“ सुधीर, स्वप्नीलच्या शाळेची सुट्टी सुरू झाली आहे, या वर्षी आपण कुठं जायचं आहे?” “तू खर्च करणार असशील तर कोठेही जाऊ. या वेळेस तुझी टर्न आहे. तुला ठरवायचं आहे.” “अरे, या वेळेस माझ्याकडून काहीच खर्च होणार नाही, मी नवीन आयफोन घेतल्यामुळे मी ट्रीपचा खर्च करू शकणार नाही.” “ तू आयफोन घेण्याआधी विचार करायला हवा होतास. मी माझे पैसे ट्रिपसाठी खर्च करणार नाही, डिसेंबरमध्ये आपण गोव्याला गेलो होतो तेव्हा सर्व खर्च मीच केला होता. तुला शक्य नसेल तर यावेळी ट्रिप कॅन्सल करू.” “ अरे पण स्वप्नीलला कशाला नाराज करायचं? यावेळी तू खर्च कर. तुझी बहीण आपल्या घरी राहायला आली तेव्हा तिला फिरवणं, गिफ्ट घेऊन देणं हा सर्व खर्च मीच केला होता. तेव्हा मी काही म्हटलं का?” “ तुझे आई वडील आले होते तेव्हा, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायला मीच खर्च केला होता ना? मग माझ्या बहिणीसाठी तू काही केलंस तर बिघडलं कुठं?”

“सुधीर, माझ्या आईवडिलांचं काढायचं नाही, कारण मीही तुझ्या आईवडिलांवर खूप खर्च केला आहे. आणि तुला नेहमीच माझ्या आईवडिलांवर आक्षेप असतो. तुझ्या आईवडिलांना तू हिमाचल प्रदेशच्या ट्रिपला पाठवलंस. तो खर्च तुला करता आला, आणि आता बायकोला आणि मुलाला घेऊन ट्रिप करायची म्हटली, तर तुझ्याकडे पैसे नाहीत?” सुषमा आणि सुधीरचे वाद सुरू होते आणि हे सर्व स्वप्नील ऐकत होता. तो आता पाचवीतून सहावीत जाणार असल्याने वयाप्रमाणे समज आली आहे, त्यामुळे त्याला आता सर्व गोष्टी समजतात. या दोघांचे वाद आता लवकर संपणार नाहीत, हे त्याच्या लक्षात आल्याने तो तिथून निघाला आणि थेट आबांकडे आला. त्यानं आपली तक्रार आबांकडे मांडली.

हेही वाचा – झोपू आनंदे : स्वप्नांचा मागोवा

“ आबा, आता यावर्षी मी समर व्हेकेशनमध्ये कुठ्ठेच जाणार नाहीये, माझे सर्व मित्र वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आणि आल्यावर खेळताना मज्जा सांगणार,तेव्हा मी काय करायचं? मी काय सांगू माझ्या मित्रांना? आई बाबा भांडत बसतात, मग एकमेकांशी बोलत नाहीत. मग त्यांच्याबरोबर काही मज्जाच करता येत नाही.” “अरे,रडतोस कशाला? तुझ्या सुट्टीत आपण छान मजा करू, तू जा बरं आता खेळायला.” आबांनी त्याला समजावलं आणि खेळायला पाठवलं, पण आता मोठ्यांना समजावण्याचं अवघड काम त्यांना करायचं होतं. त्यांनी सुधीर आणि सुषमा दोघांनाही त्यांच्या रूममधून बाहेर बोलावलं.

“तुम्हा दोघांना एक महत्त्वाचं काम सांगायचं आहे.” “ बोला ना आबा, काय काम करायचं आहे?” दोघांनाही आबा काय काम सांगतात, याची उत्सुकता होती. “ या घरातील सर्व वस्तूंची यादी करायची आणि त्या प्रत्येक वस्तूची मालकी ठरवायची आहे. टीव्ही, फ्रीज, बेड, घरातील भांडी आणि घरातील किरकोळ वस्तूसुद्धा.” ते असं का बोलत आहेत, हे दोघांच्याही लक्षात येईना. “आबा, हे का करायचं आहे? आणि घरातील सर्व वस्तू सर्वांच्या आहेत,” सुषमानं भाबडेपणाने उत्तर दिलं. “ घरातील वस्तूंची कधी मालकी ठरवतात का?” सुधीरनेही आबांना प्रतिप्रश्न केला.

