डॉ. स्मिता प्रकाश जोशी
‘‘आई, अगं, तुझी तब्येत बरी नसताना एवढा आटापिटा कशासाठी केलास? केवढे पदार्थ घरी करत बसलीस तू? आजीचा वाढदिवस आपण छान हॉटेलमध्ये साजरा केला असता की.’’
“अगं, बाबांची इच्छा होती, की वाढदिवस घरीच साजरा करायचा आणि सगळं काही आजीच्या आवडीचं करायचं. आजीला बाहेरचे पदार्थ आवडत नाहीत.”
‘‘आई, अगं, तुला एक दिवस सुट्टी मिळते. त्यात तुझी हजार कामं, त्यात एवढे सगळे पदार्थ करायचे? तू दमत नाहीस का? बाबांना सरळ सांगून टाकायचं, की मला जमणार नाही, मी म्हणते, एवढा त्रास घ्यायचाच कशाला?”
‘‘अगं, अंजली, त्यात त्रास कसला? मी केलेले घरचे पदार्थ खाण्यात बाबांना आणि आजीला आनंद होणार असेल तर मलाही त्यात आनंदच आहे. आणि बाबांनीही केलीच की मला मदत हे करण्यासाठी.’’
आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन : लग्न, नव्हे कम्पॅनिअनशिप…
“आई, तू ना धन्य आहेस अगदी. पण तुझा चेहरा बघितलास का? किती दमलेली दिसतेस तू? कुणाला फक्त खूश ठेवण्यासाठी हे सगळं करायचं?’’
‘‘अगं, मला कुणी जबरदस्ती केलेली नव्हती, मी स्वतः आनंदानं केलं सगळं, कारण मला बाबांचं मन मोडायचं नव्हतं. आज आजीच्या आणि बाबांच्या चेहऱ्यावरील आनंद बघूनच मला बरं वाटलं. यातच खरा आनंद असतो.’’
मायलेकींचा संवाद सुरू होता. अंजलीला आईचं वागणं, स्वत:ला त्रास करून घेणं आजिबात आवडत नव्हतं. “आई, तुझे हे विचार आजच्या नवीन पिढीला पटण्यासारखे नाहीत. आम्हाला जे वाटतं ते आम्ही करतो, कुणाला काय वाटेल म्हणून करत नाही, म्हणून तुलनेने आम्हाला त्रास कमी होतो. दुसऱ्याला आवडावं म्हणून स्वत:ला किती त्रास करून घ्यायचा? यामुळेच स्त्रियांना सतत सहन करावं लागलं.’’ अंजलीचं वाद घालणं चालूच होतं.
‘मी आणि माझं’ या कोषात राहाणाऱ्या आजच्या तरुण पिढीला नाती टिकवणं म्हणूनच अवघड जातं का? ‘जमलं तर टिकवा नाहीतर मिटवा’, अशी संस्कृती वाढत चालली आहे का? दुसऱ्याला काय आवडेल याचा विचार त्यामुळे बाजूलाच पडतो. स्वत:ला त्रास झाला तरी नाती टिकवताना आणि फुलवताना एकमेकांसाठी करण्यातही आनंद असतो हे त्यांना पटतच नाही. आई हे अंजलीला पटवून सांगण्याचा प्रयत्न करत होती.
आणखी वाचा : Work Spouse : नातेसंबंध : तुम्ही आहात ऑफिस स्पाउस?
‘अंजली, अगं, चुकतेस तू, प्रत्येक वेळेला मला योग्य वाटलं म्हणून केलं, हा पवित्रा योग्य नसतो. स्वतःच्या मनासारखं वागण्यात जो आनंद मिळतो, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने दुसऱ्याच्या मनाप्रमाणे वागून त्यांना मिळणाऱ्या आनंदात सहभागी होण्यात असतो. नाती जपताना एकमेकांचे विचार समजून घेऊन, दुसऱ्याला काय हवं आहे हे जाणून घेऊन त्याचा मनापासून स्वीकार केला तर आपण जे केले त्याचा त्रास वाटणार नाही उलट आपण जे केलं त्याचं सार्थक वाटेल. आईला कितीही त्रास झाला आणि यातना झाल्या तरी बाळ जन्माला आल्यानंतरचा तिचा आनंद किती वेगळा असतो, तेव्हा झालेला त्रास तिला आठवतही नाही तसंच आपल्या माणसांसाठी काही करणं हे त्रासदायक ठरूच शकत नाही. जोडीदाराच्या आणि आपल्या नात्यातील गोडवा टिकवायचा असेल तर त्याचा आनंद कशात आहे हे शोधणं महत्त्वाचं आहे, अर्थात हे दोन्हीकडून व्हायला हवं. कामात एकमेकांना थोडी मदत केली तर आपल्याच माणसांची मनं राखणं सहजशक्य असतं. तूही थोडी मदत कर. बघ तुझ्या हातचा पदार्थ खाऊन आजी कशी खूश होईल ते. आणि एकदा का लग्न झालं, की कळतीलच काही गोष्टी तुला.”
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : लग्नापूर्वी व्हर्जिनिटी गमावणं योग्य की अयोग्य?
गाडी कोणत्या दिशेला निघाली आहे हे लक्षात येताच आईला मध्येच थांबवत अंजली म्हणाली, ‘‘आता थांब. माझ्या लग्नाचा विषय मध्येच आणू नकोस. मलाही पटतंय तुझं. मी याबाबत नक्कीच विचार करेन. मला क्लासला जायला उशीर होतोय, मी पळते.”
‘चांगल्या गोष्टी पचवणं अवघडच असतं. म्हणूनच आईचं सांगणं मुलांना लेक्चरबाजी वाटते हे मलाही कळतं बरं,’ असं म्हणत आईनंही आवरतं घेतलं आणि गुलाबजाम करायला सुरुवात केली. तिला माहीत होतं अंजलीला हे पटलंय. ती क्लासवरून आल्यावर नक्कीच मदत करेल!
smitajoshi606@gmail.com