डॉ. स्मिता प्रकाश जोशी
“ताई, म्या त्या शेजारच्या काकूंच्या घरी आज कामाला जाणार न्हाय, मी तुमच्याकडं आली व्हती ते त्यासनी सांगू नका.”
“सावित्री, अगं त्या काकू वयस्कर आहेत, असं त्यांच्याकडे कामाला अचानक दांडी मारून कसं चालेल?”
“त्यांची लई कटकट असतीया.”
“त्यांना ज्या पद्धतीनं काम हवंय तसं तू कर म्हणजे त्या कटकट करणार नाहीत.”
“ताई, कसंबी काम करा, त्यांना पटतच नाही, मला त्यांचं काम करायचं न्हाय, पण साहेब लई चांगलं हायती म्हनूनशान त्यांच्या शब्दखातर इतकं दिस काम सोडलं न्हाय, मला आज घरला लवकर जायचं हाय, म्हनून मी आज जाणार नाय.”
सावित्री आणि कावेरीचा संवाद चालू होता. ती त्यांच्या घरी १० वर्षांपासून काम करीत होती. तिचं काम अतिशय स्वच्छ आणि नीटनेटकं तर होतच, पण ती विश्वासू होती. घरात कोणीही नसलं तरी शेजारच्या घरातून चावी घेऊन सर्व काम करून ठेवायची. या घराचं त्या घराला कधी सांगायची नाही, पण निलम ताईंचं आणि तिचं आजिबात पटायचं नाही. अर्थात त्यांचं सध्या कुणाशीच पटत नव्हतं. खरं तर त्या मनमिळाऊ आणि सर्वांशी जमवून घेणाऱ्या आहेत, हे कावेरीला माहिती होतं, मग आताशा त्या असं का वागतात, हे कळत नव्हतं. काल वॉचमनही त्यांची तक्रार करीत होता. कावेरी विचारात मग्न असतानाच दारावरची बेल वाजली. तिनं दार उघडलं तर निलमताईंची मुलगी सेजल समोर उभी होती, “अगं, सेजल तू? आज इकडे कशी काय वाट चुकली? तू संसारात अगदी रममाण झालीस हं, आईकडंसुद्धा उभ्या उभ्या येत असतेस, तुला आमच्याकडे यायला तर वेळच नसतो.”
“हो, काकू खरं आहे, पण आज मी आईला नाही तर, तुम्हांलाच भेटायला आली आहे, माझ्या आईबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं.” सेजल घरात आली.
“काकू, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, पण तुम्ही मानसोपचार क्षेत्रात काम करता म्हणून तुमच्याशी मोकळेपणाने बोलायला आली आहे. माझी आई सध्या अतिशय अस्वस्थ आहे, सर्वांना ती खूप टाकून बोलते, अपमान करते, त्यामुळं सध्या माझं आईकडं येणंही कमी झालं आहे, माझ्या सासरच्या लोकांना तर मी इकडं फिरकूही देत नाही आणि तिलाही माझ्या घरी बोलवत नाही. पप्पा रिटायर्ड झाल्यानंतर आता दोघेही छान फिरतील, एन्जॉय करतील असं वाटलं होतं, पण तिला कुठंही घेऊन जायचं म्हणजे पप्पांना खूपच टेन्शन येतं. ती कुणाशी कधी चिडून बोलेल ते सांगता येतं नाही. ती अशी नाहीये, पण आता अशी का वागते हे मला कळत नाही. तिला काही मानसिक आजार झाला असेल का? अशी शंका मला वाटत राहते, पप्पा म्हणतात, ‘तू तिच्याकडे दुर्लक्ष कर. तू टेन्शन घेऊ नको,’ पण मला तिची सतत काळजी वाटते. आईच्या वागण्यात बदल होणं गरजेचं आहे, त्यासाठी मी काय करू?”
सेजल आईच्या बदललेल्या स्वभावाबद्दल खूप काही सांगत होती. तिच्या वागण्यात हा बदल कशामुळं झाला असेल हे तिला समजत नव्हतं, पण आईनं पूर्वीसारखं छान वागावं असं तिला वाटत होतं. कावेरीनं तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं आणि काही गोष्टी तिच्या लक्षात आल्या, ते तिनं सेजलला समजावून सांगण्यास सुरुवात केली.
“सेजल, तुझे पप्पा खूप मोठे अधिकारी होते, समाजात त्यांना खूप मान होता. इतके दिवस सरकारी अधिकारी म्हणून त्यांच्या दिमतीला नोकरचाकर, पोलीस संरक्षण, शोफर असलेली गाडी, सर्व काही होतं, पण त्यांच्या निवृत्तीनंतर आता ते काहीही राहिलं नाही. ” कावेरी बोलत असताना सेजलनं मध्येच तिला थांबवलं.
“काकू, अहो, हे सर्व पप्पांना माहिती आहे आणि ते त्यांनी स्वीकारलेलंही आहे. या सर्व गोष्टींची त्यांची मानसिक तयारीही आहे, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीए, प्रॉब्लेम आहे तो आईमध्ये. खरं तर आम्हाला असं वाटलं होतं अधिकाराची खुर्ची गेल्यानंतर पप्पा कसे वागतील? त्यांना सर्वसाधारण आयुष्य जगता येईल का? सतत बिझी असणारा माणूस निवृत्तीनंतर रिकामा बसला तर त्याला काही त्रास होईल का? पण पप्पांनी आपलं सर्व रुटीन व्यवस्थित मॅनेज केलं आहे. त्यामुळं त्यांची काहीच चिंता नाही, प्रॉब्लेम फक्त आईचाच आहे.”
