भक्ती काळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ग्लास सीलिंग’ नावाचा निर्देशांक तुम्ही ऐकला आहे का? ग्लास सीलिंग- अर्थात ‘काचेचं छत’ ही एक उपमा आहे. काही पाश्चात्य देशांत शिक्षण, कार्य, यातील सहभागाचा दर, मुलांचं संगोपन, उच्च पदावरील स्त्रियांचं प्रमाण, उद्योगासंबंधीच्या शिक्षणात स्त्रियांचं प्रमाण, अशा विविध पैलूंवर आधारित या निर्देशांकाचं मोजमाप केलं जातं. ग्लास सीलिंग म्हणजे एका विशिष्ट उंचीवर पोहोचल्यानंतर पुढे काय हे तुम्ही पाहू शकता, पण काही अदृश्य अडथळ्यांवर मात करून काचेच्या छतापलीकडे झेप घेऊ शकत नाही! सध्या गाजणा-या ‘बाईपण भारी देवा’सारखे चित्रपट स्त्रीच्या बाबतीतल्या या ग्लास सीलिंगला अधोरेखित करतात.

बाईपण भारी देवा या चित्रपटाची सर्वदूर चर्चा झाली आणि अजूनही होत आहे. मराठी चित्रपटासाठी खचाखच भरलेलं थिएटर आणि आलेल्या सगळ्या प्रेक्षक बायकाच असं दृश्य मी आजवर कधीच पाहिलं नव्हतं! ‘बाईपण’साठी वेगवेगळ्या वयातल्या, नटूनथटून आलेल्या, अगदी पोस्टरवर सहा जणी गॉगल्स घालून आहेत म्हणून हौसेने गॉगल्स घेऊन आलेल्या, तशाच पोझ देऊन फोटो काढणाऱ्या, थिएटरच्या आवारातच झिम्मा फुगडी घालणाऱ्या बायका सगळ्या थिएटरमध्ये लोकांनी पहिल्या.

ही सहा बहिणींची गोष्ट. आपापल्या संसारात गुंतलेल्या, एकमेकीपासून लांब गेलेल्या बहिणी स्वतःच्या विविध स्वार्थांसाठी एका मंगळागौर स्पर्धेत सहभागी होतात. ही स्पर्धा त्यांना त्यांच्यातल्या हेव्यादाव्याच्या पलीकडचं जग दाखवते. स्वतःच्या आयुष्याकडे आणि अडचणींकडे पाहायची नवी दृष्टी देते.

हा चित्रपट सगळ्यांना का भावतोय याच उत्तर सोप्पं आहे. सगळ्या वयातल्या बायकांची गोष्ट साधेपणानं आपल्या पुढ्यात मांडलीय. मातृत्व, आर्थिक प्रश्न, पालकत्त्व, घरातली पुरुषांची मक्तेदारी, मेनोपॉज (रजोनिवृत्ती), छंद जोपासताना येणाऱ्या अडचणी, सगळं सगळं घेतलंय. बहिणी-बहिणींमधला मत्सर किंवा विहिणी-विहिणींमधली चढाओढ, काही काही सोडलेलं नाही! मराठी चित्रपटसृष्टीतल्या दिग्गज अभिनेत्रींना ‘बाईपण’च्या निमित्तानं एकत्र पाहणं पर्वणी आहे. त्या सहाजणी शेवटच्या गाण्यावर ज्या एनर्जीनं डान्स करतात ते पाहून ‘बाईपण खरंच भारी’ असं वाटतं. ज्या बाईनं खूप काही सोसलंय, तिचे डोळे आपसूक पाणावतात. हलके फुलके जोक्स लगेच तंग वातावरण नॉर्मल पण करतात. वर्तमान आणि भूतकाळाचं स्विचिंग सुंदर आहे.

सोशल मीडियावर ‘बाईपण…’ची खिल्ली उडवणारे अनेक मीम्सही पाहिले. अर्थात हे सगळं केवळ गंमत म्हणून किंवा चित्रपटाला घेऊन जी ‘इव्हेंटबाजी’ चालू आहे, त्याचाच भाग असेल तर एकवेळ ठीक आहे. कारण सर्वसामान्य बायका, गृहिणी, खेडोपाडी राहणाऱ्या महिला खूप कुटुंबांत वर्षभरात एकदाही थिएटरमध्ये जात नाहीत. त्या बिचाऱ्या स्त्रियांना काही तरी वेगळं अनुभवायची संधी मिळतेय तर त्यात वाईट काय?

मी सुरूवातीला ‘ग्लास सीलिंग’या उपमेचा उल्लेख केला त्या संकल्पनेचा प्रत्यय पदोपदी येतो. ‘खरंखुरं आयुष्य वेगळचं असतंय’, ‘चित्रपटात काहीही दाखवतात’, ‘चित्रपटात नायिका जसं वागते किंवा निर्णायक क्षणी स्वतःसाठी स्टँड घेते तसं खऱ्या जगात चालतच नाही’ हे ‘बाईपण भारी देवा’ संपवून बाहेर पडलेल्या खूप बायकांचं म्हणणं होतं.

चित्रपट फक्त येत-जात राहतात. एखादा चित्रपट आयुष्य बदलून टाकू शकतो यावर पब्लिकचा विश्वास नाही. डॉ. आ. ह. साळुंखे ‘चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये’ मध्ये सांगतात, तसं जीवनात किती तरी गोष्टीचं चांदणं पसरलेलं असतं. त्यात भिजण्यासाठी आपल्याला उसंतच नसते. थोडं स्वार्थी होऊन आवडणाऱ्या गोष्टींसाठी सवड काढली की भिजता येतं एवढं मात्र नक्की!

जगाची पर्वा न करता जगता येणं, कुठलाही ‘गिल्ट’ न बाळगता वावरता येणं, स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणं आणि ‘इरीस्पेक्टिव ऑफ जेंडर’, म्हणजे लिंगाधारित दृष्टिकोन बाजूला सारून व्यक्तींनी आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर असणं, हे सगळं मिळालं, तर बाईचं बाईपण आणि समस्त मानवजातीचं माणूसपण सार्थकी लागेल!

(लेखिका सहायक राज्यकर आयुक्त आहेत.)

lokwomen.online@gmail.com