१०१ वर्षीय फ्रेंच योगा शिक्षिका शार्लोट चोपिन यांना गुरुवारी भारतातील चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने म्हणजेच पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. गेल्या चार दशकांपासून त्यांनी योगामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा यानिमित्ताने गौरव करण्यात आला. हिरवी साडी परिधान करून शार्लोट चोपिन यांनी राष्ट्रपादी द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा समारंभ पार पडला.
राष्ट्रपाती कार्यालयाच्या एक्स खात्यावरून ही माहिती देण्यात आली. या पोस्टमध्ये म्हटलंय की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्रीमती शार्लोट चोपिन यांना योग क्षेत्रातील पद्मश्री प्रदान करण्यात आला आहे. त्या एक प्रसिद्ध फ्रेंच योग शिक्षिका आहेत.गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्या योग शिकवत असून वयाच्या १०१ व्या वर्षीही त्या योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
कोण आहेत शार्लेट चोपिन?
चोपिन या मूळच्या फ्रान्सच्या असून त्या योग शिक्षिकेचं काम करतात. वयाच्या ५० व्या वर्षी त्या योग शिकल्या. त्यानंतर, १९८२ सालापासून त्यांनी फ्रान्समध्ये योग शिकवण्यास सुरुवात केली. त्यांच्यामुळेच फ्रान्समध्ये योगाची लाट निर्माण झाली असं म्हटलं जातं. फ्रान्स गॉट इनक्रेडिबल टॅलेंट या प्रसिद्ध फ्रेंच टीव्ही शोमध्येही त्या दिसल्या होत्या.
जुलै २०२३ मध्ये पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये बॅस्टिल डे परेडमध्ये सहभागी झाले होते. यावेळी पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची चोपिन यांच्याशी भेट झाली. योग क्षेत्रातील त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन नरेंद्र मोदी यांनी चोपिन यांचे कौतुक केले होते. तसंच योगामुळे आनंद मिळतो असंही त्या मोदींना म्हणाल्या होत्या.
हेही वाचा >> स्त्रियांनो, ‘PCOS’ चा त्रास कसा कराल कमी? आराम मिळण्यासाठी समजून घ्या तज्ज्ञांनी सुचविलेली ही पाच आसने
भारताला योगाची मोठी परंपरा लाभली आहे. भारतीय योग प्रकाराचा जगभर प्रसार केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही २०१४ साली सत्तेवर येताच जून महिन्यात योग दिन साजरा करण्यास सुरुवात केली. भारतात २१ जून रोजी योग दिवस साजरा केला जातो. तसंच, संपूर्ण जून महिनाच योग महिना साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या दिनी योग प्रयोग करून संपूर्ण देशाला प्रोत्साहन देतात. म्हणून चार्लोट चॉपिन यांचा सन्मान करण्यात आला आहे.