चारूशिला कुलकर्णी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुखी संसाराची स्वप्नं सगळेच पाहतात. अंजलीनेसुध्दा पाहिली… अगदी पिक्चरमध्ये दाखवतात तसा राजकुमार नाही भेटला तिला, पण तिच्या सावळ्या रंग-रूपाला साजेल असा हीरो कांदे-पोहे कार्यक्रमात भेटला. पहिल्याच भेटीतच तो तिला आवडला… मनं जुळली… कुंडलीनुसार योग जुळले… कोणाचा राग ना लोभ… लग्न थाटामाटात पार पडलं… पण अवघ्या पाच वर्षांत तिचं हे स्वप्नवत जग डोळयांतील आसवांसह वाहून गेलं. निमित्त ठरलं करोना… अंजलीची ही कहाणी दु:खदायकच…

नवऱ्याविना ती तिचं आयुष्य जगत होती म्हणा, पण तिच्या जीवनातला उत्साह हरवूनच गेला होता. आताशा हे नेहमीचं झालं हाेतं. कॉलनीतल्या बायका सण-समारंभानिमित्ताने किंवा किटी-पार्टी, भिशीसाठी एकत्र जमा झाल्या, की त्यांच्या रंगीबेरंगी साड्या, त्यांचं हसणं-खिदळणं, एकमेकींना ‘आहों’वरून चिडवणं, नवरा बायकोच्या नात्यातील रुसव्याफुगव्यांचा जाहीर हिशोब मांडणं… अंजलीला ते कसंसंच होत असे. नवऱ्याच्या आठवणीनं ती अधिकच हळवी होत असे. या सगळ्या एकत्र येत आपल्याला डिवचतात-खिजवतात असं तिला वाटू लागे. अंजलीच्या आईला तिची ही अवस्था पाहावत नसे. खरं तर एकेकाळी या ‘सो कॉल्ड लाईफ’चा अंजलीही भाग होती. दर महिन्याला पुस्तक भिशी असो, वा किटी पार्टी… कोणती साडी नेसू, कोणता मेनू करू, यात ती गुंतलेली असायची.

हेही वाचा: पार्टी अभी बाकी है! ऑफिस पार्टीज एंजॉय करायची आहे? मग वाचा या टीप्स

तिचा तो उत्साह पाहता तिचा नवरा अमेय तिच्यावर कधी चिडायचा तर कधी तिच्या उत्साही स्वभावाचं भारी कौतुकही करायचा. त्यांच्या या सुखी संसारवेलीवर चित्रा नावाचं फूल उमललं आणि सुखी संसाराचं चित्र रंगतदार झालं. सारं काही सुरळीत सुरू असताना करोनाच्या दुसऱ्या लाटेत अमेय आजारी पडून ऑक्सिजनची पातळी खालावल्याचं निमित्त झालं आणि तो हे जग सोडून गेला. तो त्याच्या वाटेनं गेला, पण अंजली, तिची मुलगी चित्रा या सुखी संसाराच्या चित्रातून आपसूक बाहेर फेकले गेले. २९ व्या वर्षी अंजलीच्या वाट्याला आलेलं वैधव्य, दोन वर्षांची मुलगी चित्रा यांना पाहून तिच्या माहेरच्यांचा जीव तिच्यासाठी तुटत होता. पण सासरची मांडळी मात्र पहिल्या दिवसापासून तटस्थ राहिली. तू आणि तुझी मुलगी, तुमचं तुम्ही पाहा असाच सूर त्यांनी धरला.

