प्राजक्ता माळी

मेन्टॉर म्हणजे मार्गदर्शक! पण खरं सांगू का? सुरुवातीच्या काळात तरी मला मार्गदर्शक मिळालाच नाही. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट संघर्ष करून स्वतःची स्वतःच मिळवायला लागली. ‘तू ही मालिका कर अथवा करू नकोस’, ‘आता तू फिल्म्सकडे वळ,’ असं नेमकं मार्गदर्शन करणारं त्याकाळात कोणीही मला भेटलं नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्थात एका अर्थी ते बरंच झालं म्हणा! तुम्ही पडता, उठता आणि पुन्हा नव्या उमेदीने चालू लागता. चुकांमधून शिकू लागता. असं करत हळूहळू लहान वयांत नवे नवे मार्ग धुंडाळू लागता. ज्ञान आणि अनुभवांतून जे बळ तुम्हाला मिळतं ते आयुष्यभर पुरून उरतं.

आता हेच बघा ना! पुण्यातल्या आडबाजूला राहाणारी मध्यमवर्गीय घरातली मी मुलगी! कुटुंबातल्या कोणाचाही या क्षेत्राशीच काय मुंबईशीसुद्धा दूर दूरपर्यंत संबंध नाही. अशा वेळी ‘सुवासिनी’ही पहिली मालिका मला मिळाली आणि त्यानिमित्ताने मुंबईशी माझी ओळख झाली. खोटं वाटेल, पण सुरुवातीच्या काळात मुंबईनं मला अक्षरशः प्रत्येक दिवशी रडवलं. शारीरिक, भावनिक, आर्थिक सगळी ओढाताणच होती तेव्हा! पण पुढे मात्र याच मुंबईनं मला कलाकार म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. ओळख दिली. आनंदही दिला.

आणखी वाचा : पुरुषी मक्तेदारी मोडीत काढणारी मूर्तिकार रेश्मा खातू!

मुंबईला आले तेव्हा सुरुवातीच्या काळात खिशांत फारसे पैसे नसायचे. त्यामुळे मी रेल्वे किंवा बसनेच प्रवास करायची. त्यात शूटिंगच्या जागा दूर दूर. मला मुंबईच्या प्रवासाचं गणितच कळायचं नाही. रविवारी मी सेटवर वीस मिनिटांत पोहोचायची. तर त्याच प्रवासाला इतर दिवशी अडीच तास लागायचे. हे असं कसं होतं हे कोडंच उलगडत नव्हतं कित्येक दिवस. पैशांच्या ओढाताणीमुळे मला रिक्षाचा प्रवाससुद्धा परवडत नव्हता. एकदा एकटीसाठी सेटवर जायला मी स्टेशनवरून रिक्षा केली तेव्हा वाटलं, अरे वा! सेलिब्रेटीच झालो की आपण! त्याहीपूर्वीच्या काळांत मी शूटिंगसाठी आईबरोबर पुण्याहून मुंबईत येत असे. एशियाडचं दीडशे रुपये तिकीटसुद्धा परवडत नव्हतं तेव्हा. म्हणून आम्ही दोघी रेल्वेच्या जनरल डब्यांतून प्रवास करत असू. माय गॉड! आजुबाजूला दारुडी, गुटका खाणारी, विचित्र नजरेनं बघणारी माणसं! त्यांच्याबरोबरचा तो जीवघेणा प्रवास! कितीतरी वेळा शूटिंग आटपून दमून भागून तीन चार तास उभ्यानं प्रवास केलाय आम्ही दोघींनी!

मग हातात थोडे पैसे आले. तेव्हा मुंबईत एका आँटीकडे पीजी म्हणून राहायला लागले. बापरे! सासू परवडली अशी ती आँटी! हे भांडं इथेच का ठेवलं इथपासून ते इथे दोन थेंब पाणीच का सांडलं इथपर्यंत सर्व प्रकारची बोलणी आणि छळ! तो निमुटपणे एकटीनं सोसला. सेटवरही मला ट्रोल केलं जायचं. शास्त्रीय नृत्यांगना ‘लाऊड एक्सप्रेशन्स’ देतात. छोट्या पडद्यावर असा अभिनय चालत नाही यासाठी सतत सूचना आणि टोमणे! फार कठीण काळ होता तो! पण ‘सुवासिनी’ मालिका करताना मला एक चांगला मित्र भेटला, विकास पाटील. तो स्वतः पुण्याचा! त्यामुळे मुंबईत कसं जगायचं, कसं टिकायचं ते त्यानंच मला शिकवलं. अभिनयापासून ते ‘तू बस व रेल्वेने प्रवास न करता स्वतःची छोटीशी का होईना गाडी घे’ इथपर्यंत प्रत्येक बाबतीत तो माझा मार्गदर्शक झाला. मुंबईशी मैत्री करायला त्यानंच मला शिकवलं.

