डॉ. स्मिता प्रकाश जोशी

आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न हा एक संस्कार आहे. या नात्यात कोणत्याही प्रसंगात एकमेकांना सांभाळून घेणं, साथ देणं महत्त्वाचं असतं. लग्नापूर्वी जोडीदाराविषयी मनात एक कल्पनाचित्र रेखाटलं गेलेलं असतं, पण वास्तवात ती व्यक्ती तशी असेलच असं नाही. काय करावं अशा वेळी?

What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
These simple tips will help to make a delicious food
जेवण बनवताना खूप धावपळ होते? ‘या’ सोप्या टिप्स रूचकर जेवण बनवण्यासाठी करतील मदत
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
how to protect and lock your aadhaar card
तुमचं आधार कार्ड सुरक्षित आहे का? लॉक करण्यासाठी अन् गैरवापर टाळण्यासाठी काय करायचं? जाणून घ्या…
Man sets himself on fire
पत्नीनं घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्यास दिला नकार, पतीनं उचललं धक्कादायक पाऊल

 “मानसी, तुझ्या लग्नाला केवळ चार महिने झालेत, आणि लगेच तुझी लग्न मोडण्याचीही तयारी झाली, भातुकलीचा खेळ आहे का हा असा डाव मोडायला?”

“काकू, मिळालेला जोडीदार आपल्या मनासारखा नाही हे लक्षात आल्यावर उगाचंच त्या बंधनामध्ये अडकण्यात काय अर्थ आहे? आमचं अरेंज मॅरेज आहे, मी काही त्याच्या प्रेमातबिमात नाही. लग्न झाल्यानंतर त्याच्या वागण्यातील तफावत माझ्या लक्षात आली. लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या काळातच त्याच्यावरचा विश्वास उडाला आहे. सुरुवातच खोटेपणाची असेल तर अशा व्यक्तीबरोबर माझं आयुष्य कसं जाणार?”

“लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात काही गोष्टी खटकतातच, आपल्याला हवं तसं सगळंच मिळतं का?”

“होय काकू, हे मला माहिती आहे आणि त्याबाबतीत तडजोड करण्याची माझी मानसिक तयारी आहेच, पण लग्नापूर्वी माझा जोडीदार कसा असावा, या बाबतीत माझे काही ठाम विचार होते, आणि त्याप्रमाणे मी जोडीदाराचा शोध घेत होते. ट्राफिक सिग्नलच्या उदाहरणाप्रमाणे कोणत्या गोष्टी मला बिल्कुल चालणार नाहीत, त्या गोष्टींना मी ‘रेड सिग्नल’ दाखवला होता, ज्या गोष्टी मी तडजोड करून पुढे जाऊ शकते, त्या गोष्टींना मी ‘यलो सिग्नल’ दाखवला आणि ज्या गोष्टी मला चालतीलच त्या गोष्टींसाठी माझा ‘ग्रीन सिग्नल’ होता. मला ड्रिंक्स घेणारा मुलगा अजिबात नको होता. नानव्हेज कधी तरी खाणं मी मान्य केलं होतं आणि अध्यात्माची आवड असणारा, सकारात्मक विचार करून पुढे जाणारा, रोज व्यायाम करणारा मला अगदीच चालणार होता. काही गोष्टींमध्ये मी तडजोड करायला नक्कीच तयार होते, पण काकू लग्नानंतर मला समजलं, मंदार खूप आवडीने वारंवार नॉनव्हेज खातो, सिगारेटही ओढतो आणि ड्रिंक आठवड्यातून एकदा तरी त्याला हवंच असतं. कोणत्याही गोष्टीत निगेटिव्ह थॉट्स आधी असतात. आयुष्य कसं जगायचं याबाबत त्याचे कोणतेही ठाम विचार नाहीत आणि अध्यात्माचा तर त्याला गंधही नाही. अशा व्यक्तीबरोबर मी आयुष्य कसं काढणार?”

