NAMO Drone Didi Scheme : कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढताना दिसतोय. यातून महिला सक्षम होत आहेत. शिवाय त्यांचे कुटुंबही आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहे. यात महिलांचा आधुनिक शेती पद्धतीतही मोलाचे सहकार्य मिळतेय. याच आधुनिक शेती पद्धतीतून आता महिला शेतकऱ्यांना समृद्ध करणारी ड्रोन दीदी नावाची योजना सुरू करण्यात आली. ज्याचा अनेक शेतकरी महिलांना फायदा होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंजाबच्या बर्नाला जिल्ह्यातील सेखा गावातील दहावीपर्यंत शिकलेल्या किरणपाल कौर (३४) यांना काही महिन्यांपूर्वी ड्रोन म्हणजे माणसाशिवाय उडणारी वस्तू एवढेच माहीत होते. पण आता त्या एक प्रशिक्षित ड्रोन पायलट आहेत. त्यांनी जेव्हा पहिल्यांदा ड्रोन यशस्वीपणे उडवले तेव्हा जगाचा एक छोटासा भाग त्यांच्या नियंत्रणात असल्याचा अनुभव त्यांना आला.

याविषयी किरणपाल कौर सांगतात की, “मी कधीच विमानात प्रवास केला नाही, पण मला आता विमानात बसल्यासारखे वाटते. यामुळे मला आत्मविश्वास आला की, मी काहीही साध्य करू शकते. हे सर्व माझ्या हातात आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू केलेल्या नमो ड्रोन दीदी योजनेंतर्गत ती लवकरच तिचे स्वत:चे ड्रोन घेऊन एका ई-वाहनातून तिच्या जिल्ह्यात खते आणि कीटकनाशकांची फवारणी करणार आहे.

मोदींनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान, ही योजना सुरू केली होती, यात देशभरातील किमान १५,००० ‘ड्रोन दीदींना’ प्रशिक्षण देण्याची योजना जाहीर करण्यात आली. यात ड्रोनचा वापर करून शेतात फवारणी करून कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान क्रांती आणली जाईल, तसेच ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करण्याबरोबरच श्रम खर्च कमी करणे, तसेच वेळ आणि पाण्याची बचत करणे हे या योजनेचे उद्दीष्ट्य आहेत.

बचत गटांच्या (एसएचजी) माध्यमातून देशात किमान दोन कोटी लखपती दीदी (लाखांत कमावणाऱ्या ग्रामीण महिला) निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मोदींनी जाहीर केले होते. देशातील सर्वात मोठी रासायनिक खत उत्पादक कंपनी इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO) द्वारे प्रशिक्षित झालेल्या ३०० महिलांच्या पहिल्या तुकडीतील किरणपाल ही एक महिला होती. दरम्यान सहकारी प्रशिक्षित महिला ड्रोन आणि ई-वाहनेही मोफत पुरवणार आहेत.

किरणपालसाठी हा प्रवास सोपा नव्हता. कारण तिचा नवरा एक बांधकाम कामगार आहे, जो दिवसाला सुमारे ५०० -७०० रुपये कमवतो आणि ती स्वत: बचत गटाद्वारे घरगुती लोणची विकून महिन्याला सुमारे ३००० रुपये कमवत होती.

पण एक महिन्यापूर्वी, तिने तिच्या तीन महिन्यांच्या मुलासह गुडगावच्या मानेसर येथील प्रशिक्षण केंद्रासाठी तिचे गाव सोडले. या प्रवासाविषयी किरणपाल सांगतात की, जेव्हा आम्ही प्रशिक्षण केंद्रात पोहोचलो, तेव्हा मला समजले की, सर्व काही इंग्रजीत आहे. मी फक्त दहावी पास आहे आणि शाळा सोडून जवळजवळ १८ वर्षे पूर्ण झाली होती. त्यानंतर मी आता पुन्हा पुस्तकांना स्पर्श करत आहे.

मी ड्रोन प्रशिक्षणाला गेले तेव्हा आईला प्रचंड तडजोड करावी लागली. परंतु, मी प्रशिक्षण पूर्ण करून आल्यावर तिला माझा खूप अभिमान वाटला, असंही त्या म्हणाल्या. प्रॅक्टिकली ड्रोन हाताळण्याआधी, आम्हाला प्रथम थिअरी स्पष्ट करावी लागली. आमचे प्रशिक्षक खूप सहकार्य करत होते आणि त्यांनी आम्हाला हिंदी आणि पंजाबीमध्ये नोट्सचे भाषांतर करण्यास मदत केली. एकदा मी थिअरी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मागे वळून पाहिले नाही. यशस्वी प्रशिक्षणानंतर आणि हातात प्रमाणपत्र घेऊन आम्ही परत आलो, तेव्हा माझ्या नावाबरोबर आता ‘पायलट’ हा शब्द जोडला गेल्याचा सर्वांना अभिमान वाटत आहे. आता, ‘पायलट’ हा शब्द मी आयुष्यात कमावलेल्या ट्रॉफीसारखा वाटतो, असंही त्या म्हणाल्या.

