‘‘मला आता मुळीच त्याच्यासोबत राहायचं नाहीये. तो मला आजिबात समजून घेत नाही. प्रत्येक गोष्टीत माझ्याच चुका काढतो. त्याच्याशी जमवून घेताना मी आता थकले आहे. माझे पेशन्स संपले आहेत. कोणत्याही गोष्टीवरून गाडी माझ्या आईवडिलांवर घसरते. त्यांनी माझ्यावर संस्कार केलेले नाहीत, त्यांनी मला नाती सांभाळायला शिकवलं नाही हे ऐकून माझे कान आता किटले आहेत. इतके दिवस मुलांसमोर वाद नको म्हणून मी गप्प बसत होते, पण प्रत्येक वेळेला मीच एकटीनं समजूतदार पणा का दाखवायचा?– त्याच्या आईवडिलांबरोबर माझं जमलं नाही, आमच्या विचारांत तफावत होती, त्या घरात मलाही त्रास होत होता आणि माझ्यामुळे त्यांनाही त्रास होत होता म्हणून आम्ही दोघांनी ठरवून स्वतंत्र घर घेण्याचा विचार केला, पण आता तुझ्यामुळे मी माझ्या आईवडिलांना सोडून राहतो हे खापर तो माझ्यावर फोडतो आणि सतत मलाच दोष देतो.’’
आदिरा हे सगळं रडत रडत बोलत होती. तिला नीट श्वासही घेता येत नव्हता. तिची घुसमट अगदी जाणवत होती. अतुल आणि आदिरा या दोघांचा हा प्रेमविवाह. त्यावेळी दोघांच्याही आईवडिलांची या लग्नाला मनापासून संमती नव्हतीच, पण मुलांच्या इच्छेपुढे त्या दोघांचेही काही चालले नाही. आम्ही एकमेकांशिवाय राहूच शकत नाही म्हणणारे दोघे आता एकत्र राहूच शकत नाहीत, असं म्हणत होते. आता अतुलनेही त्याची बाजू सांगितली, तोही खूप वैतागलेला दिसत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : नातेसंबंध : सुनेचं क्रेडिट इतरांना का ?

‘‘मी म्हणजे काय फक्त एटीएम मशीन आहे? तिला हवा तेवढा पैसा पुरवायचा. काहीसुद्धा विचारायचं नाही? तिच्या म्हणण्यानुसार वागायचं. मला नक्की काय हवंय याचा विचार सुद्धा तिनं करायचा नाही? माझे आईवडील वयस्कर असूनही त्यांना सोडून हिच्यासोबत वेगळं राहतोय ना? स्वतःचं घर सोडून भाड्याच्या घरात राहणं मला कधीही पटणारं नव्हतंच, पण केवळ संसार वाचवण्यासाठी- तिला त्रास होऊ नये हा विचार करून मी सगळं ॲडजस्ट करतोय ना? पण त्याबद्दल तिला काहीच नाही. माझ्या आई-वडिलांकडे जाण्याचा विषय काढला तर काहीतरी वाद होणारच. मान्य आहे, काही चुका माझ्या आईबाबांकडून झाल्याही असतील, पण तेच तेच किती दिवस उगाळत बसायचं? त्यासाठी नातं तोडून टाकायचं का? तिच्या आईशी तिचे कितीतरी वेळा वाद झालेले मी पाहिले आहेत, मग त्यांच्याशी ती पुन्हा नीट बोलतेच ना? मग माझ्याच घरच्यांशी असं वागणं का? मी वेगळं होऊन मला काय मिळालं? आईवडिलांच्या प्रेमापासून वंचित झालो, पण बायकोच प्रेमही मला मिळत नाहीये. मी ‘तुझ्या चुलत बहिणीला एवढं महागडे गिफ्ट का दिलेस? आणि ते देण्यापूर्वी मला का विचारलं नाहीस?’ हे विचारलं तर एवढा आकांडतांडव केला. मलाही हिच्यासोबत दिवस काढणं आता अवघड आहे. त्यापेक्षा वेगळं झालेलं बरं.’’

आणखी वाचा : विवाह समुपदेशन : सिबलिंग रायव्हलरी… नात्यात नकोच

दोघेही आपापल्या परीने आपली बाजू मांडत होते आणि माझं बरोबर आणि जोडीदाराचीच कशी चूक आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते. एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप चालू होते हे लवकर संपणार नाही हे संध्याताई जाणून होत्या म्हणूनच त्यांनी दोघांना बोलताना थांबवलं.
‘‘आता आपण थोडा पॉज घेऊया बर. मी छान थंडगार लस्सी करून आणली आहे, दोघेही घ्या. डोकं आणि मनही शांत करण्याची ताकद या लस्सीमध्ये आहे.’’
‘‘आंबट दह्यामध्ये साखर अगदी विरघळून गेली आहे आणि त्यामुळे गोडवा आला आहे, पण दही आणि साखर यांचं अस्तित्वही टिकून आहे म्हणूनच ती आंबट-गोड चव हवीहवीशी वाटते आहे. एकमेकांच्या स्वभाव धर्माचा स्वीकार झाल्यामुळं एक सुंदर चव निर्माण झाली आहे. संसारातही तसंच आहे ना, पती-पत्नी हे दोघेही वेगळ्या संस्कारात, वेगळ्या पद्धतीनं वाढलेले असतात त्यामुळं त्यांचे स्वभाव व्यक्तिमत्त्व वेगळं असणारच आहे, दोघांमध्ये मतभेद असणं, वाद होणं साहजिकच आहे, पण ज्या मुद्द्यांवरून भांडणं होतात ना त्याच मुद्यांवर बोलायचं ती गाडी तिच्या किंवा त्याच्या आईवडिलांवर अथवा नातेवाईकांवर घसरता कामा नये यासाठी सजग राहायला हवं. तुम्ही दोघंही एकाच मुद्द्यावरून अनेक वेळा भांडत बसता, त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा काढत राहता, यामुळे दोघांनाही त्रास होतो. तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, दोघांनाही एकमेकांची काळजी आहे, पण स्वतःच्या अपेक्षांची पूर्तता झाली नाही की दोघंही एकमेकांवर राग काढता, मग त्या रागाच्या क्षणात आपण दुसऱ्याला काय बोलतोय याचं भान तुम्हाला रहात नाही. तुम्ही भांडा, जरूर भांडा कारण त्यामुळं मन मोकळं होत. मनातल्या मनात कुढत राहण्यापेक्षा व्यक्त झालेलं कधीही चांगलंच, पण ते भांडण वाढवत राहायचं नाही. तो रागाचा क्षण सांभाळायचा, वादाचा मुद्दा सोडून भरकटत बसायचं नाही आणि आहे त्या परिस्थितीत कोणतं सोल्युशन निघतं याचा विचार करायचा. आपले वाद मुलांपर्यंत, घराबाहेरच्या व्यक्तींपर्यंत जाणार नाहीत याची काळजी घ्यायची.’’

आणखी वाचा : विवाह समुपदेशन: ‘सोलमेट’चा वैवाहिक नात्याला धोका?

अतुल आणि आदिरा यांना मावशीचं म्हणणं पटलं. दोघेही शांत झाले. या विषयावर चिंतन करून आपल्यात बदल घडवून आणायचा असं दोघांनी ठरवलं. निघताना दोघांनी जोडीने मावशीला नमस्कार केला आणि मावशीनेही मिश्किल पणे आशीर्वाद दिला,
‘‘भांडा सौख्यभरे!’’
आणि तिघांनी मनमुराद हसण्याचा आनंद घेतला.
(smitajoshi606@gmail.com)