच या टेलिव्हिजन आणि फिल्म इंडस्ट्रीत काम करत असल्यामुळे आमच्या सगळ्यांच्या तारखा जमून आम्ही सगळे घरात एकत्र असणं, असं फारच कमी वेळा होतं. त्यामुळे कॅरमच्या सोंगट्या जशा बोर्डवर विखुरलेल्या असतात तसं आमचं असतं. पण सगळ्या सोंगट्या ज्या दिवशी एकत्र येतात तेव्हा आमचा खेळ चांगलाच रंगतो.
माझा मुलगा कबीर, त्याच्या वाढदिवसाला मात्र आम्ही सगळे ९९ टक्के एकत्र असतो. कबीर आता ९ वर्षांचा आहे आणि अर्थातच सगळ्यांचा ‘सेंटर ऑफ ॲट्रॅक्शन’ आहे. जेव्हा आम्ही पुण्यात राहत होतो तेव्हा त्याला आजी-आजोबांसोबत भरपूर राहायला मिळायचं, पण आता आम्ही मुंबईत राहत असलो तरी कबीरला त्यांच्यासोबत राहता यावं यासाठी मी मुद्दाम त्याला पुण्याला घेऊन जाते. पुण्यात आम्ही राहत होतो तेव्हा तो माझ्याकडे आणि सुहृदच्या आईकडेच (गीता गोडबोले) वाढलाय. त्यामुळे मला कधीच कबीरची काळजी नसायची. मी कधी मम्मीला फोन करून विचारलंही नाही की तो जेवला की नाही किंवा तो मजेत राहिलाय ना. कबीरसाठी त्याची गीताआजी एकदम स्पेशल आहे. मला आठवतंय, कबीरच्या शाळेत ‘ग्रँड पेरेंट्स डे’ होता. शाळेतल्या इतर मुलांच्या आज्या टिपिकल कॉटनच्या साड्या नेसून आल्या होत्या आणि आमची गीताआजी मात्र स्काॅर्पिओ चालवणारी, भरपूर टॅटू काढलेली, वेस्टर्न आउटफिटमध्येही एकदम उठून दिसणारी, नातवाला ट्रेकला घेऊन जाणारी अशी होती. मला शाळेतलं ते दृश्य बघूनच खूप गंमतही वाटली आणि तिचा अभिमानही वाटला.
आमचं दोघीचं नातंही सासू-सुनेपेक्षा मैत्रिणीचं जास्त आहे. ती स्वतः कॉश्च्युम डिझायनर आहे. लग्नाआधी मी आणि तिनं एकत्र कामही केलंय. त्यामुळे आमच्यातली मैत्री आमच्या नात्यातही तितकीच छान राहिली. कबीरसाठी ती सगळी कामं सोडून घरीही बसू शकते, पण म्हणून मी कधी तिला गृहीत धरत नाही. कारण तिच्याही प्रोफेशनल कमिटमेंट्स आहेत. शूटिंगच्या तारखा तिलाही ॲडजस्ट कराव्या लागतात. पण बऱ्याचदा आम्ही दोघींनी ते छान पद्धतीने केलंय. आता मी, सुहृद आणि कबीर तिघं मुंबईत राहतो, ती पुण्यात असते. तिला तिथं खूपच काम पडतं, मग ती माहेरपणाला कुठं जाणार? तर मी तिला माहेरपणाला माझ्याकडे बोलावते. अट एकच असते, तिने इथं छान आमच्याबरोबर एन्जॉय करायचं. एकाही कामाला हात नाही लावायचा. मी पुण्यात जाते तेव्हा तीही माझे बरेच लाड करत असते. आमच्याकडे लाड करायला मम्मी-पप्पांच्या बरोबर माझ्या आजेसासूबाईपण आहेत. त्याचं वय ९३ वर्षांचं पण त्या आमच्या सगळ्यांपेक्षा फिट आहेत. आमचा पूर्ण कुटुंबाचा एक व्हाॅट्सॲप ग्रुप आहे त्यात आमच्या बरोबरीने त्याही छान ॲक्टिव्ह आहेत. त्या खूप छान स्वयंपाक करायच्या, त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, उत्तम उत्तम पदार्थ तयार करून विक्रीदेखील केलेली आहे. माझ्या लग्नानंतर आम्ही एकत्र खूप नाटकं, सिनेमे पाहिले आहेत. मला आठवतंय, मी त्यांना ‘बर्फी’ सिनेमाला घेऊन गेले होते. पण शोच्या वेळेत काही तरी घोळ झाला माझा आणि आम्ही सिनेमाला बऱ्यापैकी उशिरा पोहोचलो. त्यांनी तेही स्पोर्टिंगली घेतलं. घरी गेल्यावर सगळ्यांना सांगितलं, की गिरिजाने मला अर्धीच बर्फी दिली. मग काय घरात हास्याचा कल्लोळ, म्हणजे त्यांचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ही असा भन्नाट. त्यामुळे त्यांचं माझंही छानच जमतं.