आणखी वाचा : करिअर- घर बॅलन्स : स्वतःशी असलेलं नातंच महत्त्वाचं

मात्र माझ्यातला कलाकार घडवला तो माझ्या आईनं! नृत्याची हौस खरंतर तिला होती. मग पुढे ती माझी हौस झाली. नंतर ते पॅशन झालं आणि पुढे प्रोफेशन! वयाच्या सहाव्या वर्षी तिनं मला भरतनाट्यमच्या क्लासला घातलं. परिस्थिती बिकट! जेमतेम हातातोंडाची गाठ! त्यामुळे क्लासची फी देण्यापासून मारामार! त्यात क्लास घरापासून खूप लांब! वाहन परवडत नाही म्हणून ती चालत मला तिथे घेऊन जायची. पावसा-पाण्यात तासन् तास! त्यात घरांतून आजीचा नाचगाण्याला सक्त विरोध! तिचा आरडाओरडा! पण तो सहन करून पैशांची तजवीज करण्यापर्यंत सगळं आईनं एकटीनं सोसलं! मला आठवतं, मी नृत्याच्या शेकडो स्पर्धांमध्ये भाग घेतला, तेव्हा ती सगळ्या स्पर्धांसाठी स्वतः छान छान कॉस्च्युम्स शिवायची. तेवढ्यासाठी ती शिवण शिकली. पायाच्या पैंजणांपासून कपाळावरची माथापट्टीसुद्धा ती स्वतः तयार करायची. खरी ज्वेलरी घ्यायला पैसेच नसायचे म्हणून ती लेसची सुंदर ज्वेलरी माझ्यासाठी तयार करायची. स्नेहसंमेलनांत माझ्या नृत्याच्या सरावासाठी ती स्वतः रेकॉर्डर घेऊन बसायची. नृत्याच्या स्पर्धांमध्ये ट्रॉफीज मी खूप जिंकल्या खऱ्या, पण त्यांतून पैसे मिळायचे नाहीत. तरीही आईनं मला खंबीर साथ दिली. मी तेव्हा ‘दम दमा दम’, ‘ढोलकीच्या तालावर’ असे खूप रिअलिटी शोज केले ते केवळ तिच्या प्रोत्साहनामुळे!

मी नववीत असताना तिनं माझं ‘अरंगेत्रम’ केलं, तेही कर्ज काढून! ती म्हणाली, एवढं सगळं आपण केलंय, तर हा पडावही आपण वेळेवर पार केलाच पाहिजे! नृत्य हौस म्हणून न शिकता, त्याचं रीतसर शिक्षण घ्यावं यासाठी पुणे विद्यापीठाच्या ‘ललित कला केंद्रा’तून मी नृत्यातून बी.ए. व एम. ए. केलं, तेही तिच्या आग्रहाखातर! मी तिची अत्यंत गुणी मुलगी आहे. बस म्हटलं की बसायचं. ती उठ म्हणेपर्यंत उठायचं नाही, इतकी आज्ञाधारक आणि प्रामाणिक!

पुढे नाट्यछटा स्पर्धा व एकांकिका स्पर्धांतून तिनंच मला अभिनय क्षेत्राकडे वळवलं. त्यासाठी मुंबईत एकटं राहणं व या क्षेत्रांत एकटीनं जबाबदारीनं वागणं, या सर्व गोष्टींसाठी तिनं माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला. पुढे पप्पांचाही पाठिंबा मिळाला. पण सुरुवातीच्या काळात घरच्यांकडून परवानगी घेणं हेसुद्धा तिच्यासाठी अत्यंत कठीण काम होतं.

आणखी वाचा : मेन्टॉर संधीचं सोनं करायला शिकवतो!

माझे नृत्याचे गुरू परिमल फडके यांनी अभिनयासाठी मला मुंबईच्या महासागरात पोहायला भाग पाडलं. पुण्यात राहून तुझी प्रगती होणार नाही, तुला मुंबईत जायलाच हवं, असं त्यांनी मला निक्षून सांगितलं. माझ्या पहिल्या नृत्य गुरू स्वाती दातार आणि माझी रूम पार्टनर श्रद्धा काकडे, जिने पुढे माझ्या कुटुंबाचीच जागा घेतली, यांचा माझ्या यशात मोलाचा वाटा आहे.

मला घर घेण्यासाठी प्रोत्साहन देणारी मधुगंधा कुलकर्णी आणि कष्टाने घेतलेल्या घराचा उपभोग घे, असं प्रेमानं सांगणारे दिग्दर्शक अजित भुरे! या मंडळींनी केवळ व्यावसायिक नव्हे तर एकूणच आयुष्य जगायचं कसं याचं खूप छान मार्गदर्शन केलं.

माझ्या बाबतीत रातोरात काही बदललं नाही. असं बदलतही नाही. पण प्रत्येक लढाई लढताना ‘तू फक्त लढ’ म्हणणारा एक आश्वासक हात मेन्टॉरचा असतो, जो मला वेळोवेळी मिळाला.

madhuri.m.tamhane@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress prajakta mali talk about mentorship in real life nrp