डॉ. स्मिता प्रकाश जोशी

“ रेवा, तुला दिसत नाही का किती पसारा पडलाय घरात? धुतलेले कपडे व्यवस्थित घड्या घालून ठेव असं तुला मी ऑफिसला जाताना सांगितलं होतं. मी जाऊन परत आले तरी दिवसभर कपडे तसेच बेडवर पडून आहेत.”

a father cried a lot while giving send off to his daughter in wedding
शेवटी बापाचं काळजी ते! मुलीला सासरी जाताना पाहून भर मांडवात वडील ढसा ढसा रडले! बाप-लेकीचा Video होतोय व्हायरल
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
woman police officer stealing bananas from elderly women video viral on social media
स्कूटरवरून आली अन् वृद्ध महिलेला…, महिला पोलीस अधिकाऱ्याची भररस्त्यात दादागिरी? VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Emotional Video of father went viral on social media shows dads hardwork
एका बापाची मजबुरी! कोणत्याच मुलावर ‘हे’ बघायची वेळ येऊ नये; VIDEO पाहून व्हाल निशब्द
Gym trainer ends life over dispute with boyfriend send video to mother don't leave him shocking Photo
PHOTO: सॉरी मम्मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली…त्याला सोडू नको” आईला शेवटचा मॅसेज करुन संपवलं आयुष्य
Father daughter kanyadan emotional video goes viral father daughter bonding video
“हा क्षण का असतो मुलींच्या आयुष्यात?” लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा VIDEO

“ रोहन, तुला मी लाइटचं बिल भरायला सांगितलं होतं, आणि सिलेंडर बुक करायला सांगितला होता, तुझ्याकडून तेही काम झालेलं नाही?”

ऑफिसमधून आल्याबरोबर आपण सांगितलेली कोणतीही कामे झालेली नाहीत हे पाहून संजीवनीची चिडचिड सुरू झाली. रेवा आईला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होती,“आई, अगं तू ऑफिसला गेल्यानंतर राधिकाचा फोन आला, तिची तब्येत बिघडली होती, ती शिकण्यासाठी गावाहून इथे आलीय. तिच्या रूम पार्टनरसुद्धा सुट्टीसाठी घरी गेलेल्या आहेत, अशा वेळी तिनं माझी मदत मागितली तर मला जायला हवं म्हणून मी तिच्यासोबत दवाखान्यात गेले होते. आताच मी घरात आले आहे, मी खूप दमले आहे, प्लीज आजच्या दिवस तू आवर ना, नाहीतर, मी माझ्या सवडीने आवरेन, तू उगाच चिडचिड करू नकोस.”

“सगळ्या जगाला मदत करायला धावशील, पण आईला मदत करणार नाहीस. काहीतरी कारणं ठरलेलीच असतात.” संजीवनीची बडबड चालूच होती. आता तिचा मोर्चा पुन्हा रोहनकडे वळला. “बोला, चिरंजीव आपल्याकडून आज काम झालं नाही याची आज काय कारणं सांगणार आहात आपण?”

“आई, माझं उद्या सबमिशन आहे, सगळी ड्रॉइंग्स मला आजच्या आज पूर्ण करायची आहेत, प्रोजेक्ट रायटिंग चालू आहे, त्यात बिल भरायला आणि सिलेंडर बुक करायला कुठे वेळ काढू?”

“आपण वेळेच्या वेळी सबमिशन केलेलं नाही, म्हणून शेवटच्या दिवशी तुमची गडबड होते. वेळेवर काम करायची सवयच नाही ना?ऑनलाइन बिल भरायला आणि सिलेंडर बुक करायला असा कितीसा वेळ लागतो? आमच्या लहानपणी होतं त्या सारखं रांगेत उभं राहायचं नाही की, सिलेंडर उचलून आणायचं नाही. मग तुमच्या शेड्युलमधून थोडा वेळ घरच्या कामासाठी काढायला नको? बाबा इथे नसतात हे माहिती असूनही तुम्हाला आईला मदत करावी असं वाटतं नाही?” संजीवनी कितीतरी वेळ बडबड करीत होती.

