गेल्या काही वर्षांत नोकऱ्यांची कमतरता निर्माण झाली असली तरीही जिथं भरती निघते तिथे चांगल्या हुद्द्यावर कोट्यवधींचे पॅकेज दिले जात आहेत. विविध शैक्षणिक संस्थांमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थींनीना अनेक कंपन्या रुजू करून घेतात. तसंच, त्यांना चांगलं पॅकेजही दिलं जातं. केवळ आयटी, इंजिनिअरिंग क्षेत्रापुरतं हे मर्यादित राहिलं नसून विविध क्षेत्रातही याच पद्धतीचा अवलंब सुरू झाला आहे. त्यामुळे एका तरुणीला एप्रिल २०२३ मध्ये तब्बल ६४.६१ लाखांचं पॅकेज मिळालं. अवनी मल्होत्रा असं या तरुणीचं नाव आहे.
अवनी मल्होत्राने IIM संबलपूरमधून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर झालेल्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये तिला मायक्रोसॉफ्टमध्ये संधी मिळाली. या संस्थेतील सर्वाधिक पगार मिळवणारी ती पहिली महिला ठरली आहे. तिला मायक्रोसॉफ्टमध्ये ६४.६१ लाखांचं पॅकेज मिळालं आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार, यंदाच्या प्लेसमेंटमध्ये सर्वाधिक पगारामध्ये १४६.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२३ च्या आर्थिक वर्षात अवनी ही सर्वाधिक पगार घेणारी विद्यार्थीनी ठरली असून सर्वाधिक पगार घेणाऱ्या महिलांच्या यादीतही तिचं नाव आता ठळकपणे घेतलं जाणार आहे.
हेही वाचा >> वडिलांप्रमाणेच रुग्णसेवेत घेतलं वाहून, आज आहे ८२ हजार कोटी व्यवसायाच्या मालकीण; कोण आहेत सुनीता रेड्डी? घ्या जाणून
१३० हून अधिक कंपन्या
अवनीच्या प्लेसमेंटमध्ये सरासरी पगार १६ लाख रुपये होता. कॅम्पस प्लेसमेंट दरम्यान प्रमुख भरती करणाऱ्यांमध्ये डेलॉइट, अॅमेझॉन, EY, Accenture, Amul, Microsoft आणि वेदांत यांचा समावेश होता. जयपूरची असणारी अवनी मल्होत्राने नोकरी मिळवण्यासाठी मुलाखतीच्या सहा फेऱ्या पूर्ण केल्या. इन्फोसिसमधील तिचा तीन वर्षांचा अगोदरचा अनुभव आणि टीम वर्कच्या कौशल्यामुळे तिला ही नोकरी मिळाली आहे. प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये १३० हून अधिक रिक्रूटर्सचा सहभाग होता, तर टेकअवे म्हणजे प्रथमच नियुक्त करणाऱ्यांमध्ये ५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अवनी मल्होत्राने यावर्षी सर्वोच्च पगार मिळवला आहे. आयटी क्षेत्रातील कंपन्यांना टाळे लागण्याची वेळ आलेली असताना मायक्रोसॉफ्टने मात्र मोठ्या पगाराची नोकरी देऊ केली आहे. हे एक आशावादी चित्र असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाच्या कंपन्या आर्थिक मंदीच्या पलिकडे जाऊन प्रतिभावान लोकांची नियुक्त करत आहेत. अवनी मल्होत्रा IIM संबलपूरची पोस्टर गर्ल बनली आहे. तर जागतिक मंदीच्या काळात प्लेसमेंटच्या बाबतीत इतर टॉप मॅनेजमेंट आणि इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूट कसे वागतात हे काळच सांगेल.