अपूर्वा अनिताताईंकडे आली तेव्हा रागातच होती. तिने पर्स बाजूला भिरकावून दिली. डायनिंग टेबलावरील बाटलीतील पाणी घटाघट प्यायली आणि शेजारच्या खुर्चीत बसून राहिली. लेकीचं काहीतरी बिनसलंय हे समजण्याएवढ्या त्या सूज्ञ होत्या. त्याही तिच्या जवळच्या खुर्चीत बसल्या आणि तिला विचारलं,
“ऑफिसमधून लवकर निघालीस का? काही झालंय का ऑफिस मध्ये? टेन्शन आहे का कसलं?”
‘आई, मला ऑफिसमध्ये कसलंही टेन्शन नाही,पण मला तुमचंच टेन्शन आलंय.”
‘‘अपू, अगं, आमचं कसलं टेन्शन? मला काय झालंय?”
“आई, अगं, तू विक्रमच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या बाबतीत जे वागते आहेस, त्याचंच टेन्शन आलंय मला. तू आणि बाबांनी माझं लग्न थाटात लावून दिलंत, त्यासाठी बाबांनी कर्ज काढलं, इतके दिवस एक एक ग्रॅम करून जमवलेल्या सोन्याचे दागिने मला करून दिलेस, प्रत्येक सणाला रितिरिवाजानुसार काहीतरी देणं चालूच आहे, आणि आता मला दिवस गेले आहेत तर माझ्या बाळंतपणाची, त्यासाठीच्या खर्चाची जबाबदारीही तुम्ही घेणार, असं माझ्या सासूबाईंना सांगितलंस? या सर्व खर्चाची जबाबदारी तुम्हीच का घ्यायची? माझ्यासाठी तुम्ही किती करणार आहात? मुलीकडच्यांनीच हे सगळं का करायचं? माझा कोणताही खर्च आता तुम्ही करायचा नाही. माझ्या सासरकडच्या लोकांना तशीच सवय होईल आणि जावई म्हणून विक्रांतच्या एवढं पुढं पुढं करण्याचीही काहीच गरज नाहीये, तुमच्या वेळेस हे सगळं असेल पण आता जमाना बदलला आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : गच्चीवरची बाग : फ्लॅटच्या दाराबाहेरचा कोपरा

अपूर्वा बोलतच होती. तिचे आईवडील तिच्यासाठी जे करीत होते, त्याचं तिला ओझं वाटत होतं. मुली शिकलेल्या, नोकरी-व्यवसाय करणाऱ्या असल्या तरी अजूनही लग्नात ‘वर’ पक्षाचं वर्चस्व अधिक असतं. त्यांच्या म्हणण्यानुसार सगळं व्हायला हवं, त्यांची मर्जी सांभाळायला हवी याचं भान ‘वधू’ पक्षाला ठेवावं लागतं, हेच तिला आवडत नव्हतं. लग्न झाल्यानंतरही तिच्या आईबाबांनी प्रत्येक सण रितीरिवाजानुसार केला. दसऱ्याला सोन्याचं आपट्याचं पानं, दिवाळीच्या पाडव्याला सोन्याची अंगठी, संक्रांतीच्या सणाला तिळगूळ घातलेली चांदीची वाटी असं काही न काही चालूच होतं. हे सगळं का करायचं? मुलीचं लग्न करून दिल्यानंतरही तिच्या आई वडिलांनी ही जबाबदारी घ्यायची, हे तिला पटत नव्हतं. आई बाबांवर हे सगळं ओझं होत आहे, त्यांनी आपल्यासाठी किती केलंय. शिक्षणाचा, लग्नाचा एवढा खर्च केला. तरीही त्यांनी हे सगळं आताही का करायचं? आणि त्यामध्ये पुढची हद्द म्हणजे पहिलं बाळंतपण आहे ते ही त्यांनीच करायचं? हे तर तिला अजिबातच पटत नव्हतं आणि म्हणूनच ती आईकडे हे सर्व बोलायला आली होती.

