रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी ज्यांचे मार्केट कॅप १९६४००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तर मुकेश अंबानी विविध व्यवसायांमध्ये गुंतलेले आहेत. हा व्यवसाय त्यांची मुले आणि त्यांच्या जवळचे सहकारी हाताळतात. प्रचंड मोठा व्यवसाय चालवण्यासाठी मुकेश अंबानी अनेकदा त्यांच्या विश्वासू सहकारी मनोज मोदींवर अवलंबून असतात.
कोण आहेत मनोज मोदी ?
मनोज मोदी हे मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जवळचे सहकारी आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि त्याच्या उपकंपन्यांसाठी ते अनेक महत्त्वाचे निर्णय घेत असतात, म्हणून त्यांना मुकेश अंबानी यांचा उजवा हात म्हणून संबोधले जाते. मुकेश अंबानींनी मनोज मोदींना १५०० कोटींचे घरही भेट दिले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मुकेश अंबानी आणि मनोज मोदी यांच्यातील विश्वास आता त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंतही पोहचला आहे. म्हणजेच मनोज मोदी यांची मुलगी भक्ती मोदी आता ईशा अंबानीच्या रिलायन्स रिटेलमध्ये प्रमुख कार्यकारी आहे.
भक्ती मोदीवर आहे ही जबाबदारी :
रिलायन्स रिटेलची जबाबदारी मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिच्या खांद्यावर आहे. ब्युटी प्रोडक्ट्स टिरा हा प्लॅटफॉर्म एप्रिल २०२३ मध्ये बाजारात दाखल झाला, तर भक्ती मोदी या टिराच्या सह-संस्थापक आहेत. त्या तेथील योजना आणि अंमलबजावणीची काळजी घेतात. टिरा हा प्लॅटफॉर्म नायका, टाटा Cliq पॅलेट, मिंत्रा (Myntra) आणि इतर ब्युटी प्रोडक्ट्स कंपन्यांबरोबर स्पर्धा करतो. भक्ती मोदींची मेहनत, ज्ञान, कौशल्य आणि दृढनिश्चयाने रिलायन्स रिटेलमध्ये त्यांनी स्थान मिळवले आहे. भक्ती मोदी यांनी रिलायन्स रिटेलमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून सुरुवात केली होती. अनेक वर्षांमध्ये तिने विविध पदांवर काम केले आहे.
भक्ती मोदी रिलायन्स रिटेलला नवीन उंचीवर नेणाऱ्या नेतृत्व संघाचा एक महत्त्वाचा भाग झाल्या आहेत. इकॉनॉमिक टाईम्सच्या मते, रिलायन्स रिटेलच्या ब्युटी प्रोडक्ट्स प्लॅटफॉर्मच्या व्यवसायात भक्ती मोदींना अलीकडेच अधिक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आणि गेल्या वर्षी भक्ती मोदींची रिलायन्स ब्रँड्समध्ये संचालकपदी निवड करण्यात आली आहे.
रिलायन्स ब्रँड्सची जागतिक लक्झरी ब्रँड्सोबत पार्टनरशीप आहे. नंतर भारतीय बाजारात त्याची विक्री करण्यात येते. बालेंसियागा (Balenciaga), अरमानी (Armani), ह्यूगो बॉस (Hugo Boss), Versace, मायकेल कॉर्स (Michael Kors) आणि इतर रिलायन्स रिटेलचे पार्टनरशिप ब्रँड म्हणून भारतात उपस्थित आहेत.