तिचं पुराण काही संपेना तेव्हा रेवा म्हणाली,“आई बास ना आता. किती कटकट करतेस? तुला मदत करायची नसती तर आम्ही काहीच केलं नसतं, आमच्या सवडीने आम्ही काम करतोय ना? आणि थोडा उशीर झाला तर बिघडलं कुठं? तुझ्या ऑफिसमध्ये बेस्ट परफॉर्मन्सचा तुला अवॉर्ड मिळतो तसं घरातील कामे वेळेवर पूर्ण झाली म्हणून तुला कोणीही अवॉर्ड देणार नाही.” रोहनलाही आईच्या बडबडीचा त्रास व्हायला लागला.

“जाऊ दे रेवा, तू कशाला काय तिला सांगतेस? तिला घरातही ऑर्डर द्यायची सवय झाली आहे. इतक्या वेळ घरात शांतता होती. मला माझं काम मन लावून करता येत होतं, पण ही घरात आली की कटकट, लेक्चरबाजी सुरू करते, मला आता काहीच ऐकायचं नाहीये.” असं म्हणून तो त्याच्या रूममध्ये गेला आणि धाडकन त्याने दार लावून घेतलं.

संजीवनी हताश होऊन सोफ्यावर बसून राहिली. तेवढ्यात तिच्या सासूबाई हातात चहाचा कप घेऊन आल्या, “संजू, शांतपणे बैस जरा. हा बघ मी गवती चहा आणि आलं घालून मस्त चहा बनवला आहे. ऑफिसमधून दमून आली आहेस तू. चहा घे, म्हणजे तुला छान वाटेल.”

“आई, अहो, तुम्ही कशाला चहा बनवला? मंदा कामावर आलेली नाही का?”

“आज मंदाच्या मुलीची तब्येत बिघडल्याने ती कामावर आलेली नाही. आणखी दोन दिवस येणार नाहीये.”

“छान, म्हणजे आता स्वयंपाकही मलाच करावा लागेल.”

“तू काळजी करू नकोस. करू आपण काहीतरी. मी मदत करेन तुला.”

“आई, अहो, तुम्ही कशाला सर्व करत बसलात? या वयात तुम्ही कामे करायची आणि या तरुण मुलांनी आपली मनमानी करायची हेच मला आवडत नाही.”

“संजीवनी, अगं तू चिडचिड केल्यानंतर ते तुझं ऐकतील असं वाटतं तुला? या वयातील मुलांवर ओरडून, रागावून, चिडून त्याचा काहीही परिणाम होत नाही, उलट यामुळे ते जास्त विक्षिप्त वागतात.”

संजीवनी आता खरंच हतबल झाली, कारण तिच्या बोलण्याचा मुलांवर काहीही परिणाम होत नाही हे तिलाही दिसत होतं. सूरज कामानिमित्त सहा महिने शिपवर असतो, त्याच्याशी महिनोन् महिने बोलताही येत नाही. संसाराची संपूर्ण जबाबदारी तिच्यावरच होती. विधवा सासूबाई आणि मुले सर्वांची काळजी ती घ्यायची, आपण कुठं कमी पडतोय हेच तिला समजत नव्हतं. आज तिने सासूबाईंकडे आपलं मन मोकळं केलं आणि ती म्हणाली,“तुम्हीच सांगा आई, माझं कुठं चुकतंय? सूरज इथं नसल्यामुळे मुलांना कोणताही धाक राहिलेला नाही की, माझ्या कर्तव्यात मी कमी पडतेय? मुलं माझ्याशी अशी का वागतात?”

