marriage relationship “कोमल, तू? आज सूर्य नक्की कोणत्या दिशेला उगवलाय बघायला हवं. आज चक्क भाची मावशीच्या घरी?”
“मावशी, का उगाचच चेष्टा करतेस माझी. अगं, मध्यंतरी तुझ्याकडे यायला मला जमलं नाही, पण आता उगाचच टोमणे मारू नकोस हं! आज हाफ-डे काढून तुझ्याकडे आली आहे, म्हणजे तसंच काही तरी काम असेल ना.”
मावशीचा पाहुणचार झाल्यानंतर कोमलने विषयाला हात घातला. “मावशी, तुला माहितीच आहे, माझा घटस्फोट होऊन २ वर्षं झाली. मी कौस्तुभबरोबर ७ वर्षं संसार केला, त्याच्या स्वभावामुळे आणि वागण्यामुळे मला त्याच्याकडे राहणेच अशक्य झाल्यावर मी सोहमला घेऊन त्याच्या घरातून बाहेर पडले.
आणखी वाचा : मँचेस्टर मॅरेथॉनमध्ये लक्ष वेधलं ते संबलपूरी साडीने!
“कोर्टकचेरी, आरोप-प्रत्यारोप मला नको होते, मला त्याचा पैसाही नको होता, फक्त सोहम हवा होता, म्हणून मी परस्परसंमतीने घटस्फोट घेऊन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सोहमसाठी आई आणि बाबा या दोन्हीही भूमिका मी करण्याचं ठरवलं. माझं सगळं व्यवस्थित चालू होतं आणि मध्यंतरी त्याने फोन करून मला भेटण्याची विनंती केली, पण मी त्याला भेटण्यास नकार दिला. परवा कौस्तुभ माझ्या ऑफिसमध्येच आला, मला बोलायचंय म्हणाला. माझा अगदीच नाइलाज झाला, म्हणून मी ऑफिसची वेळ संपल्यावर जवळच्या कॅफेमध्ये त्याला भेटायला गेले. आता त्याला झालेल्या सर्व गोष्टींचा पश्चात्ताप होतो आहे, तेव्हाही त्याला घटस्फोट घ्यायचाच नव्हता, पण मी ऐकण्यास तयार नव्हते म्हणून त्यानं घटस्फोटाची तयारी दाखवली, असं तो म्हणतोय. अजूनही तो मला आणि सोहमला विसरू शकत नाही आणि त्याला आता सोहमला भेटण्याची इच्छा आहे. आपण परत एकत्र येऊ या, असंही तो म्हणत होता. मी तर त्याला धुडकावून लावलं आणि पुन्हा माझ्या आणि सोहमच्या आयुष्यात डोकावूनही बघायचं नाही, असं सांगून टाकलं.
आणखी वाचा : गृहिणी असलेली आई की, नोकरदार आई? हायकोर्टाने स्पष्ट केले की…
“मी सोहमला त्याच्या बाबाचं नावदेखील काढू देत नाही. मीच तुझी आई आणि मीच तुझा बाबा, असं त्याला सांगत असते; पण आता तो मोठा होऊ लागलाय, आपला बाबा आपल्यासोबत राहात नाही, हे त्याला कळू लागलंय. त्याची नाराजीही मला समजते. कौस्तुभला भेटल्यापासून माझ्याही मनात चलबिचल चालू झाली आहे. मावशी, माझं आयुष्य म्हणजे सोहम आहे, त्याला आयुष्यात काहीच कमी पडू नये असं मला वाटतं. मी काय करावं? माझं काही चुकतंय का?”
आणखी वाचा : नातेसंबंध: परदेशातल्या मुलाचं कौतुक नि इथल्यांचा अव्हेर?
कोमल बराच वेळ एकटीच बोलत होती आणि मावशीकडे आपलं मन मोकळं करत होती. आईबाबा केवळ भावनाप्रधान होऊन काय करायचं ते सांगतील, दादा म्हणेल, ‘तुझ्या आयुष्याचा निर्णय तू घे’, पण मावशी नक्कीच आपल्या विचारांना योग्य दिशा देईल याची तिला खात्री होती. तिचं सर्व बोलणं मावशीनं ऐकून घेतलं. तिच्या मनाची अवस्थाही मावशीला कळत होती म्हणूनच तिनं कोमलला विचारलं, “कोमल, जेव्हा कौस्तुभ तुझ्या ऑफिसमध्ये आला, तेव्हा त्याला पाहून तुझ्या मनात नक्की काय विचार आले होते?”
“मावशी, खरं सांगू का? आधी मला त्याचा राग आला होता; पण त्याच्याकडे बघून मला मनातून खूप वाईट वाटलं. त्याची तब्येत खूपच खराब झाली आहे. गाल आत गेलेले, दाढी वाढलेली. स्वतःकडे तो लक्षच देत नसावा असं वाटलं. ऑफिसची जबाबदारी वाढली आहे, प्रमोशन मिळालं आहे; पण आनंदाचे क्षण शेअर करायलाही कोणी नाही, असे तो म्हणाला. तेव्हाही मी त्याच्या मैत्रिणीचा विषय काढला, पण ‘तो विषय काढू नकोस, ती परदेशात तिच्या फॅमिलीसोबत कायमस्वरूपी स्थायिक झाली आहे, आमचा आता संपर्क तुटला आहे,’ असे म्हणाला.
