डॉ. शिल्पा चिटणीस जोशी
“ डॉक्टर, माझं वय एकतीस वर्षं आहे. तीन वर्षांपूर्वी लग्न झालं, पण आमच्यात अजून शारीरिक संबंध आलेलाच नाही. सुरुवातीला काही दिवस आम्ही नोकरीसाठी वेगळ्या शहरात होतो; पण आता गेली दोन वर्षं एकत्र आहोत. माझा नवरा सेक्सचा विषय काढला, की टाळाटाळच करतो. मी खूप प्रयत्न केला त्याच्याशी बोलायचा; पण तो आज बरं नाहीये, उद्या थकलोय, परवा ऑफिसला लवकर जायचंय, अशी कारणं देऊन उडवून लावतो. आता मी कंटाळले आहे. त्यात सासरचे ‘बाळ कधी?’ म्हणून मागे लागलेत. काय सांगू त्यांना? काही औषध देता येईल का त्याला?” एक तरुणी तिची व्यथा सांगत होती. मात्र अशा समस्या दोन्ही बाजूंनी असू शकतात. एक सासू आपल्या तरुण मुलाला घेऊन भेटायला आली. “डॉक्टर, आम्हाला नुकतंच काही तरी विचित्रच कळलंय या दोघांबद्दल. दोन वर्षं झाली यांच्या लग्नाला तरी अजून काही झालंच नाहीये म्हणे त्यांच्यात. यांची सारखी भांडणं व्हायला लागली म्हणून मी विचारलं याला. तर हा म्हणतोय की, तिला सेक्स आवडतच नाही. ती काहीच करू देत नाही. यांचा प्रेमविवाह आहे हो. असं असू शकतं हेच आम्हाला माहीत नव्हतं. मी आणि याचे वडील पूर्ण शॉकमध्ये आहोत. आता काय करायचं पुढे?” त्यांची चिंता स्पष्ट दिसत होती.
अशी जोडपी असतात यावर बऱ्याच लोकांचा विश्वासही बसणार नाही; पण मला असंही एक जोडपं माहीत आहे, की ज्यांच्यात आयुष्यभर संबंध आलाच नाही. पतीला ते नको होतं आणि पत्नीलाही विशेष काही ऑब्जेक्शन नव्हतं. आधुनिक वैद्यकीय शोधामुळे एक मूल झालं त्यांना, चांगला मोठा आहे तो आता. त्यांनी आयुष्यभर नीट संसार केला. अजूनही व्यवस्थित चालू आहे सगळं. अशा वेळी ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ यावर विश्वास बसतो. अशा जोडप्यांमध्ये वेगवेगळ्या समस्या असू शकतात. असं म्हटलं जातं, की सर्वांत महत्त्वाचा लैंगिक अवयव मेंदू हाच आहे. बाकीच्या सर्व गोष्टी दुय्यम ठरतात. लैंगिक भावनांचा उगम मेंदूत होतो आणि शरीर त्याप्रमाणे प्रतिसाद देत असते.
हेही वाचा… कामजिज्ञासा: लग्नाची पहिली रात्र आणि कल्पनाविलास
काही व्यक्ती asexual असू शकतात. म्हणजे त्यांच्या मेंदूमध्ये लैंगिक उद्दीपन होतच नाही. अशा व्यक्तींना सेक्समध्ये कधीच इंटरेस्ट निर्माण होत नाही. आणखी एक उदाहरण सांगायचं तर, ती २९ वर्षांची तरुणी. एकदम धडाडीची. माझ्याकडे आली तेव्हाच तिच्या लग्नाला दोन वर्षं झाली होती. नवरा सेक्स टाळायचा. एकदा तो फोन विसरून गेलेला असताना तिने त्याचे मेसेजेस बघितले. त्यात त्याने वेगवेगळ्या तरुणांना प्रेमाचे, लैंगिक मेसेजेस पाठवलेले तिला दिसले. त्याचेही काही फोटो होते तरुणांबरोबरचे. ही बिचारी पूर्ण शॉकमध्ये गेली. तिने नवऱ्याला सरळ विचारलं, तर त्याने सपशेल माफी मागितली तिची आणि बाहेर लोकांना सांगू नको म्हणून विनवण्या केल्या. तो स्वभावाने खूप चांगला होता म्हणून हिने mutual consent ने घटस्फोट घेतला; पण तिच्या आयुष्यावर अर्थातच खूप खोलवर परिणाम झाला या सगळ्याचा. अजून त्यातून बाहेर आलेली नाही ती.
हेही वाचा… कामजिज्ञासा: मासिकपाळीत सेक्स करावा का?
आपल्या समाजात अजूनही भिन्न लैंगिकता स्वीकारली जात नाही. त्यामुळे समलैंगिक व्यक्तींची खूप घुसमट होते. घरच्यांच्या दबावाखाली हे लोक लग्न करतात; पण वैवाहिक जीवनात कधीच रमत नाहीत. त्यामुळे लग्नानंतर अशा व्यक्ती सेक्सबाबत टाळाटाळ करत राहतात. यामध्ये त्यांच्या जोडीदाराचे मात्र अतिशय हाल होतात आणि शेवटी दोन्ही कुटुंबांना अत्यंत कटू प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे लग्नाच्या वयाच्या मुलामुलींशी अगदी स्वच्छ शब्दात पालकांनी बोलायला हवं. काही वेळा लहानपणी आलेले वाईट लैंगिक अनुभव, घरात असलेलं अति कर्मठ वातावरण, आईवडिलांचे कटू वैवाहिक जीवन याचा मुलांच्या मनावर खूप खोलवर परिणाम होतो आणि लैंगिक जीवनाबद्दल मनात कायमची अढी बसते. अशा वेळी समुपदेशनाने या समस्या सोडवता येऊ शकतात.
हेही वाचा… कामजिज्ञासा: मेनॉपॉजच्या काळात शरीरसंबंधांचा त्रास होतोय?
Unconsummated लग्न वा सेक्स न झालेल्या लग्नाच्या समस्या असलेली जोडपी खूप वेळा स्त्रीरोगतज्ज्ञांकडे अगदी शेवटी, जेव्हा घरातल्या वरिष्ठांकडून मुलांसाठी दबाव यायला लागतो तेव्हाच येतात. गर्भधारणेच्या आधी निरोगी लैंगिक जीवन असणं आवश्यक आहे, असं त्यांना कितीही समजावलं तरी समाजमान्यता मिळविण्यासाठी लोक धडपडत असतात आणि बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. आपल्या समाजात लैंगिक बाबतीत बऱ्यापैकी ढोंगी आणि दांभिकपणा चालतो. त्यातून बाहेर पडून मोकळेपणाने चर्चा सुरू झाल्या तर अशा समस्यांना तोंड देणे सर्वानाच सोपे जाईल.
(लेखिका स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ आहेत)
shilpachitnisjoshi@gmail.com