डॉ. स्मिता प्रकाश जोशी
“आई, पुन्हा या विषयावर बोलायचं नाही असं आपलं ठरलं आहे ना, मग पुन्हा पुन्हा तो विषय तू का काढतेस? मी यापुढं तुझ्याशी काहीच बोलणार नाहीये, ऑफिसमधून घरी आलं की लगेच तुझी कटकट सुरू होते. कुठेच शांतता नाही मला.” अरुंधती रागारागाने बोलत होती. तरीही सुषमाताई तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होत्या,
“अगं, मी तुझी शत्रू आहे का? तुझं चांगलं व्हावं याचसाठी मी प्रयत्न करीत आहे ना. तुझं आयुष्य मार्गी लागावं एवढंच माझं म्हणणं आहे.”
“ फक्त लग्न झालं म्हणजे आयुष्य मार्गी लागलं असं आहे का? आणि मी एकदा या सर्व गोष्टीतून गेलेली आहे ना? तुझं मी ऐकलं होतं ना? आता घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा मी लग्न करावं असा हट्ट का करतेस? माझ्या आयुष्यात वैवाहिक सुख नसलंच तर त्यासाठी तू कितीही प्रयत्न केले तरी त्याचा काही उपयोग आहे का?”
“अरुंधती, असं तू का म्हणतेस? पहिल्या विवाहात आपली फसवणूक झाली, तो व्यसनी आणि गुन्हेगारी वृत्तीचा आहे हे आपल्याला नंतर समजले, पण हे समजल्यावर मी आणि बाबा तुझ्या पाठीशी उभं राहिलो, लवकरात लवकर तुझी सुटका करून घेतली. परस्पर संमतीने घटस्फोट करून घेतला, तुझं वय आता ३० आहे, खूप आयुष्य अजून बाकी आहे. जमेल का तुला एकटीनं राहायला?”
सुषमाताई तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होत्या, पण अरुंधतीच्या ते पचनी पडत नव्हतं. “आई, लग्नाविषयी माझ्या मनात आजिबात स्वारस्य राहिलेलं नाही.”
त्यानंतर घरात नेहमीचा ड्रामा झाला. सुषमा ताईंची चिडचिड, रागावणं, रडणं, त्यांचा रक्तदाब वाढणं आणि अरुंधतीचं निर्विकार राहणं. या सगळ्याला अशोकराव कंटाळले होते. मुलीच्या मागे लागू नकोस म्हटलं तर सुषमाताई ऐकत नव्हत्या आणि आईला समजून घे म्हटलं तर अरुंधती ऐकत नव्हती. नेहमी त्यांची भांडण सोडवत बसावं लागायचं. आज मात्र त्यांनी वेगळाच पवित्रा घेतला.
“सुषमा, ही औषधं घे आणि तुझ्या खोलीत जाऊन झोपून राहा, तुझी काळजी जर मुलीला समजत नसेल तर तू आटापिटा करण्यात काय अर्थ आहे?” त्यांनी सुषमाताईंना त्यांच्या खोलीत पाठवले आणि अरुंधतीशी बोलण्यास सुरुवात केली. “अरुंधती, तुझा घटस्फोट होऊन २ वर्षं झाली. तू आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेस, तुझे निर्णय तू घेऊ शकतेस. जगात एकटीने जगण्यास तू सक्षम आहेस, असं तुला वाटतं. तर आयुष्यात यशस्वी होण्यासाठी लग्न करावं लागतं, कोणीतरी जोडीदार असावाच लागतो, असा तुझ्या आईचा समज आहे, किंबहुना मागच्या पिढीला हेच वाटतं. मग तू स्वतंत्र राहा आणि तुझ्या आईला हे सिद्ध करून दाखव. आमच्या सोबत तू राहिलीस तर ती लग्नासाठी तुझ्या मागे लागतच राहील.”
“बाबा, अहो, तुम्ही असं का बोलताय? मी अशी एकटीनं कुठे राहणार? मी पैसे कमावते हे ठीक आहे, पण स्वतःचं घर घेण्याची माझी क्षमता नाही. बाहेर एकट्यानं राहणं वाटतं तेवढं सोपं नाही. जाता येता लोकं काहीही बोलत राहतात.”
“ लोकांकडे कशाला लक्ष द्यायचं? लोक बोलत राहतात, आपण लक्ष द्यायचं नसतं असं तूच आईला सांगतेस ना? आणि तुला एकटीला सर्व गोष्टी शक्य नसतील तर ऑफिसच्या सहकाऱ्यांची मदत तू घेऊ शकतेस. तू सर्व सहकाऱ्यांसोबत असलीस की तुला कसलीही भीती नसते, एकटं वाटतं नाही असं तू म्हणतेस ना? मग त्यांच्या मदतीने ऑफिसच्या जवळ घर बघ, म्हणजे तुला काहीच त्रास होणार नाही, आणि आईही निश्चिंत होईल.”
