डॉ. स्मिता प्रकाश जोशी
नाती म्हटली की त्यात वाद होणारच. लग्नाच्या नात्यातही वाद सतत होत असतात मात्र ते नवराबायकोनेच हाताळणं उत्तम. तेही घरच्याच पातळीवर. पोलिसांत जाणं, न्यायालयात जाणं याने नातं चांगलं होण्याएवजी चिघळण्याचीच जास्त शक्यता असते.
“सुरेखा, अग डोअर बेल वाजते आहे, दार उघड.”
सुधाकरराव सकाळची योगासने करीत होते, म्हणून त्यांनी पत्नीला दार उघडण्यास सांगितले,पण एवढ्या सकाळी कोण आलं असेल? असे विचार मनात चालू असतानाच सुरेखाताईंनी दार उघडल्यावर त्यांना सई दारात उभी दिसली. ‘एवढ्या सकाळी ही का आली असावी? असा विचार त्यांच्या मनात आला, पण त्यांनी स्वतः चा प्राणायाम चालू ठेवला. त्यांचे डोळे बंद होते, परंतु कान मात्र दारावरील माय-लेकींच्या संभाषणाकडे होते.
“सई, अगं तू अचानक कशी? काही कळवलं नाहीस येण्यापूर्वी,”, आईने आश्चर्याने तिला विचारलं.
“आता मला माहेरी यायलाही अँपॉईंटमेंट घ्यावी लागणार आहे का? माझ्या घरी मी केव्हाही येऊ शकत नाही ?”
“अगं तसं नाहीये, तू नेहमी येण्यापूर्वी फोन करतेस म्हणून विचारलं.”
“ आई, मी सागरचं घर सोडून आलेय.”
सईचे शब्द ऐकताच, सुधाकररावांच्या प्राणायामांमधील श्वासांची गती वाढली, पण ते उठले नाहीत. सुरेखा ताई तिला विचारत होत्या. “अगं पण झालं काय असं? तुला काही त्रास दिलाय का सागरने?”
“आई, काल रात्री त्याने मला मारलं.”
“ काय सांगतेस काय? तू बैस बर आधी. घे. पाणी पी आधी, आणि सांग बरं मला काय झालंय ते. माझ्या लेकरावर हात उचलण्याची त्याची हिंमत कशी झाली?”
हेही वाचा >>>विवाह समुपदेशन: जोडीदार – कल्पनेतील आणि वास्तवातील!
त्यानंतर सईने सागर आणि तिच्यामध्ये झालेल्या वादाचं वर्णन केलं. सागरच्या ऑफिसमध्ये ‘टार्गेट ॲचिव्ह’ झाल्याची पार्टी होती. त्याच्या ऑफिसच्या कलीग सोबत तो तेथे गेला होता. त्यानं त्याच्या टीम मधील लेडीज कलीगस् सोबत फोटो काढले आणि त्या मुलींनी ते फोटो इन्स्ट्राग्रामवर टाकले होते, एका मुलीने सागरचा आणि तिचा डीपी स्टेट्सला ठेवला होता, ही गोष्ट सईला अजिबातच आवडली नाही, याबाबत तिने त्याला जाब विचारला आणि त्यांच्या दोघांत वाद सुरू झाले. हळूहळू गाडी दोघांच्याही आईवडिलांच्या संस्कारावर घसरली आणि सई त्याच्या विधवा आईच्या चारित्र्याबद्दल अपशब्द बोलली, त्यामुळे सागर चिडला आणि त्याने तिच्या श्रीमुखात भडकावली.
“आई, बघ अजून त्याच्या हाताची बोटे माझ्या गालावर उमटलेली आहेत. रागाच्या भारात तो काहीही करू शकतो. काल रात्री खूप उशीर झाला म्हणून मी घरातून निघू शकले नाही. दरवाजा बंद करून माझ्या रूममध्ये बसले आणि पहाटेच, त्याला न सांगता इकडे निघून आले आहे.”
