Meet Kashish in Hanumankind’s smash hit Big Dawgs: हनुमानकाइंड या भारतीय रॅपरचे ‘बिग डॉग्स’ हे गाणं सध्या यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. संगीत विश्वात गाजलेल्या गाण्यांची यादी करणाऱ्या बिलबोर्ड ग्लोबल २०० चार्टमध्ये हे गाणं सध्या नवव्या स्थानावर ट्रेंड करत आहे. डिजिटल माध्यमांवर गाजत असलेल्या १०० गाण्यांची दर आठवड्याला पसंती क्रमानुसार यादी करण्याचे काम बिलबोर्डकडून केलं जातं. ‘बिग डॉग्स’ या गाण्याची चर्चा करण्याचे कारण म्हणजे, या गाण्याच्या चित्रीकरणात दिसणारी एकमेव महिला. भारतात जत्रेत लागणाऱ्या मेळ्यामध्ये ‘मौत का कुँआ’नावाचा एक रोमांचक खेळ पाहायला मिळतो. दुचाकीस्वार, चारचाकी वाहनं लाकडाने बनविलेल्या गोलाकार रिंगणात आडवी धावताना दिसतात. अंगावर काटे आणणारा हा स्टंट एक महिला करताना दिसते, तेव्हा सहाजिकच तिचं कौतुक वाटतं. हनुमानकाइंड ऊर्फ सूरज चेरुकत या रॅपरने आपल्या गाण्यातून कशिश शेख या स्टंट वुमनला जगासमोर आणले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे गाणं जगप्रसिद्ध झाल्यानंतर पुरुषांची मक्तेदारी असलेल्या मौत का कुआंमधील कशिश चर्चेचा विषय ठरली. द इंडियन एक्स्प्रेसनं कशिशशी संपर्क साधून तिच्या या साहसी प्रवासाची माहिती मिळविली. मुळची कल्याणची असलेली कशिश सांगते की, तिने वीस वर्षांपूर्वी जत्रेमध्ये मौत का कुआंचा खेळ पाहिला. तिथे एका महिलेला हा स्टंट करताना पाहून ती इतकी प्रभावित झाली की, पुढे जाऊन ती याच चमूत सामील झाली. आता कशिश ३० वर्षांची आहे.

रिंगणात धावत्या चारचाकीच्या टपावर निवांत झोपलेली कशिश शेख. (Photo – Big Dawgs Video Song Screengrab)

कशिश आणि तिचा चमू सध्या केरळमध्ये आहे. ‘श्री साई ग्रेट इंडियन मारुती सर्कस’, असे त्यांच्या चमूचे नाव असून ते ४० दिवस पोन्नई शहरातील जत्रेत २० फूट उंचीच्या लाकडी रिंगणात रोज मौत का कुआंचा खेळ सादर करतात. हा खेळ सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, असे सांगितले जाते. या खेळासाठी जत्रेत लाकडी फळ्यांच्या साहाय्याने काही फूट उंच गोलाकार विहिरीसारखे रिंगण उभे केले जाते. सर्वात वरच्या बाजूला कठडा तयार केला जातो, ज्यावर पैसे देऊन प्रेक्षक हा थरारक खेळ पाहू शकतात. या खेळात पुरुषांची मक्तेदारी दिसते. कशिश ही तिच्या चमूतील एकमेव महिला आहे. तिचा नवरा सुतलान शेखसह तीही रोज मौत का कुआंमध्ये उतरते.

हे वाचा >> Women Billionaires in India : भारतातील सर्वांत श्रीमंत महिला कोण? जुही चावलासह ‘या’ महिला उद्योगपतींचा यादीत समावेश!