मानसी स्वतःचे सर्व मुद्दे काकूला सांगत होती आणि एकदा लग्न केलं, की तडजोड आलीच हा मुद्दा काकू मानसीला पटवून देत होती. लग्नाच्या बाबतीत सध्याची मुलं कशा पद्धतीनं विचार करतात हे काकूच्या लक्षात येत होतं. पूर्वी आईवडील म्हणतील त्या मुलाशी/ मुलीशी लग्न करायचं एवढंच मुलांना माहिती होतं. सर्व चौकशी आईवडील करायचे, आपल्या मुलांसाठी योग्य काय आणि अयोग्य काय हे पालक ठरवत होते. पण आताच्या मुलांना विचारस्वातंत्र्य आणि निर्णयस्वातंत्र्य आहे. आपला जोडीदार कसा असावा या बाबतीत त्यांचे विचार स्पष्ट आहेत, पण त्या बाबतीतला अट्टहासही, हे काकूला जाणवलं.

“मानसी, पण तुला हवा तसा तो नाही, म्हणून तू लग्न मोडलंस तरी तुला हवा तसाच जोडीदार पुन्हा मिळेल याची काय खात्री आहे का?”

“काकू, मला हवा तसा कदाचित मिळणारही नाही, पण म्हणून, ज्याने माझा विश्वासघात केला, त्याच्याबरोबर मी कसं राहू? तो जसा आहे तसा मी स्वीकारला असता, पण लग्नापूर्वी सर्व गोष्टी त्यानं मला खऱ्या सांगायला हव्या होत्या. केवळ माझ्यावर प्रभाव पाडण्यासाठी अनेक गोष्टी तो माझ्याशी खोटं बोलला.”

मानसी तिच्या विचारांवर ठाम होती. स्वतःच्या जोडीदाराबाबतच्या कल्पना ती वर्णन करून सांगत होती.

“मला ज्याचा आधार वाटेल, जो माझी संपूर्ण जबाबदारी घेईल असा भक्कम जोडीदार मला हवा होता. ज्याच्याशी मी मनमोकळं बोलू शकेन, त्याच्यासोबत मी माझं लाइफ एन्जॉय करू शकेन, त्याच्यासोबत बिनधास्त कोठेही भटकू शकेन, तो माझ्या मनातलं सगळं ओळखेल, माझी काळजी घेईल, माझ्या प्रत्येक क्षणात मला साथ देईल, अशी माझी अपेक्षा होती, पण मला हवा त्यापेक्षा तो खूपच वेगळा आहे. मला काय हवं आहे, हे त्याला कळतच नाही. हनिमूनला गेल्यावर त्यानं मला गिफ्ट तर दिलंच नाही, पण मी मागितलेल्या वस्तूही घेऊन दिल्या नाहीत. आपल्या देशात हे सगळं मिळतं, उगाच ओझं कशाला घेऊन जायचं हे त्याचे विचार होते. मला ड्रिंक्स घेतलेलं आवडत नाहीत हे माहिती असूनही, आपण इथं एन्जॉय करण्यासाठी आलो आहोत, एखादा पेग घेतला तर कुठं बिघडलं? असं त्याचं म्हणणं होतं, पण एन्जॉय करण्यासाठी काही वॉटर राइड्स घेऊ, थ्रिल करू म्हटलं तर तिथं हा घाबरायचा, काकू, त्याला साधं स्विमिंगही येत नाही, तो पाण्याला घाबरतो म्हणे. मला त्याच्यासोबत हनिमून ट्रिप एन्जॉयच करता आली नाही. एकदा तर तो रूममध्ये मला एकटीला ठेवून बाहेर गेला होता, असं कधी वागणं असतं का? ”

मानसीचे विचार ऐकून ती अजूनही लग्न आणि जोडीदार या बाबतीत फॅन्टसीमध्ये आहे हे काकूच्या लक्षात आलं. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याकडे बघण्याच्या संकल्पना आणि दृष्टिकोन वेगळे असतात, आवडीनिवडी वेगळ्या असतात, एन्जॉय करण्याच्या कल्पनाही वेगळ्या असतात हे तिला पटवून सांगणं आवश्यक होतं.