सुहृदची बहीण मृण्मयी (गोडबोले)सुद्धा शूटिंगमध्ये बिझी असतेच, पण आम्ही दोघीही आपापला वेळ ॲडजेस्ट करून नेहमी गप्पा मारत असतो. पप्पांचंही तसंच आहे. मुळात श्रीरंग गोडबोले या नावाचं एक वलय त्यांच्यामागे असल्यामुळे सुरुवातीला आम्ही थोडे ऑकवर्ड होतो बोलायला, पण नंतर आमचीही छान गट्टी जमलीय. पप्पांबरोबर राजकारणापासून ते अगदी नवीन येणाऱ्या चित्रपट-मालिकांविषयी गप्पा मारायला मला खूप आवडतं. एक तर ते प्रचंड हुशार आहेत आणि नवीन गोष्टी जाणून घ्यायला ते अगदी उत्सुक असतात. त्यामुळे आमच्या जनरेशनचे होऊन ते आमच्याशी सगळ्यांशीच गप्पा मारतात. त्यामुळे आम्ही सगळं कुटुंब जेव्हा एकत्र असतो तेव्हा कल्ला असतो नुसता.
घरातल्या या सगळ्यांशी माझं असलेलं नातं इतकं छान असण्यामागे दोन व्यक्ती आहेत. एक माझी आई. म्हणतात ना, आईच्या संस्कारांत वाढलेली मुलगी सासरच्या मंडळींना सहज आपलंसं करते तसं काहीसं झालंय. आणि ज्याच्यामुळे मी या कुटुंबाशी जोडले गेले तो माझा नवरा सुहृद. तो नवरा कमी, मित्र जास्त आहे. खरं तर आमचे स्वभाव, आमच्या आवडीनिवडी खूपच वेगळ्या आहेत. पण म्हणून आम्ही या गोष्टी एकमेकांवर लादत नाही. मला ज्या गोष्टी स्वतंत्रपणे करायच्या असतात त्या मी करते किंवा बायको म्हणून सतत फोन करणं, कुठं आहेस, जेवलास का, वगैरे प्रश्न विचारून त्याला मी भंडावून सोडत नाही. पण आम्हाला दोघांना एकत्र ज्या गोष्टी करायच्या असतात त्या आम्ही एकत्रच करतो.
मला असं वाटतं की, आमचं करिअर, आमचं फील्ड असं आहे ना जिथं अडचणी असतातच किंवा घरात प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असल्यामुळे काही गोष्टी पटणार नाही हेही होणारच, फक्त आपण त्याचा बाऊ न करता विषय सोपा किती आणि कसा करतो ते महत्त्वाचं असतं. मुळात आपलं एखाद्या दुसऱ्या व्यक्तीबरोबरचं नातं पाहताना आपलं स्वतःचं स्वतःशी नातं कसं आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे. आपण गोंधळलेलो वा कन्फ्यूज असलो तर आपलं नातंही तसंच असतं. नाती जपताना आपल्याला स्वतःला कशात आनंद मिळणार आहे ते आपण केलं पाहिजे. तुम्ही जेव्हा प्रामाणिकपणे, पारदर्शक राहून तुमचं नातं जपता तेव्हा समजूत आपोआप पटते. मी कधी कुणाशी खोटं बोलत नाही, विशेषतः मूल झाल्यानंतर ते आईशिवाय राहत नाही तेव्हा मुलाला खोटं सांगितलं जातं. मी कबीरला कधीच खोटं सांगितलं नाही, कधी कधी मी शूटिंगला निघताना त्याला समजावून सांगायला मला वेळही लागला. पण त्याची समजूत पटवूनच मी नेहमी बाहेर पडले. त्यामुळे कबीरने नेहमी शूटिंगला आनंदाने जाणारी, तिचं आवडीचं काम करणारी आनंदी आई बघितली आहे.
मुळात स्त्रीने हे स्वतः ठामपणे ठरवायला हवं आणि मग कोणत्याही परिस्थितीत स्वत:चा आनंद मिळवायला हवा. आपल्या आनंदाची वा दुःखाचीही सूत्रं आपण दुसऱ्याच्या हातात दिलेली नसावीत.
प्रत्येक स्त्री स्वतः संपूर्ण असते. त्यासाठी कुणाची आई वा कुणाची बायको होणं गरजेचं नाही. तिचं कर्तृत्व सिद्ध करत असते आणि जबाबदाऱ्या, नातीही पाळत असते. त्यामुळे तिचं स्वतःशी असलेलं नातं मला जास्त महत्त्वाचं वाटतं, ते नातंच तिला स्ट्राँग बनवत असतं…
शब्दांकन : उत्तरा मोने