“सेजल, अगदी बरोबर म्हणत आहेस, तेच मी तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. तुझे पप्पा निवृत्त झाले आहेत, त्यांनी स्वतःला स्वीकारलं आहे आणि परिस्थिती योग्य पद्धतीनं हाताळली आहे, पण तुझी आई निवृत्त झालेली नाही.” कावेरीचं हे बोलणं ऐकून सेजलला आश्चर्यच वाटलं. ती म्हणाली, “अहो काकू, पण आई नोकरी करतच नव्हती, मग ती निवृत्त होण्याचा प्रश्नच येत नाही.”
कावेरी हसली आणि तिनं तिच्या मुद्द्याचं स्पष्टीकरण केलं. “काय आहे सेजल, तुझे पप्पा मोठे सरकारी अधिकारी असल्यानं तुझ्या पप्पांसोबत आईलाही तेवढाच मान आणि आदर मिळत होता. पप्पांसोबत ती प्रत्येक कार्यक्रमाला जात होती. त्यांच्या ऑफिसमधील अधिकारी व कर्मचारी वर्ग, घरात असणारे सरकारी नोकर-चाकर, ड्रायव्हर हे सर्वजण आईला मॅडम म्हणून ओळखत होते. त्या अधिकार पदाचा मानमरातब खरं तर आईही अनुभवत होती. पप्पांना त्यांच्या अधिकारानुसार ऑफिसमध्ये आणि त्यांच्या निवासस्थानीही सर्व स्टाफ मिळालेला होता. त्यांच्याकडून ती अधिकारवाणीनं कामं करवून घेत होती, पण आता पप्पा निवृत्त झाल्यानंतर त्यांचं मोठं शासकीय निवासस्थान-मोठा बंगला तिला सोडावा लागला. शासकीय गाडी, ड्रायव्हर, कूक, सफाई कामगार हे सर्व तिला सोडावं लागलं. पप्पा नोकरीत असताना तिला मिळणारा आदर आणि मानसन्मान बंद झाला. तिचं मॅडम म्हणून मिरवणं थांबलं. या सगळ्याचा मानसिक त्रास तिला होत आहे. निवृत्त झाल्यावर पप्पांनी काय करावं?, याबाबत तुम्ही विचार केला. त्यांनीही सर्व शासकीय अधिकाऱ्यांना करावी लागते तशी स्वतःची मानसिक तयारी करून घेतली. परंतु आईच्या मानसिकतेचा विचार कोणीही केला नाही. पप्पा निवृत्त होताना तिलाही निवृत्त होणं गरजेचं आहे, हे तिच्याही लक्षात आलं नाही आणि तुमच्यापैकी कुणाला सुचलं नाही, तिला काय वाटत असेल? ती पुढं काय करणार आहे, याबद्दल सहज दुर्लक्ष झालं. कारण आई नोकरी करतच नव्हती त्यामुळे ती निवृत्त होण्याचा प्रश्नच येत नाही, असंच तुम्हांला वाटत राहिलं. आपल्या हातातील सत्ता गेल्यानंतर काही काळ तरी त्रास होत असेलच याकडं मात्र दुर्लक्ष केलं गेलं.
तुझ्या आईला वर्तमानात आणणं आणि वर्तमानात जगायला शिकवणं महत्त्वाचं आहे. निवृत्ती तिनंही स्वीकारायला हवी यासाठी प्रयत्न करायला हवेत. पप्पांनी मोकळेपणाने तिच्याशी बोलायला हवं. तिच्या मनाची तयारी करून घ्यायला हवी. तिच्या सध्याच्या वागणुकीमुळं तिच्यापासून दूर न जाता, तिला दूर न करता, हळूहळू तिला वास्तवात आणायला हवं. सेजल, काळजी करू नकोस, तुझ्या आईला कोणताही मानसिक आजार झालेला नाही, पण काही गोष्टींचा स्वीकार करणं आवश्यक आहे. मात्र हो, जर तिच्याकडं दुर्लक्ष केलंत तर ती कदाचित नैराश्यात जाऊन मानसिक रुग्ण होऊ शकते. तुम्ही सर्वांनी मिळून तिला वेळ द्या, वेगवेगळ्या कामात तिला गुंतवून ठेवा, तुझ्या पप्पांनी तिच्याशी वागताना त्यांच्या वागण्यात-बोलण्यात काही बदल करायला हवेत, त्यांचीही ती तयारी हवी.”
कावेरीचं स्पष्टीकरण सेजलला भावलं. खरंच, आपण याबाबत आईचा कधी विचारचं केला नाही, याची तिला खंतही वाटली. तिच्यापासून आपण दूर होत चाललो होतो, तिला अशा मानसिक अवस्थेत एकटंच सोडत होतो याचं वाईटही वाटलं, “काकू, धन्यवाद आज तुमच्याकडून सगळं समजून घेतल्यामुळं आता मलाही माझ्यात बदल करता येतील. मी पप्पांनाही तुमच्याशी बोलायला सांगेन, आणि आईनं लवकरात लवकर निवृत्त कसं व्हावं यासाठी प्रयत्न करता येतील.
कावेरीकाकूंचे आभार मानल्यानंतर ‘आईला भेटण्यासाठी मी आलेलीच नाही’, असं म्हणणारी सेजल कावेरीच्या घरातून थेट आईकडंच गेली, तिच्या निवृत्तीची तयारी तिला करवून घ्यायची होती.
(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत)
smitajoshi606@gmail.com