अनेकदा असे म्हटले जाते की, जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवते तेव्हा अनेक जण या गोष्टीचा फायदा घेतात. यामुळे काही जण खचून जातात किंवा हार मानतात. पण, काही जण याला अपवाद असतात. ते या कठीण प्रसंगावर मात करून यशस्वी होण्यासाठी धडपडताना दिसतात. तर आज आपण या लेखातून अशाच एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत; ज्या महिलेनं कठीण परिस्थिती डोळ्यासमोर असतानादेखील मेहनत करणे कधीच सोडले नाही.
लिसा जॉन्सन ही महिला इंग्लंडमधील बेडफोर्डशायरची रहिवासी आहे. लिसा जॉन्सन जुळ्या मुलांची आई आहे. पण, या महिलेचं काही कारणास्तव लग्न मोडलं आणि त्याचवेळी तिने नोकरीसुद्धा गमावली. अशा कठीण प्रसंगानंतरही जुळ्या मुलांच्या आईने हार मानली नाही आणि जगण्यासाठी धडपड केली. तिने ३६ लाख रुपयांचे कर्ज काढले. पण, पुढील सात वर्षांत तिने केवळ हे कर्जच फेडले नाही तर अंदाजे १६५ कोटी रुपयांची संपत्तीही निर्माण केली आणि लिसा जॉन्सन सध्या खासगी विमानातून प्रवास करते.
लिसा जॉन्सनला तिच्या वडिलांनी लहानाचं मोठं केलं. दुर्दैवाने, तिचे बालपणही दादागिरी (बुलिंग) आणि गरिबीत गेले. गरीब असल्याने तिला खूप त्रास दिला जात असे आणि ती जुने (सेकंडहँड) कपडे घालायची. सततच्या दादागिरी आणि तणावामुळे लिसा जॉन्सनने लहानपणी शाळा सोडली. त्यानंतर ती एका कार्यालयात प्रशासकीय सहाय्यक म्हणून काम करू लागली. तिथे मिळणाऱ्या पगाराच्या मदतीने लिसा जॉन्सनने तिचा अभ्यास सुरू ठेवला आणि वयाच्या २७ व्या वर्षी कायद्याची पदवी मिळवली. लंडनच्या कॅनरी वार्फमध्ये काम करत असताना तिला वर्षाला अंदाजे ६२ लाख रुपये मिळत होते. याच काळात लिसा जॉन्सनला जुळी मुले झाली. पण, दुर्दैवाने तिचे लग्न फार काळ टिकले नाही. आपल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी लिसा जॉन्सनला तिची नोकरी सोडावी लागली आणि जवळपासची एखादी नोकरी करावी लागली; तेथे तिला फक्त २० लाख रुपये पगार दिला जायचा.
मुलांची काळजी घेण्यासाठी लिसा जॉन्सनने कमी पगाराची नोकरी स्वीकारली, पण खर्च पुढे वाढतच गेला. त्यामुळे तिच्यावर ३६ लाखांचे कर्ज झाले. लिसा जॉन्सनने हार न मानता नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. तिच्या आयुष्याला दिशा देऊ शकेल असे काहीतरी शिकण्यासाठी, लिसा जॉन्सनने ग्रंथालयात जाऊन व्यवसाय कल्पनांशी संबंधित एक पुस्तक उचलले. पुस्तकातून जे काही शिकायला मिळालं ते ती इतरांनाही शिकवू लागली. २०१७ पासून, लिसाने तिच्या वन टू मनी कोर्स आणि रेस टू रिकरिंग रेव्हेन्यू चॅलेंजद्वारे ५० हजारांहून अधिक नवोदित उद्योजकांना मदत केली आहे आणि त्यातील काही उद्योजक आता करोडपती बनले आहेत. लिसाने गरिबीतून स्वतःला सावरत यशाचा नवा अध्याय लिहिला. गेल्या सात वर्षांत तिने १६५ कोटी रुपयांची संपत्ती निर्माण केली आहे. बिझनेस स्ट्रॅटेजिस्ट लिसा केवळ तिच्या बिझनेस प्रोडक्ट लाँचमधून पैसे कमवत नाही तर ती ‘मेकिंग मनी ऑनलाइन’ या पॉडकास्टचे होस्टदेखील करते. लिसा जॉन्सन इतर लोकांना पैसे कमवण्याच्या युक्त्यादेखील शिकवते. तर अशी आहे गरिबीवर मात करणाऱ्या लिसा जॉन्सनची गोष्ट.