आणखी वाचा : चॉइस तर आपलाच : मुलांच्या बोलण्यातल्या ‘बिटवीन द लाइन्स’

अनिताताईंना तिच्या बोलण्याचा रोख समजला होता. आपल्यामुळे आपल्या आई-वडिलांना त्रास होतोय याच तिला वाईट वाटत होतं. तशी ती पहिल्यापासून स्वाभिमानी आहे, कोणाकडूनही काहीही घ्यायला तिला आजिबात आवडत नाही, हा तिचा स्वभाव त्यांना माहिती होता. अनेक मुली लग्न झालं तरी हक्काने आईवडिलांकडून काही ना काही मागून घेतात, स्वतःचा अधिकार गाजवतात हेही त्यांनी पाहिलं होतं, पण अपूर्वा वेगळी होती. ती अशा पद्धतीने विचार करत आहे याचं त्यांना कौतुकही वाटलं,पण त्याच बरोबर त्यांच्या हेही लक्षात आलं, की तिच्या मनातील गैरसमज आणि सासरच्या लोकांबद्दल झालेला दुजाभाव दूर करायला हवा. असेच विचार घेऊन ती पुढे गेली तर सासर माहेर यातील अंतर कमी होण्याऐवजी ते वाढत जाईल. तिला शांत करणं आणि तिच्या विचारांमध्ये सकारात्मक भाव निर्माण करणं महत्वाचं आहे हे त्यांनी ओळखलं.

आणखी वाचा : Open letter : माय डिअर सासूबाई तुम्हीही कधीतरी… तुमच्या होणाऱ्या सुनेचे खास पत्र

“अप्पू बेटा, मी तुझ्या आवडीचे रवा-बेसनाचे लाडू केलेत,एक खाऊन बघ बरं आधी. कसा झालाय ते सांग मला आणि या दिवसांत आता डाएट वगैरे काही करायचं नाही हं, भरपूर खायचं, आता दोन जीवांची आहेस तू, आणि राग राग, चिडचिड तर आजिबात करायची नाही, मन अगदी प्रसन्न ठेवायचं.”
लाडू खाल्यानंतर अपूर्वा थोडी रिलॅक्स झालेली हे पाहून अनिताताईंनी तिच्याशी बोलायला सुरुवात केली, “अपूर्वा, प्रत्येक आई वडील आपल्या मुलीच्या लग्नाचं स्वप्न बघत असतात. मुलगी लहान असल्यापासून ते तिच्यासाठी काहीतरी नियोजन करतात. मग पैशांची गुंतवणूक असो, किंवा सोन्याची असो. आपली आर्थिक स्थिती तशी चांगली असल्यानं तुझ्या वयाच्या पाचव्या वर्षांपासून आम्ही हे नियोजन केलं होतं. विक्रांतचे स्थळ मिळाल्यानंतर लग्नामध्ये तुला किती दागिने घालायचे, लग्न कशा पद्धतीने करायचं याबाबत त्यांच्या कोणत्याही अटी कधीच नव्हत्या, परंतु आमचं स्वप्न होतं, म्हणून आम्ही तुझं लग्न थाटामाटात करून दिलं आणि आमच्या हौसेने आमच्या लेकीसाठी दागिने केले.

मुलीचं लग्न झाल्यानंतर ती माहेरचं घर सोडून सासरी राहण्यासाठी जाते तेव्हा तिला त्या घरात रुळायला वेळ लागतो, ज्या घरात तिचं बालपण गेलेलं असतं त्या ठिकाणी तिला पाहुणी म्हणून यावं लागतं, अशी आपण परकं झाल्याची भावना तिच्या मनात निर्माण होऊ नये म्हणून, लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षात आपल्या परंपरेप्रमाणे येणारे विविध सण माहेरी आणि सासरी सर्वांनी एकत्र येऊन करावे अशी प्रथा आहे. यामधून दोन्ही घराण्याच्या संस्कारांची ओळख होते. नवदांपत्याने यापुढे कसं वागावं याची शिकवण यातून मिळते. यामध्ये देण्याघेण्याचा भाग गौण आहे. आपापल्या इच्छेनुसार व क्षमतेनुसार हे सर्व करायचे असते. या प्रथांचं अवडंबर काही लोकांनी केलं आणि त्यातून माहेरहून हक्काने या गोष्टी मिळाल्याच पाहिजेत, अशी जबरदस्ती नव्यानं लग्न होणाऱ्या मुलीकडून होऊ लागली. त्यामुळे या प्रथा माहेरच्यांना त्रासदायक वाटू लागल्या. तुझ्या बाबतीत तशी गोष्ट नाही. आम्ही जे करतो आहोत, ते मनापासून आनंदाने आणि आमच्या लेकीसाठी करीत आहोत, इथं कोणाचीही जबरदस्ती नाही.