इफकोने तयार केलेल्या अंदाजानुसार, या योजनेतून ड्रोन दीदींना दरवर्षी किमान ७ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. विविध क्षेत्रातील आणि शैक्षणिक पात्रता असलेल्या महिलांनी, ज्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे किंवा पदव्युत्तर पदवी घेतलेल्या आहेत, त्या आता ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षित होण्यासाठी अर्ज करत आहेत. त्यांच्याशी गाव-पातळीवर कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या नेटवर्कने संपर्क साधला, ज्यात GT Bharat, Farmer Producers Organisation (FPO) आणि इतरांचा समावेश आहे, ज्यांनी त्यांना पुढे IFFCO शी जोडले.

त्यांच्या निवड प्रक्रियेमध्ये मुलाखतींचा समावेश होता, ज्यामध्ये त्यांची शेतीविषयक मूलभूत ज्ञानाची चाचणी घेण्यात आली. पंजाबमधून निवड झालेल्यांमध्ये मोगा जिल्ह्यातील रतियान गावातील जसविंदर कौर धालीवाल (४६) यांचे नाव होते. ज्यांनी १२ वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांच्याप्रमाणे गावातील किमान १५ महिला बचत गटांमध्ये सहभागी आहे.

जसविंदर सांगतात की, प्रशिक्षणापूर्वी, मी फक्त पंजाबी लग्नांमध्ये ड्रोनवर फोटो क्लिक करताना आणि व्हिडिओ रेकॉर्ड करताना पाहिले होते, ड्रोन प्रशिक्षणातील थिअरी स्पष्ट केल्यानंतर, प्रशिक्षकांनी त्यांना वास्तविक ड्रोनचे नियंत्रण ठेवण्याआधी संगणकावर ड्रोन कसे करायचे ते शिकवले.

“एक एकर फवारणीसाठी ड्रोनला फक्त सात मिनिटे लागतात. ड्रोन उडवताना तीन झोनकडे लक्ष देणे गरजेचे असते. ते म्हणजे लाल, पिवळा आणि हिरवा. ड्रोन रेड झोनमध्ये उडू शकत नाही. या ड्रोनवर एक टाकी बसवली आहे, जी तुम्हाला १० लिटर पाणी आणि एक लिटर खत किंवा कीटकनाशकाने भरली जाते, असही जसविंदर सांगतात.

मोगाच्या सोसन गावातील २० वर्षीय प्रीती शर्मा, जिने कॉम्प्युटरवर डिप्लोमा कोर्स केला आहे, ती रिसेप्शनिस्ट म्हणून महिन्याला ६००० रुपये कमावते, पण तिच्या सहकारी बँकेत शिपाई म्हणून काम करणाऱ्या तिच्या वडिलांनी तिला ड्रोन पायलटचे प्रशिक्षण घेण्यास प्रवृत्त केले.

याविषयी प्रीती सांगते की, मी इंटरनेटवर पाहिले होते की परदेशातील शेतात ड्रोनचा वापर केला जातो. जेव्हा मी पहिल्यांदा ड्रोन हाताळले तेव्हा ते क्रॅश होईल याची मला भीती वाटत होती, परंतु नंतर आम्हाला समजले की, ते इतके कठीण नाही. आता, मी ड्रोन घेऊन त्यांच्या शेतात फवारणी करायला सुरुवात करेन, यासाठी माझ्या गावातील सर्व शेतकरी माझी वाट पाहत आहेत.

यावर लुधियानाच्या बरुंडी गावात आपल्या पतीबरोबर पाच एकर शेतात काकडी पिकवणाऱ्या मनदीप कौर पन्नू (४०) म्हणाल्या की, तिला माहित आहे की, कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन प्रवेश करत आहेत. आम्ही लहान शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी आणि त्यांना बियाणे, कीटकनाशके, युरिया इत्यादी पुरवण्यासाठी आधीच FPO सोबत काम करत आहोत. त्यामुळे आम्हाला असे वाटले की, आम्हाला ड्रोन मिळाल्यास आमच्या भागातील अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. रात्री उशिरापर्यंत आम्ही थिअरी परीक्षेसाठी अभ्यास केला तेव्हा मला माझे कॉलेजचे दिवस परत आल्यासारखे वाटले, असे प्रीती सांगते.