“मानसी, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, त्यानं तुझ्यावर प्रभाव टाकण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या, पण प्रत्यक्षात तो वेगळा आहे हे लग्न झाल्यानंतर तुझ्या लक्षात आलं, तुझ्या विश्वासाला तडा गेला आहे, या बाबतीत मंदार नक्कीच चुकला आहे, पण त्याच्यातले काही चांगले गुणही असतील त्याकडे तू पाहिलंस का? तुला आवडेल अशा ठिकाणी परदेशात तो तुला हनिमूनसाठी घेऊन गेला, तुला काही वस्तू त्यानं घेऊन दिल्या नाहीत, पण आवर्जून तुझ्या आई बाबांसाठी, भाऊ-बहिणीसाठी त्यानं गिफ्ट आणलं, तुमच्या कुलदेवतेला जाताना तो तुझ्या आई-वडिलांना सोबत घेऊन गेला, तेव्हा तुझ्या बाबांना त्रास झाला होता, तर त्यानं किती काळजी घेतली, तुझ्या वाढदिवसाला तुझ्या मित्र-मैत्रिणींसाठी त्यानं वेगळी पार्टी अरेंज केली होती. त्याच्या वागण्यातील या चांगल्या गोष्टी तू विचारात घेतल्या नाहीस का? तुझ्या जोडीदाराबाबतच्या काही संकल्पना आहेत, तशा त्याच्याही असतीलच ना? त्या सगळ्यामध्ये तू परफेक्ट बसली असशील असं नाही, काही गोष्टी त्यानंही दुर्लक्षित केल्या असतीलच. जोडीदार कसा असावा याच्या अपेक्षा ठेवणं अजिबात चुकीचं नाही, पण अपेक्षेपेक्षा तो वेगळा असला तरी आयुष्यात काही बेरीज-वजाबाकी करावीच लागते. काही गोष्टी आयुष्यात पुढं जाण्यासाठी धोकादायक आहेत, असं लक्षात आलं, तर नातं पुढं जाऊ न देण्याचा निर्णय नक्कीच योग्य असतो, पण ज्या गोष्टी सुधारणा करता येण्यासारख्या आहेत आणि भविष्यावर त्याचा परिणाम होणार नाही हे लक्षात येत असेल तर नातं टिकवण्याचा जरूर प्रयत्न करावा.

मानसी, अगं, मंदार तुझ्या कल्पनेतील जोडीदार नाही, पण वास्तवातील आहे. त्याच्या सवयी तुला त्रासदायक असतील, पण लग्न मोडायलाच हवं अशा नाहीत. त्याला काही बदल करायला सांगितलं तर नातं टिकवण्यासाठी तो नक्कीच बदल करेल आणि काही गोष्टी तू स्वीकारल्यास तर पुढं जाणं शक्य होईल. नात्यांसाठी योग्य काय, अयोग्य काय याचा विचार दोघांनीही करायला हवा. आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न हा एक संस्कार आहे. या नात्यात कोणत्याही प्रसंगात एकमेकांना सांभाळून घेणं, साथ देणं, महत्त्वाचं असतं. मानसी, तू पुन्हा एकदा सर्व गोष्टींचा विचार कर, कोणताही निर्णय घेण्याची घाई करू नकोस.”

“काकू, तू म्हणते आहेस, त्याचा मी पुन्हा विचार करते, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेणे योग्य नाही, हे मला पटते आहे. कल्पनेच्या जगातून बाहेर येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.”

मानसी आज विचार करते म्हणाली, ‘हेही नसे थोडके.’ असं काकूला वाटलं. यातून काही तरी चांगलं घडावं यासाठी प्रयत्न चालू ठेवायचा असं तिने ठरवलं.

 पालकांचे अनुभवाचे बोल बऱ्याच वेळा उपयोगी पडतात ते असे.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smita joshi606@gmail.com)

Story img Loader