रस्त्यांवर आपल्याला अनेक भिकारी दिसतात. त्यात पुष्कळ अगदी वयोवृद्ध व्यक्तीही असतात. प्रत्येक वेळेस, प्रत्येक व्यक्तीस मदत करणं जरी सामान्य माणसाला शक्य नसलं, तरी आपल्या आजी-आजोबांच्या वयाचं कुणी तरी भीक मागतंय हे पाहून क्षणभर का होईना, वाईट वाटतंच. अशाच एका प्रसंगात पंचवीशीच्या एका कंटेंट क्रीएटर मुलाला एक वयोवृद्ध स्त्री भीक मागताना दिसली. तिच्याकडे त्याचं विशेष लक्ष गेलं, कारण ती उत्तम इंग्लिश बोलत होती. त्यानं तिच्यावर व्हिडीओ बनवला आणि पुढे ही आजी इन्स्टाग्रामवर एकदम ‘व्हायरल’ झाली!
ही गोष्ट आहे चेन्नईमधल्या मर्लिन या ८१ वर्षांच्या आजींची. इन्स्टाग्रामवर @englishwithmerlin या नावाने त्यांचं अकाउंट आहे. साधारणपणे महिन्याभरापूर्वीची गोष्ट आहे. मोहम्मद आशिक या पंचवीस वर्षांच्या मुलानं मर्लिन आजींची गोष्ट ‘शेअर’ केली आणि समाजमाध्यमांवर ती हिट झाली. या आजीबाई एका व्हिडिओमध्ये सांगतात, त्यानुसार त्या मूळच्या रंगून- म्यानमारच्या (त्या म्यानमारचा ‘बर्मा’ असाच उल्लेख करतात. रंगूनचंही नवीन नाव ‘यांगून’ आहे.) त्यांचा नवरा भारतीय. नवरा, सासू यांच्याबरोबर मर्लिन भारतात राहू लागल्या. मूळच्या त्या इंग्लिश आणि गणिताच्या शिक्षिका आहेत. तमिळही त्यांना थोडं थोडं येतं. परंतु कालांतराने कुटुंबातील कुणीही आता जिवंत नाही आणि त्यांच्यावर भीक मागण्याची पाळी आली. कधी भीक मिळते, तर कधी उपाशीच राहावं लागतं, असं त्या व्हिडिओत सांगतात. त्या आता पूर्णतः एकट्या आहेत, पण प्रथम वृद्धाश्रमात जाऊन राहायची त्यांची तयारी नव्हती. रस्त्यावरच राहायचं त्यांनी ठरवलं होतं.
हेही वाचा… पालकत्व: उशिरा होणाऱ्या मुलाचे संगोपन
मोहम्मद आशिक यानं मर्लिन यांचं इन्स्टाग्राम अकाउंट तयार केलं, त्यावर स्पोकन इंग्लिश शिकवणारे काही प्राथमिक व्हिडीओ त्यांनी अपलोड केले. प्रत्येक व्हिडिओमागे आपल्याला जमतील तसे पैसे आजींना देणार असल्याचं त्यानं जाहीर केलं, आणि मजा अशी, की आजींची कहाणी सांगणारा त्याचा पहिला व्हिडीओ ‘व्हायरल’ झाल्यानंतर आजींच्या अकाउंटवर ६ लाख ८३ हजार फॉलोअर्स झाले आहेत.
मर्लिन यांचा सुरुवातीचा व्हायरल व्हिडीओ बघून दुसऱ्या एक तरुणानं त्यांना ओळखलं. तो लहानपणी त्यांचा विद्यार्थी होता. विशेष म्हणजे तो मर्लिन यांचा आवडता विद्यार्थी होता आणि ते एकाच इमारतीत राहत असत. मर्लिन यांचे विद्यार्थी त्यांना ‘गामा’ म्हणत. ( ‘ग्रँडमा’चं छोटं रूप.) अशाच प्रकारे मर्लिन यांच्या इतर काही विद्यार्थ्यांनीही त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना वृद्धाश्रमात राहण्यास तयार केलं. अनेक जण पुढे आले आणि त्यांनी मिळून मर्लिन यांना एका वृद्धाश्रमात दाखल केलं. १८ सप्टेंबरला मर्लिन यांचा शेवटचा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर टाकण्यात आला आहे. एक व्हीडिओज मध्ये त्या इंग्लिश संभाषण सुरू करण्यासाठी कोणती सोपी वाक्यं उपयोगी पडतील, हे सांगतात, तर एका व्हिडिओत रोज वापर करण्याजोगी इंग्लिश वाक्यं सांगतात. एका व्हिडिओत ससा-कासवाची गोष्ट इंग्लिशमध्ये सांगतात, तर एका व्हिडीओत आपले पूर्वीचे पाळीव पोपट रॉली आणि पॉली आपलं नाव घेऊन कशा हाका मारत, याची नक्कल करून दाखवतात.
हेही वाचा… ‘अल्फाबेट ग्रॅनी’… ९६ व्या वर्षी शिकायला सुरूवात आणि परीक्षेत पहिला नंबर!
त्या वृद्धाश्रमात दाखल झाल्यावर त्यांना विश्रांती हवी असल्यानं सध्या नवीन व्हिडीओ बनवत नाहीयोत, असं त्यांच्या अकाउंटवर स्पष्ट करण्यात आलंय. मात्र मर्लिन यांचा मूळचा व्हायरल झालेला व्हिडीओ अजूनही फिरतोय. समाजमाध्यमं आणि संवेदनशील व्यक्ती एकत्र आल्यावर काय होऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे, अशी भावना अनेक इन्स्टाग्रामर्स त्यावर व्यक्त करत आहेत.
मर्लिन यांचा नवीन व्हिडीओ कधी येईल माहीत नाही, परंतु मोहम्मद आशिक आपल्या @abrokecollegekid या इन्स्टाग्राम अकाउंटवर सक्रिय आहे. त्यामुळे भविष्यात त्याच्या मदतीनं मर्लिन आजीबाई इन्स्टाग्रामवर इंग्लिश शिकवताना पाहायला मिळतील, अशी आशा करायला हरकत नाही!
lokwomen.online@gmail.com