“ सई, अगं रात्रीच फोन करायचा होता ना, आम्ही तुला घ्यायला आलो असतो. रात्रीतून त्याने तुला काही
केलं असतं तर? नाहीतर अशा वेळेस पोलिसांना फोन करायचा होतास ना? पोलिसांकडून स्त्रियांना संरक्षण मिळतं.”
“ मला काही सुचलं नाही, पण त्याने मला मारून माझा अपमान केला आहे. मला पोलीस कंप्लेंट करायचीच आहे. त्याला चांगलाच धडा शिकवायचा आहे. ”
“ आम्ही आयुष्यात कधीही दोन बोटं तुला लावली नाहीत, इतक्या लाडकोडात तुला वाढवलं, इतका खर्च करून तुझं लग्न करून दिलं ते काय, त्याचा मार खाण्यासाठी? नाही… नाही,आता सागरला त्याची जागा दाखवायलाच हवी. मी लगेच तयार होऊन तुझ्या सोबत येते, आपण दोघीही पोलीस चौकीत जाऊ आणि एफ आय आर करून त्याच्यावर गुन्हा दाखल करू, समजतो कोण तो स्वतःला? माझ्या मुलीला मारल्याची किंमत त्याला भोगावीच लागेल.”
“ हो आई, तू म्हणतेस तसंच आपण करूया, तू लवकर आवर आपण लगेच निघू.”
हेही वाचा >>>आहारवेद: वातविकारांवर प्रभावी मेथी
इतक्या वेळ सुधाकरराव माय-लेकीचं संभाषण ऐकत होते. योगा मॅटची गुंडाळी करून त्यांनी जागेवर ठेवली आणि ते सोफ्यावर येऊन बसले. “सई, सुरेखा कुठं निघालात तुम्ही?”
सुरेखाताई हातातील काम ठेवून आल्या आणि पुन्हा झालेला सर्व प्रकार सुधाकरराव यांना सांगितला.
“ आता तुम्हीच सांगा, एवढं सगळं घडल्यावर आपण काय हातावर हात ठेवून गप्प बसायचं का? आपल्या मुलीवर अन्याय झाला आहे, तिला न्याय मिळायलाच हवा.”
“ पोलीस चौकीत कंप्लेंट केल्यावर तिला न्याय मिळेल?”
“हो, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल, सागरची नोकरीही जाऊ शकते. आपल्या मुलीला मारलं आहे त्याने, त्याला आणि त्याच्या कुटुंबाला शिक्षा व्हायलाच हवी.”
“आणि हे सगळं झाल्यावर मुलीचा संसार वाचेल?”
आता मध्येच सई बोलली,
“बाबा,पण त्याला धडा शिकवायलाच हवा ना? तो का असा वागला माझ्याशी?”
“ अगं,पण त्याला धडा शिकवून तू तुझा संसार मोडणार आहेस, हे कळतंय का तुला?”