लग्न झाल्यानंतर जेव्हा मुलगी पहिल्यांदा गर्भवती होते, तेव्हा ती एका वेगळ्या भावनिक अवस्थेमध्ये असते. आपल्या जोडीदाराबरोबरच तिला तिच्या आईच्या सहवासाचीही गरज असते, त्यामुळेच पहिलं बाळंतपण माहेरी असावं, अशी प्रथा आहे. तो खर्च कोणी करायचा हे दोन्ही घराच्या संमतीने ठरवायचं असतं. अशा प्रथांचा चुकीचा अर्थ काढून लग्न झाल्यावरही मुलीची सर्व जबाबदारी आर्थिकदृष्ट्या तिच्या माहेरच्यांनी स्वीकारावी अशी जबरदस्ती केली जाते, मुलीला माहेरून गोष्टी घेऊन येण्यासाठी त्रास दिला जातो, हे चुकीचंच आहे,परंतु सगळ्याच ठिकाणी सासरचे लोक मतलबी असतात, त्यांना मुलीच्या माहेरच्या लोकांना त्रास द्यायचा असतो, असा समज करून घेणं चुकीचं आहे. आमच्यानंतर सगळं तुझंच आहे. त्यामुळे काही गोष्टी आधीच देतोय इतकंच. पण ते आम्ही द्यायलाच हवं, असं तुला अजिबात वाटत नाही, हे तुझं वेगळेपण आहे. याचं मला कौतुक आहे.

बेटा, आम्हांला त्रास होतो, आमचा खर्च होतो,याचं तू जे ओझं मनावर बाळगलं आहेस ना, ते आधी कमी कर. तुझं लग्न झालं असलं तरीही तू या घराचाही एक भाग आहेस. अनिकेत आणि तू आम्हांला वेगळे नाहीत. मुलगा आणि मुलगी यांना वाढवतानाही आम्ही दोघांना समान वागणूक दिलेली आहे, दोघांसाठी सर्व सारखंच केलं आहे, त्यामुळं तुझा कोणताही त्रास आम्हांला होत नाही. सासरची माणसं आणि माहेरची माणसं या दोन विरुद्ध पार्टी नाहीत. तुझ्या मनात सासरच्या लोकांबद्दल कोणताही आकस राहू नये आणि तू सासर-माहेर याची योग्य सांगड घालावीस असं मला आणि तुझ्या बाबांनाही वाटतं.”

आईच्या बोलण्याचा अपूर्वा विचार करीत होती आणि त्याचा मनातल्या मनात अर्थही लावत होती.
“हो आई, विक्रांत आणि माझी सासरची सर्व माणसं चांगली आहेतच, त्यांनाही वाटतं की,माझे आई बाबा माझ्यासाठी खूप करतात,पण तुमच्या उत्साहावर त्यांनी कधीही पांघरूण घातलं नाही, तुमच्या इच्छेप्रमाणे सर्व करून घेतलं,परंतु माझाच गैरसमज झाला होता,तुझ्या बोलण्याचा मी नक्की विचार करेन. मी आता सासर आणि माहेर दोन्हीकडचं कोड कौतुक करून घेणार आणि माझी फॅमिली मोठी झाली आहे याचा आनंद घेणार.” आता अनिताताईंच्या मनावरील दडपणही कमी झालं होतं. लेकीच्या आवडीची स्ट्रॉंग कॉफी तयार करण्यासाठी त्या स्वयंपाक घराकडे वळाल्या.
(smitajoshi606@gmail. com)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marriage counseling both the families from bride and groom must come together for better relationship vp