केरळच्या मल्लपूरम येथील पोन्नई शहरात शेख दाम्पत्याच्या कॅम्पमध्ये बिग डॉग्स गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. यूट्यूबवर आतापर्यंत या गाण्याला ९७ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. पोन्नई येथील जत्रा ५ मे रोजी संपली होती, पण गाण्याच्या चित्रीकरणासाठी आम्ही रिंगण तसेच ठेवले. गाण्याचे दिग्दर्शक बिजॉय शेट्टी यांनी एका दिवसात गाण्याचे चित्रीकरण संपवले, असे कशिशने सांगितले. गेल्या काही वर्षांत मौत का कुआं पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या रोडावली आहे. मात्र, आता हनुमानकाइंडच्या ‘बिग डॉग्स’ या गाण्यामुळे प्रेक्षक पुन्हा हा खेळ पाहण्यासाठी येतील, अशीही आशा कशिशला वाटते.

‘श्री साई ग्रेट इंडियन मारुती सर्कस’चा कॅम्प

हे ही वाचा >> बॅडमिंटन व्हाया क्रिकेट! नित्या श्री सिवनची कमाल; पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये जिंकलं कास्यपदक

सुरुवातीच्या दिवसात कशिशला भीती वाटत होती, पण तिचा सहकारी आणि नंतर पती झालेल्या सुलतानने तिला आत्मविश्वास दिला. “प्रशिक्षण घेतानाच्या दिवसात मी गिअर्स बदलताना किंवा वेग वाढवताना चूक केली तर दुचाकीसह खाली पडायचे, तेव्हा सुलतान मला पकडायचा. आजही प्रत्येक खेळापूर्वी तो माझी दुचाकी नीट तपासतो”, असे कशिश सांगते. द इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधत असताना ती काहीशी लाजाळू आणि मितभाषी असल्याचे दिसले, कदाचित शिक्षणाच्या अभावामुळे तिला बोलण्यात अडचण येत असेल, पण बिग डॉग्सच्या व्हिडीओमध्ये तिचे वेगेळेच रूप दिसते. रिंगणात उतरल्यानंतर हात सोडून दुचाकी चालविणे आणि आडव्या चार चाकीच्या टपावर निवांत झोपणे, असे स्टंट ती लिलया पार पाडते.

कशिश सांगते की, तिला खेळ सादर करताना आता कोणतीही भीती वाटत नाही. लोकांचे मनोरंजन करणे एवढाच तिचा उद्देश असतो. लोकं खूश झाली तर आम्हालाही समाधान मिळते.

कशिश आणि सुलतान यांनी २००६ साली एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांच्या पालकांनी आंतरधर्मीय लग्नाला विरोध दर्शविला होता, त्यामुळे आम्ही त्यांची परवानगी मिळण्याची वाट पाहिली. पण, दरम्यानच्या काळात आम्हाला दोन मुलेही झाली, असे खळखळून हसत हसत कशिशने सांगितले. अखेर २०११ साली त्यांनी लग्न केले. लग्नानंतर कशिशच्या सासूने तिचे खरे नाव कांचन बदलून कशिश असे केले. सुलतान मात्र तिला आजही कांचन अशीच हाक मारतो. कशिश आणि सुलतानची मुले आता १७ आणि १५ वर्षांची झाली आहेत. दोघेही कशिशच्या आजोळात कल्याणमध्ये राहतात.

आणखी वाचा >> Karsen Kitchen : अंतराळात जाणारी सर्वांत तरुण महिला; २१ व्या वर्षी इतिहास रचणारी कार्सेन किचन कोण?

कशिश शेख आणि तिचा पती व सहकारी सुलतान शेख. (Express Photo)

भटके आयुष्य आणि रिंगणातला थरार

कशिश आणि सुलतानला सतत फिरतीवर राहावे लागते. या दोघांसह त्यांच्या चमूमध्ये पाच जण आहेत, ज्यामध्ये तीन रायडर्स आहेत. प्रत्येक जत्रेत १५ ते ४० दिवसांचा मुक्काम असतो. जत्रेचे पाच दिवस उरले असताना आम्हाला पुढच्या ठिकाणाचा पत्ता मिळतो. जत्रा संपताच आम्ही आमचे सामान उतरवून ट्रकमध्ये भरतो आणि पुढच्या जत्रेसाठी रवाना होतो.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meet kashish daring woman stunt rider in a maut ka kuan present in hanumankinds super hit song big dawgs chdc kvg