मुलांचं आणि तिचे सतत खटके उडतात हे त्या पाहातच होत्या, पण संजीवनीलाही कोणीतरी समजून सांगायला हवं होतं. “ तुला राग येणार नसेल तर मी सांगते, तुझ्या कर्तव्यात तू कोणतीही कसूर करीत नाहीस, हे खरं आहे, पण तुझं त्यांच्याशी वागणं चुकतंय. मुलं प्रौढ झाल्यानंतर पालकांनी काहीही सांगितलेले लगेचच त्यांच्या पचनी पडत नाही, सूचना दिलेल्या तर आजिबात आवडत नाहीत. पालकांनी कितीही चांगलं सांगितलं तरी त्यांना ती कटकट वाटते. त्यांना आपण समजावून घेत नाही असं त्यांना वाटतं. अशा वेळी त्यांच्याशी त्यांच्या पातळीवर जाऊन संवाद साधणं गरजेचं आहे. मुलं तुझ्यापासून लांब जाऊ नयेत असं तुला वाटत असेल तर मुलांच्या मनाचा विचार करायला हवा, तुझ्या वागण्यात, बोलण्यात बदल करायला हवा. संजीवनी, तू ऑफिसमध्ये बॉस आहेस, तू सांगितलेली कामे ऑफिसमध्ये सर्वांना ऐकावी लागतात आणि तुलाही त्यांच्याकडून करवून घ्यावी लागतात, तिथं तू ऑर्डर देऊ शकतेस, पण कौटुंबिक नाती वेगळी असतात. कुटुंबात तुला ऑफिससारखं वागून चालणार नाही. येथे तुला पत्नी, सून, आई या भूमिका पार पाडायच्या आहेत. भावनिक बंध आणि नाती टिकवायची आहेत. वेळेवर सर्व कामे व्हावीत ही तुझी अपेक्षा चुकीची नाही, पण हा अट्टहास करू नकोस. मुलांनाही समजून घे. रोहन आज दिवसभर त्याच्या कामात बिझी होता. वेळेवर सबमिशन व्हायला हवं हा ताण त्याच्यावरही आहे, त्यामुळे सांगितलेली कामे त्याच्याकडून पूर्ण झाली नाहीत. रेवाची मैत्रीण आजारी होती, ती तिच्या मदतीसाठी धावून गेली यात तिची काय चूक झाली? वेळेत काम नाही झालं तिच्याकडून, पण दोन्ही मुलांनी आम्ही काम करणारच नाही, असं तुला सांगितलं का? त्यांच्यावर सोपवलं की ते करतात, मग थोडा उशीर झाला तर दुर्लक्ष करायचं. तुझं ऑफिस आणि तुझं घर याचे वेगळे कप्पे तू करायला हवेस. ऑफिसमधील ताण घरी आणायचा नाही आणि घरचा ताण ऑफिसमध्ये घेऊन जायचा नाही. असं केलंस तर तुझ्या मनावर दडपण येणार नाही. तुझं मन:स्वास्थ्य चांगलं राहील आणि त्यामुळे कुटुंबातील वातावरणही चांगलं राहील. मी काय म्हणतेय ते पटतंय का तुला?”

“हो आई, मी आता ऑफिस आणि घर दोन्ही कसरती करताना, माझ्याकडूनही चुका होतात.”

सासू-सुनांच्या गप्पा चालू होत्या, तेवढ्यात रोहन आला आणि म्हणाला,“सिलेंडर उद्या येईल आणि इलेक्ट्रिसिटी बिल भरलं आहे, एकदा बघून घे.”

आतून रेवाचा आवाज आला, “कपडे आवरून वॉर्डरोबमध्ये ठेवले आहेत.”

संजीवनीने सासूबाईंकडे बघितलं. त्यांनीही हसून मान डोलावली. तिने दोन्ही मुलांना आवाज दिला.

“रेवा, रोहन दोघे बाहेर या. आज मंदा सुट्टीवर आहे. घरात काही करण्यापेक्षा आपण सर्वजण बाहेर जेवायला जाऊ या.”

“आई, अजून माझे दोन ड्रॉइंग्स बाकी आहेत आणि एक प्रोजेक्ट बाकी आहे. प्लीज, ऑनलाइन काहीतरी मागू या का?” रोहन म्हणाला.

रेवा आतूनच ओरडली, “आई पिझ्झा ऑर्डर करू. खूप दिवसांत खाल्लेला नाही.”

“अरे, दोघांनी आजीचा विचार करा, आणि मग ऑर्डर करा.”

“मला पिझ्झा चालेल आणि रेवा, माझ्या आवडीचे चीज चिली टोस्टचीही ऑर्डर कर.” आजी म्हणाली.

संजीवनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली आणि तिलाही कळलं सासूबाईंसारखं प्रवाहाबरोबर चालायला शिकायला हवं, मुलांच्या मनाचाही विचार करायला हवा.

( लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smitajoshi606@gmail.com)