हेही वाचा – गच्चीवरची बाग: नैसर्गिक खताची जोपासना

“तुमचं दोघांचं बरोबर असेल, तर मग हे घरात असं तुझं-माझं का? नात्यांचीही मालकी ठरवता येत नाही रे. मी तुझ्या आई-वडिलांसाठी हे केलं, मी तुझ्या भावासाठी-बहिणीसाठी ते केलं असं का? लग्न झाल्यानंतर, दोन कुटुंब एकत्र येतात, म्हणजेच कुटुंबाचा आकार वाढतो आणि ते सांभाळण्याची जबाबदारी दोघांची असते. लग्न म्हणजे एकमेकांप्रति संपूर्ण समर्पण. मग तिथं तुझं माझं असं काही राहतं नाही. घर एक आहे. कुटुंब एक आहे, तर तिथं तुझा पैसा, माझा पैसा – हे कुठून येतं? हे मी केलं, ते तू कर असं कशासाठी? आपल्या घरासाठी, आपल्या संसारासाठी दोघंही मिळून सर्व करू असं का नाही? घरातील सुख-दुःखाचे प्रसंग दोघांनी मिळून निभवायला हवेत. सहजीवनात हे अपेक्षित असतं आणि असं होईल तेव्हाच ते सुखी आणि समाधानी सहजीवन असतं. नाती जपताना अहंकार बाजूला ठेवायला लागतो. आता तुझा टर्न आणि मग माझी टर्न असा खेळ का करत बसता?

पती पत्नीच्या नात्यात आर्थिक आणि भौतिक गोष्टींमध्येही पारदर्शीपणा असणं गरजेचं आहे. हे तुझं इन्कम, हे माझं इन्कम, असं न म्हणता दोघांचं एकत्र उत्पन्न विचारात घेऊन त्याचं नियोजन करावं. गुंतवणूक किती करायची? खर्च किती आणि कुठं करायचा हे दोघांनी मिळून ठरवलं तर कुटुंब समृद्ध होतं. फक्त मी, आणि माझं आणि तू आणि तुझं यातून बाहेर पडायला हवं. आपलं ध्येय काय आहे, याचा विचार करायला हवा, प्रत्येक क्षणी जोडीदारासोबत खंबीरपणे उभं राहायला हवं. तू केलंस तरच होणार, मी केलं तरच होणार हे कशासाठी? तुमचे दोघांचे वाद ऐकून स्वप्नील किती नाराज झाला असेल, त्याच्या मनात नक्की काय काय आलं असेल याचाही विचार करा आणि हे तुझं-माझं सोडून आपल्या कुटुंबासाठी,आपल्या माणसांसाठी काय करता येईल याचा विचार करा.” आबा बराच वेळ बोलत होते आणि दोघेही त्याचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकत होते.

हेही वाचा – नातेसंबंध : एंगेजमेंट झाली, पण आता लग्न नकोय ?

आबांचे बोलणं ऐकून दोघांनाही आपली चूक लक्षात आली. आपल्यातील हे वाद आणि मतभेद चालू राहिले तर त्याचा परिणाम स्वप्नील आणि संपूर्ण कुटुंबावरच होईल याची जाणीव त्यांना झाली. सुधीर म्हणाला, “आबा, मी घरातील सर्वांसाठी करतो, हा माझा अहंकार मी बाजूला ठेवायला हवा, हे तुमचं म्हणणं खरं आहे. कुटुंब माझं आहे. माणसं माझी आहेत. नाती माझी आहेतच हे विसरून मी माझ्यातच गुंतलो होतो.”

सुषमालाही राहवलं नाही, ती म्हणाली, “माझं घरातील अस्तित्व राहावं म्हणून मी माझं आर्थिक स्वातंत्र्य जपण्याच्या नादात अडकले होते आणि त्याची मला किंमत चुकवावी लागतं आहे, हे ही माझ्या लक्षात आलं नाही, पण आबा, आता आम्ही दोघेही एकमेकांचे वेगळे उत्पन्न याचं अवडंबर न करता दोघांच्याही एकत्र उत्पन्नाचा विचार करून संपूर्ण नियोजन करू.” दोघांचं ऐकून आबांना समाधान वाटलं आणि सर्वांनी मिळून ट्रीपला जायचं असा निर्णयही झाला, स्वप्नीलला हे सांगण्यासाठी आबा लगबगीने बाहेर गेले कारण त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना बघायचा होता.

(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत)

(smitajoshi606@gmail.com)