छोट्याश्या गावातील क्रिकेटची मोठी गोष्ट! चक्क पुरुष नसल्यानं महिलांसाठीच भरवली स्पर्धा

हिमाचल प्रदेशातील मंडीतील नागरांव येथील झीनत शर्मा (३७) सारख्या महिलांचीही या योजनेत प्रशिक्षण घेण्याची आवड होती. तिच्या कुटुंबाकडे सफरचंदाच्या बागा आहेत आणि तिच्या पतीचा रासायनिक खत/कीटकनाशकांचा व्यवसाय आहे. यामुळे मायक्रोबायोलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवीधर आणि माजी शिक्षक असलेल्या शर्मा यांना ड्रोन प्रशिक्षणादरम्यान कोणतीही समस्या आली नाही.

याविषयी त्या सांगतात, आम्ही सफरचंदाच्या बागांमध्येही डीएपी आणि युरिया सारख्या खतांची फवारणी करतो. पण फळबागा डोंगर उतारावर असल्याने तिथे काम करताना खूप अडचणी येतात. मला सफरचंद शेतीची माहिती लहानपणापासूनच आहे, त्यामुळे मला त्याच्याशी संबंधित काहीतरी नवीन शिकायचे होते.

पंजाबमधील ग्रामीण महिलांचा दृढनिश्चय मला आश्चर्यचकित करणारा आणि प्रेरणादायी वाटला. ज्यांच्यासाठी प्रशिक्षकांनी प्रथम संपूर्ण अभ्यासक्रम हिंदीत अनुवादित केले आणि नंतर ते पंजाबीमध्ये भाषांतरित केले जाईल.

इफकोने तयार केलेल्या अंदाजानुसार, या योजनेतून ड्रोन दीदींसाठी वर्षाला किमान ७ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे, जरी त्यांनी वर्षातून फक्त २०० दिवस काम केले आणि दिवसाला २० एकर फवारणी केली. तर त्या शेतकर्‍यांकडून प्रति एकर ३०० रुपये किंवा त्याहून अधिक शुल्क आकारणार आहेत.

“ड्रोन दिदींनी २० एकरांवर २०० दिवस फवारणी केल्यास ३०० रुपये प्रति एकर दराने १२ लाख रुपये कमावतील. जर आम्ही ड्रोनच्या देखभालीचा खर्च वगळला आणि त्यांनी वाहन चालवण्यासाठी (ज्यावर ते शेतात जाण्यासाठी) सहाय्यक ठेवला तर ते सहज ७ लाख रुपयांचा नफा मिळवतील,असं इफकोचे मार्केटिंग हेड योगेंद्र कुमार म्हणाले.

ते पुढे असेही म्हणाले की, प्रशिक्षित महिला ड्रोन पायलटना 25,000 MAH बॅटरी असलेले मध्यम श्रेणीचे ड्रोन दिले जातील, जे २० -२५ मिनिटे आरामात उडू शकतात तसेच चार अतिरिक्त बॅटरी आणि तीन चाकी ई-वाहन दिले जाईल. हा संपूर्ण सेटअप विनामूल्य दिला जात आहे, अन्यथा प्रत्येक महिलेसाठी १३ – १४ लाख रुपये भरावे लागतील. देशासाठी टप्प्याटप्प्याने २५०० ड्रोन खरेदी करण्याची योजना आहे. महिलांना २६ जानेवारी किंवा त्यापूर्वी ड्रोन मिळणे अपेक्षित आहे.

इफकोने गुडगावस्थित ड्रोन डेस्टिनेशन या प्रशिक्षण कंपनीच्या सहकार्याने प्रशिक्षित केलेल्या महिलांच्या पहिल्या तुकडीत पंजाबमधील २२, हरियाणातील २०, राजस्थानमधील २४, महाराष्ट्रातील २९, हिमाचल प्रदेशातील चार, गुजरातमधील १८, मध्य प्रदेशातील २३ महिलांचा समावेश आहे. तर उत्तर प्रदेशातील २८, केरळमधील दोन, बिहारमधील १०, उत्तराखंडमधील तीन, कर्नाटकातील २०, आसाममधील नऊ, तेलंगणातील ११, तामिळनाडूतील १६ आणि आंध्र प्रदेशातील १३ जणींचा समावेश आहे.

केंद्राच्या खत विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, शेतात फवारणी करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पारंपारिक मॅन्युअल पद्धतीमध्ये प्रति एकर १००-२०० लिटर पाणी वापरले जाते, तर ड्रोन वापरून फक्त १० लिटर पाण्याने हेच केले जाऊ शकते.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meet punjabs drone didis rural women set for career as drone pilots namo drone didi scheme ltdc sjr