सुरेखाताई आता चांगल्याच संतापल्या होत्या,
“अहो, मग काय आपण गप्प बसायचं? मुलीची बाजू म्हणून मुकाट्यानं सहन करीत रहायचं. असं घडलं तर माझ्या मुलीच्या जीवाला तिथं धोका आहे, आपण काहीही केलं तरी चालतं असा त्यांचा समज होईल. माझ्या मुलीवर झालेला कोणताही अन्याय मी सहन करणार नाही, खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी राहीन. मग हे लग्न मोडलं तरी चालेल. माझी मुलगी मला जड नाही. मी आयुष्यभर माझ्या मुलीला सांभाळायला तयार आहे, पण पुन्हा मार खायला त्याच्याकडे पाठवणार नाही,”
हेही वाचा >>>चॉइस तर आपलाच : जगण्यातल्या अपघातांना सामोरं जाताना…
सुरेखा एक आई म्हणून प्रेमापोटी सर्व बोलत असली तरी याबाबतीत ती चुकत आहे, हे सुधाकरराव यांच्या लक्षात येत होतं. या परिस्थितीत संयम ठेवून सारासार विचार करणं महत्वाचं आहे याची त्यांना जाणीव होती आणि हेच त्यांना पत्नीला समजावून सांगायचे होते,“ सुरेखा, अगं आततायीपणा करून कोणताही निर्णय घेणं योग्य नाही. सागरला त्याची चूक समजणे आणि त्याच्या वागण्यात बदल होणे हे महत्वाचे आहे. एकत्र राहात असताना कुटुंबात कधी काही व्यक्तींच्या चुका होतात,पण त्या घरातच समजावून सांगून मिटवायला हव्यात. नात्यात एकदा कायदा घुसला की तो भुंग्यासारखा नाती पोखरून काढतो. नात्यातील माया,ममता,प्रेम, वात्सल्य संपून जातं. ती नाती समाजासाठी टिकली तरी त्यातील प्रेमाचा ओलावा संपलेला असतो. म्हणूनच एकमेकांचे गुण-दोष लक्षात घेऊन आणि परिणामांचा विचार करून पुढचं पाऊल टाकायला हवं. सागर कडून ही चूक झाली, पण तो वारंवार पूर्वीपासून तिला मारहाण करतोय का? तिला मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न त्यानं कधी केलाय का? या गोष्टीचाही विचार कर आणि सुरेखा, तू मुलीवर आंधळं प्रेम करू नकोस. एका हाताने टाळी वाजत नाही, आपल्या मुलींचीही चूक झालेली आहेच ना? ती शीघ्रकोपी आहे हेही आपल्याला माहिती आहे,मग आपण सागरची बाजूही ऐकून घेऊ, कितीही वैचारिक मतभेद झाले तरीही एकमेकांच्या अंगावर हात उचलायचा नाही, हे आपण समजावून सांगू. मुले चुकतात,मोठ्यांनी त्यांना समजावून सांगायला हवं, छोट्या छोट्या गोष्टीसाठी पोलिसांकडे जाणं, कायद्याचा आधार घेणं योग्य नाही. त्याला शिक्षा झाली तर हिला न्याय मिळणार आहे का? सूडाच्या भावनेने कोणतेही पाऊल उचलणे योग्य नाही, त्याचा दूरगामी काय परिणाम होणार आहे याचाही विचार व्हायला हवा आणि सुरेखा सईचं लग्न झालं आहे, आपण तिच्या पाठीशी आहोतच, पण तिचे निर्णय तिला घेऊ देत, तसंच काही घडलं तर, ती आयुष्यभर तुला दोष देत राहील याचाही विचार कर.”
सई फोन हातात घेऊन आली आणि म्हणाली,“आई, सागरचा मेसेज आला आहे, तो सॉरी म्हणतो आहे, आत्ता इकडेच यायला निघाला आहे. खरंच आई, माझंही चुकलंच. मी लगेच त्याच्या कलीगबदद्ल शंका घ्यायला नको होती. आणि त्याच्या आईबद्दलचं माझं मतही चुकीचच होतं.”
सईचा राग मावळल्याचे तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. सुरेखा ताईंकडे पाहून सुधाकरराव म्हणाले,
“ बघितलंस सुरेखा, मुलांच्या वादात आपण लक्ष घालायचं नाही, शक्यतो त्यांचे प्रश्न त्यांना मिटवू द्यायचे, गरज पडली तर आपण आहोतच,पण नात्यात कायदा आणण्याचा विचार यापुढे कधीही करू नकोस, सागर बरोबरच सईलाही काही गोष्टी समजावून सांगणे गरजेचे आहे.”
सुरेखा ताईंना सुधाकररावांचे म्हणणे पटले, आपण उगाचंच राईचा पर्वत केल्याचं त्यांनाही जाणवलं, आपणच बदलायला हवं हा विचार त्यांनीही केला.
(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत)
smitajoshi606@gmail.com