वंदना सुधीर कुलकर्णी
“मित्रा, लग्न करायचं तर जोडीदार निवडीचा एवढा विचार करावा लागतो? मुग्धाने हे सर्व सांगेपर्यंत असं काही कधी डोक्यातही आलं नव्हतं…” डोकं खाजवत पम्या म्हणाला. “लग्नाच्या आधीपासूनच डोक्याला इतका ताप द्यावा लागणार असेल तर हे लग्न करायचंच कशाला? लग्नानंतरचे ताप तर वेगळेच.”…सम्याने पम्याला दुजोरा दिला.
रेवा म्हणाली, “बघा, लग्न करण्याच्या आधीच एवढी फेफे उडाली आहे यांची… मग संसार कसा सांभाळणार आहात? झेपणार आहेत का तुम्हाला ती गृहस्थाश्रमाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या सांभाळणं? आणि आईबाबांच्या जिवावर लग्न करणार असाल तर खरंच करू नका हं लग्न…”
“पम्या आणि जबाबदाऱ्या सांभाळणारा गृहस्थ?” हा.. हा… अनय हसत सुटला…
“दर वेळी माझीच काय खेचता रे? आणि तुला तरी काय अनुभव आहे रे अन्या, संसाराचा? आला मोठा चेष्टा करणारा”… पम्या वैतागला होता आणि थोडा नाराजही झाला होता…
आता मुग्धाला राहावेना.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : लग्नापूर्वी व्हर्जिनिटी गमावणं योग्य की अयोग्य?
“काय संसार, संसार, लावलं आहे रे तुम्ही? लग्न काय फक्त संसार करण्यासाठी करायचं असतं का? आता गेला तो जुना काळ. आता लग्न का करायचं माहीत आहे का?”
सगळे जण डोळे विस्फारून, आता ही बया अजून नवीन काय सांगणार आहे बुवा.. या आविर्भावाने मुग्धाकडे पाहायला लागले.
“पाजळव तुझं ज्ञान, मुग्धा… आम्हा अडाण्यांना…” सम्या म्हणाला.
“ए तू गप्प रे सम्या… मुग्धा, बोल गं… ” सम्याच्या बोलण्याला अनय आणि रेवाची लगेच प्रतिक्रिया आली.
“लग्न हे कम्पॅनिअनशिपसाठी करायचं असतं, समजलं?”
पम्या, सम्या खाली पडायचेच बाकी होते…
“आता विचारा, ही काय नवीन भानगड?” मुग्धा त्यांच्या प्रतिक्रियेला प्रतिसाद देत म्हणाली.
“ किती गं तू मनकवडी मुग्धा! कस्सं तुला आमच्या मनातलं बरोब्बर कळतं? खरी मैत्रीण हो तू आमची…”
आणखी वाचा : नातेसंबंध : नात्यात नेमकं काय चुकतंय?
“ह! पुरे झालं. तर कम्पॅनिअनशिप म्हणजे साहचर्य. दोघांनी लग्नानंतर एकमेकांसमवेत घालवलेला वेळ. त्या वेळी एकमेकांजवळ मोकळेपणाने व्यक्त केलेल्या आपल्या भावना. इमोशनल शेअरिंग म्हणू शकता तुम्ही त्याला. तसंच, विविध विषयांवर एकत्र मारलेल्या गप्पा. सिनेमांविषयी, गाण्यांविषयी, वाचलेल्या पुस्तकांविषयी, एकत्र किंवा मित्रमैत्रिणींसोबत केलेल्या ट्रेकिंग किंवा प्रवासाविषयी किंवा रेवाला आवडतं तसं पाहिलेल्या छान प्रदर्शनांबद्दलसुद्धा! प्रत्येक माणूस विविध कलांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पाहत असतो. एकमेकांशी बोलताना, गप्पा मारताना, दुसऱ्याचे, म्हणजे इथे आपल्या जोडीदाराचे, वेगळे दृष्टिकोन कळतात. आपल्याला वेगळी दृष्टी मिळते. एक प्रकारे आपल्या माहितीत भर पडत राहते. दोन माणसे, त्यांची कौशल्ये , वैशिष्ट्ये वेगळी असल्याने एकमेकांकडून काही तरी वेगळं, नवीन शिकायला मिळतं राहातं. यात आपलीच वाढ होते. म्हणून याला इंटलेक्च्युअल शेअरिंग किंवा विचारांचे आदानप्रदान असेही म्हणता येईल.”
“ म्हणजे लग्न करायचेच असेल तर लग्नानंतर कम्पॅनिअनशिप याला तुमचं प्राधान्य असायला हवं, नाही का मुग्धा? तरच तुम्ही अशा शेअरिंग्ससाठी जाणीवपूर्वक वेळ काढणार..”
“एक्झॅक्टली”… मुग्धा उत्तेजित होत म्हणाली.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : ‘माझा मुलगा स्त्रियांची अंतर्वस्त्रे घालतो’
“म्हणजे आपली लग्नं झाल्यावर आपला हा कट्ट्यावरचा टाइमपास बंद.” पम्याला कल्पनाही करवेना…
“अरे, बंद कशाने? वीकएण्डना भेटूच की आपण… पण प्रायोरिटी?”… सगळ्या ग्रुपकडे बघत सम्याने विचारलं.
“आपल्या नव्या जोडीदाराला!” …सगळे हसत एकमुखाने म्हणाले.
“हं! दोन वेगळ्या आणि नव्याने भेटलेल्या माणसांमध्ये बॉण्डिंग व्हायला सुरुवात व्हावी म्हणून. आपण आता एकमेकांसाठी आहोत याची हळूहळू खात्री पटत जावी म्हणून…” मुग्धाने पुस्ती जोडली. “आपली मैत्रीदेखील आपण वेळ दिला एकमेकांना, भेटत राहिलो जमेल तसं, म्हणूनच तर वाढली आणि टिकली ना…”
“लग्न करण्यासाठी एवढंच रिवॉर्ड? एवढंच दोन शेअरिंग?” पम्यानं परत डोकं खाजवत विचारलं.
“नाही. अजून एक महत्त्वाचं शेअरिंग असते लग्नात. सेक्च्युअल शेअरिंग. अर्थात लग्नातलं लैंगिक सहजीवन; पण तुम्हाला धक्कांवर धक्के नको. म्हणून त्याबद्दल पुढच्या भेटीत बोलूयात का?”… असं म्हणत मुग्धा ‘बाय’ म्हणत गेलीही…
(क्रमश:)
vankulk57@gmail.com