रितीरिवाजा प्रमाणे श्राध्द आटोपलं आणि हवा पालटासाठी ‘मी अंजलीला माझ्या सोबत नेते’ असं तिची आई- रंजनाने सासरच्या मंडळींना सांगितलं आणि ते त्यांच्या पथ्यावरच पडलं. खरं तर अंजली तरूण होती, शिकली सवरलेली होती. फक्त लग्नानंतर ती संसारात पूर्णपणे गुरफटली. मुलगी आणि नवरा हेच तिचं विश्व बनलं. यापलीकडे कुठलं जग तिला माहीतच नव्हतं. अमेयच्या जाण्यानं तिच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरायची कशी हा प्रश्न तिच्या घरच्यांसमोर होता. अमेयचा पीएफ, एलआयसी गुंतवणूक, सरकारी मदत यातून काही आर्थित तजवीज झाली. खरं तर यंत्रवत होत असलेल्या अंजलीला मानसिक आधार हवा होता. तिला हक्काची साथ हवी होती. तिचा कोंडमारा पाहून आईनं दुसऱ्या लग्नासाठी हालचाल सुरू केली.

पण तिचं पुन्हा लग्न लावून देणं हे फारसं कोणाला रुचत नव्हतं. अगदी जवळच्या लोकांनीही ‘एवढी काय घाई?’ , ‘आता अमेयला जाऊन वर्षही झालं नाही आणि लगेच हिला दुसऱ्या लग्नाची हळद लावायला निघाले.’ अशी कुजबूज सुरू झाली. पण अंजलीचे घरचे ठाम होते. अंजली पाहताच क्षणी कोणालाही आवडेल अशीच होती. एक-दोन नकारानंतर एकाकडून होकार मिळाला, पण तिच्या दोन वर्षाच्या चित्राला कोणी स्वीकारण्यास तयार नव्हते. तेव्हा अंजली पुन्हा आपल्या जुन्या आठवणींच्या कोशात गेली. स्वत:शीच काही तरी पुटपुटत राहायची.
या काळात तिची मैत्रीण- जी विधवा हक्क अभियानासाठी काम करत होती ती हे सर्व पाहात होती. तिच्यासाठी पुन्हा एकदा वर संशोधन सुरू झालं हे पाहताच तिनं आपला दूरचा भाऊ हर्षलला अंजलीचं स्थळ सुचवलं. खरं तर हर्षलचं पहिलंच लग्न… तो सुशिक्षित होता. त्याच्यासाठी मुली पाहणं सुरू असताना विधवेचं स्थळ, त्यात मुलीची जबाबदारी सांगून आल्यावर सर्वांच्या कपाळावर आठ्या पडल्या. पण हर्षलला अंजली आवडली होती. त्यानं याविषयी आई-वडिलांची मनधरणी केली. अंजलीची मुलगी चित्रालाही सांभाळण्याची तयारी दर्शविली. म्हणतात ना, उमीद पे दुनिया कायम हैं… असंच अंजलीच्या बाबतीत झालं. पाहण्याचा कार्यक्रम ठरवला.

हेही वाचा: सुधा मूर्ती स्वत:साठी साडी खरेदी करत नाहीत, कारण…

अंजली नाशिकची, तर हर्षल वाईचा… ही दोन टोकं चहा-पोह्यांच्या कार्यक्रमात एकत्र आली. सर्वांची मनं जुळली… स्वभाव जुळले… पुन्हा एकदा बार उडवायचा ठरला.अंजलीचा पुर्नविवाह होता, पण तिच्या माहेरचे व सासरच्यांकडूनही नकारात्मक प्रतिक्रिया आली नाही. हुंडा, वरदक्षणा या रुढींना फाटा देत खऱ्या अर्थानं दोन मनं व घरं जवळ आली. पाठवणीच्या वेळी अंजलीचं मन पुन्हा भूतकाळात गेलं तेवढ्यात हर्षलनं तिचा हात हातात घेण्यासाठी पुढे केलेला आपला हात आपण नव्या बंधनात अडकल्याची जाणीव करून गेला. त्याचा तो आश्वासक हात तिला हवाहवासा वाटला. चिमुकल्या चित्राचा लहानगासा हात हातात घेत त्या दोघांनी घराचं माप ओलांडलं. विधवा विवाह हक्क अभियानाच्या वाटचालीत हा विवाह एक आश्वासक सुरूवात ठरेल…

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marriage arranged took place with great excitement after husband died five years i will be born again article on widow during remarriage tmb 01