बाबा तिला वेगवेगळे मार्ग सांगत होते कारण अरुंधतीचा स्वभाव त्यांना चांगलाच माहीत होता. ती एकटी राहू शकणार नाही हे त्यांना माहीत होतं. घटस्फोट झाल्यापासून तिने स्वत:ला स्वत:मध्येच बंदिस्त करून घेतलं होतं. ती कोणत्याही नातेवाईकांकडे जात नव्हती, फोन करून बोलतही नव्हती, कोणत्याही सणा-कार्याला येत-जात नव्हती. अगदी शेजाऱ्यांनाही टाळत होती, तिला जर खरंच लग्न न करता आयुष्यभर एकटं राहायचं असलं तर तिनं कणखर होणं गरजेचं होतं. ते या घराबाहेर पडूनच शक्य होतं.
खरंच घरातून बाहेर पडायचं म्हटलं तर आपल्याला कोण मदत करेल? याचा विचार करायला लागल्यावर अरुंधतीला ऑफिसमधील सहकारी तिच्याशी कसं वागतात हे लक्षात आलं. ती घटस्फोटित आहे आणि दिसायला सुंदर आहे म्हणून ऑफिसमधील अनेक सहकारी तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करीत असतात. कामाच्या निमित्ताने तिला मुद्दाम थांबवून घेणं आणि तिच्याशी वेगळ्या पद्धतीने बोलणं हे तिने अनुभवलं होतं. तिच्या ऑफिसमधील सहकारी सुलोचना विधवा झाल्यानंतर एकटी राहत होती, तेव्हा तिला ऑफिसमधील अधिकाऱ्यांनी कसा त्रास दिला हे तिनं पाहिलेलं होतं. याचा अर्थ आपल्याला जर खरंच एकटं राहायचं असेल तर कदाचित हे सगळे अनुभव आपल्याला येऊ शकतात. त्याला तोंड देण्याची आपली तयारी हवी. आणि मुळात खरंच एकटं राहायचंय का? याचाही नीट विचार करायला हवा.
अशोकरावांनी तिच्या मनाची चलबिचल ओळखली. ते म्हणाले, “ बेटा, आई तुला लग्न कर का सांगते ते तुझ्या लक्षात आलं असेल, कारण तिच्यासमोर तोच पर्याय आहे. पण त्यासाठी तू पुन्हा लग्न केलंच पाहिजे, असा माझा आजिबात अट्टहास नाही. तुझ्या आईलाही मी समजून सांगेन, पण या जगात एकटं राहण्यासाठी तू स्वतःला सक्षम करणं गरजेचं आहे. एक जोडीदार असा मिळाला म्हणून सर्व पुरुष जातीवर लेबल लावणं आणि लग्न संस्थेवरचा विश्वास गमावणं योग्य नाही. आपल्या मनातलं समजून घेणारा सुखदुःखात सोबत करणारा कोणीतरी हवा असतो. पण तरीही तुला पुन्हा लग्न करायचंच नसेल तर निडर हो, स्वतःमधील शक्तींचा पुरेपूर वापर कर. मात्र समाजापासून, शेजाऱ्यांपासून, नातेवाईकांपासून असं दूर राहणं चांगलं नाही. आमच्या दोघांचं वय झालं आहे, तू एकुलती एक आहेस. कधी ना कधी आमचा आधार सुटणार आहे. त्यावेळेची आधीपासूनच तयारी असायला हवी. आयुष्यात तू आनंदी असावं, एवढीच तुझ्या आईची इच्छा आहे, तिला समजून घे.”
अरुंधतीला बाबांच्या बोलण्यानं रडूच कोसळलं. आईशी आपण किती वाईट वागलो, तिला किती टाकून बोललो, याची तिला जाणीव झाली. ती आईच्या खोलीत गेली तेव्हा आईला झोप लागली होती. तिनं तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मनातल्या मनात तिची माफी मागितली. त्याचवेळी स्वतःच्या आयुष्याबद्दल ठाम निर्णय घ्यायचा विचार मात्र पक्का केला. तिच्याकडे बघून बाबांनाही बरं वाटलं. मायलेकींच्या नात्यातील दुरावा नक्की कमी होईल, याची त्यांना खात्री वाटू लागली.
(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत)
smitajoshi606@gmail.com