कोणतेही वैवाहिक नाते हे परीपूर्ण नसते, प्रत्येक वैवाहिक नात्यात काही समस्या, काही कुरबुरी असतातच यात काही दुमत नाही. कुरबुरी किंवा भांडणे झाली तरी लग्न टिकविण्याच्या दृष्टीने अशा कुरुबुरी आणि भांडणांविरोधात लगेच कोणी कायदेशीर कारवाई सुरू करण्याची शक्यता कमीच असते. मात्र जेव्हा सहनशक्ती संपते किंवा सुधारणेची आशा उरत नाही, तेव्हा मात्र यथार्थ कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येते.

सहनशक्ती किंवा आशा संपेपर्यंत जो कालावधी गेला, त्या दरम्यान कारवाईबाबत बाळगलेले मौन पत्नी विरोधात वापरता येऊ शकते का ? असा प्रश्न कर्नाटक उच्च न्यायालयात उपस्थित झाला होता. या प्रकरणात २०१७ साली उभयतांचे लग्न झाले, तेव्हा रीतीनुसार मुलीकडच्या लोकांनी हुंडासुद्धा दिला. मात्र कालांतराने फॉर्च्युनर गाडी आणि वीस तोळे सोने या वाढीव हुंड्याची मागणी सासरच्यांकडून करण्यात आली आणि त्याकरता पत्नीचा छळ सुरू झाला. लग्न टिकविण्याच्या आशेने काही काळ पत्नीने हा छ्ळ सहन केला, मात्र सहनशक्तीचा अंत झाल्यावर पत्नी माहेरी निघून आली, आणि रीतसर फौजदारी गुन्हा दाखल केला. दरम्यानच्या काळात पतीने घटस्फोटाची याचिका दाखल केली. पत्नीने दाखल केलेला गुन्हा रद्द होण्याकरता उच्च न्यायालयत अर्ज करण्यात आला होता.

हेही वाचा… घरी कंपोस्ट करण्याची पद्धत

उच्च न्यायालयाने- १. पत्नी सुमारे साडेचार वर्षे सासरी असताना तिने कोणतीही तक्रार किंवा कोणताही गुन्हा दाखल केलेला नसणे हे तिचे आत्ताचे आरोप खोटे असल्याचे द्योतक असल्याचे पतीचे म्हणणे आहे, २. पत्नी घरातून निघून जाताना सर्व स्त्रीधन घेऊन गेली असे पतीचे म्हणणे आहे. ३. पतीने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेनंतर पश्चातबुद्धीने पत्नीने खोटा गुन्हा नोंदवला आहे असा पतीचा मुख्य आक्षेप आहे, ४. लग्न टिकविण्याच्या उदात्त उद्देशाने पत्नीने काही काळ तक्रार आणि गुन्हा न नोंदवीणे हे पत्नीच्या विरोधात विपरीत निष्कर्ष काढण्याकरता वापरता येणार नाही. ५. सगळी आशा संपल्यावर पत्नीने गुन्हा नोंदविणे हा पत्नीचा दोष ठरविता येणार नाही. ६. पत्नी स्त्रीधन घेऊन गेल्याबद्दल बोलायचे झाल्यास, स्त्रीधन हे तिच्याच मालकीचे असल्याने तिने स्त्रीधन घेऊन जाणे यात काहीही गैर आणि आक्षेपार्ह नाही. ७. पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्यातील आरोप खरे आहेत का खोटे याचा निर्णय आम्ही करणे अपेक्षित नाही, त्याबाबत सक्षम न्यायालय यथोचित निर्णय घेईलच. ८. सद्यस्थितीत पत्नीने केलेल्या आरोपांत गुन्ह्याचे घटक आहेत किंवा नाहित? एवढेच बघणे अपेक्षित आहे आणि पत्नीच्या तक्रारीत गुन्ह्याचे घटक दिसून येत आहेत अशी महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली आणि गुन्हा रद्द करण्याची पतीची याचिका फेटाळून लावली.

सुधारणेची आशा पूर्णपणे मावळल्यावर काहिशा दिरंगाईने गुन्हा नोंदविणे हा पत्नीचा दोष मानता येणार नाही हे स्पष्ट करणारा म्हणून हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. केवळ दिरंगाई केली या एकाच कारणास्तव गुन्हा रद्द झाला तर त्याचा अनेकानेक प्रकारे गैरफायदा घेतला गेला असता, त्या संभावनेला या निकालाने चाप लावला हे उत्तम झाले.

हेही वाचा… शेतकऱ्याची लेक, अकरावीत अनुत्तीर्ण; मात्र MPPSC परीक्षेत जिद्दीमुळे पटकावला ६ वा क्रमांक! पाहा तिचा प्रवास…

कोणताही अन्याय सहन करणे हा सुद्धा गुन्हाच आहे, पहिल्यांदाच आवाज उठवला नाही तर चुकीचे वागणार्‍याला प्रोत्साहन मिळते हे सगळे माहिती असले तरी बरेचदा ते अमलात आणले जात नाही. विशेषत: वैवाहिक नात्यामधील समस्या कालांतराने आपोआप सुटतील, जोडीदारात आपोआप सुधारणा होईल अशी एक वेडी आशा असते. शिवाय आपण कायदेशीर कारवाई सुरू केली तर संभाव्य सुधारणेचा मार्गच बंद होईल असाही एक समज म्हणा गैरसमज म्हणा प्रचलीत आहेच. या वेड्या आशेपायीच अगदी कळस गाठेपर्यंत तक्रार किंवा गुन्हा नोंदवला जात नाही. दिरंगाईने तक्रार किंवा गुन्हा दाखल करणे हा काही अपराध नाही असे या निकालाने स्पष्ट केलेले असले तरी सुद्धा केवळ सुधारणेच्या आशेवर सहन करत राहणे आणि वेळच्या वेळी कारवाई न करणे यास शाहणपणा म्हणता येईल का, हा वादाचाच मुद्दा आहे.