‘ती सोडून गेली, म्हणून आता पुन्हा माझ्याकडं आलास का?’ असाही खोचक प्रश्न मी त्याला विचारला, पण या वेळेस तो चिडला नाही आणि म्हणाला, ‘मी कधीच तिच्यात ‘त्या’ अर्थानं अडकलो नव्हतो. ती एक चांगली मैत्रीण होती आणि तिच्या पडत्या काळात मी तिला मदत करीत होतो, पण जरा जास्तच वाहत गेलो, हे मान्य आहे. तू तुझ्या जागी बरोबरच होतीस, ज्या वेळी तुला आणि सोहमला माझी गरज होती, तेव्हा मी तुमच्या सोबत नव्हतो, माझं कर्तव्य पूर्ण करण्यात मी चुकलो.’
“तो एका अगतिकतेने बोलत होता, पण जे व्हायचं ते होऊन गेलं. आता बोलण्यात काय अर्थ आहे, असं मला वाटलं. मी फक्त त्याच्या चुका दाखवत होते, पण तो शांतपणे ऐकून घेत होता, विरोध करीत नव्हता. एका क्षणी मला त्याची कीव आली. हा आधीच असा शांत राहिला असता, मी का चिडते हे समजून घेतलं असतं, तर कदाचित घटस्फोट झालाही नसता, असंही वाटून गेलं.”
“कोमल, एवढ्या २ वर्षांत तुला कधी त्याची आठवण आली नाही?”
“मावशी, आठवण येत होती गं. त्याच्या सहवासातील एक एक क्षण आठवायचा. सुरुवातीच्या काळात आम्ही दोघेही एकमेकांत हरवून गेलो होतो, एकमेकांना सोडून राहात नव्हतो. मी माहेरीही राहायला जायची नाही. सगळं छान चालू होतं. आम्हाला छान गोंडस बाळही झालं, पण नंतर आमच्या संसारालाच दृष्ट लागली, ती आसावरी आमच्या आयुष्यात आली आणि सगळं बिघडतच गेलं. घटस्फोट झाल्यानंतरही कित्येक वेळा, मी झोपेतून दचकून उठायची आणि कौस्तुभलाच हाका मारायची आणि नंतर मीच मला भानावर आणायची. सात वर्षं त्याच्या सहवासात काढली, कसं विसरता येईल गं त्याला? पण मनात आलेले विचार मी दाबून टाकायची, तो दुष्टपणे वागला. त्याला विसरायचं आहे. आपल्या बाळासाठी पुढे जायचे आहे, हे मनात रुजवण्याचा मी प्रयत्न करीत होते. आमच्या खूप चांगल्या आठवणीही होत्या, पण प्रयत्नपूर्वक त्या मी बाजूला सारत होते.”
मावशीला तिच्या मनातील भावनांची जाणीव झाली, ती म्हणाली, “ कोमल, रागाच्या आवेशात तुम्ही दोघांनीही ,‘आता सोबत राहणं शक्य नाही’ असं ठरवून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलात. जखमा ओल्या असताना त्याच्या वेदना अधिक असतातच. त्यांना ओसरायला तुम्ही वेळच दिला नाहीत, सहा महिन्यांत तुमचं नातं संपवलंत. तुझा राग अनावर झाला होता. कौस्तुभच्या बाबतीत तू खूप पझेसिव्ह होतीस, पण त्याची मैत्रीण त्याच्या आयुष्यात आली आणि माझा कौस्तुभ फक्त माझा राहिला नाही, याचं तुला दुःख झालं. या वेळी त्यानंही तुझा राग समजून घ्यायला हवा होता, पण त्यानंही रागावून जाऊन विभक्त होण्याची भाषा केली. तुम्ही दोघंही कोणाचंही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता, पण निर्णयाची घाई झाली एवढं मात्र खरं. कौस्तुभचाही राग आता निवळला आहे, म्हणूनच आता वाद न घालता तुझ्याशी तो शांततेने बोलतो आहे, तुझ्या रागाचं कारण समजून घेण्याइतपत समंजसपणा त्याच्यामध्ये आला असेल तर तूही शांतपणे त्याच्याशी बोल. कायद्याने तुम्ही आता पती-पत्नी राहिलेला नाहीत, पण एक माणुसकी म्हणून आणि तुझ्या मुलाचा बाप म्हणून त्याला समजून घे, त्याचीही बाजू ऐकून घे. सोहमलाही वडिलांचे प्रेम मिळू देत. कौस्तुभने अनेक चुका केल्या असतील, पण त्यात सोहमची काय चूक? त्याला पित्याचं प्रेम का मिळू नये? पती-पत्नी म्हणून तुम्ही पुन्हा एकत्र याल किंवा नाही, हे आताच सांगता येणार नाही, पण एका मुलाला तरी त्याच्या पित्याला तुला भेटवता येईल. त्या दोघांचं नातं तुटायला नको आणि कोणाच्याही प्रेमापासून त्याला वंचित राहायला नको, हा प्रयत्न तू करू शकतेस. त्याच्या भेटीच्या कालावधीत कौस्तुभमध्ये खरंच बदल झाला आहे की नाही, हेही तुला अजमावता येईल आणि त्यातून पुढचा निर्णय घेणं सोयीचं होईल.”
“मावशी, तू म्हणतेस ते बरोबर आहे. केवळ कायद्याच्या निर्णयामुळे मनातील नाती पुसून टाकता येत नाहीत, हे खरं आहे. मी सोहमची आणि कौस्तुभची भेट घडवून आणेन आणि पुढं कोणता निर्णय घ्यायचा त्याचाही विचार करेन. फक्त आता कोणताही निर्णय घेताना घाई करणार नाही.” कोमलचे विचार ऐकून मावशीला बरं वाटलं. परमेश्वर दोघांनाही चांगली बुद्धी देवो, अशीच प्रार्थना मावशीने मनातल्या मनात केली.
(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत)
smitajoshi606@gmail.com