Success story: आजही अनेकांकडून मुलाच्या जन्मासाठी अट्टहास धरला जातो. मुलगाच हवा अशा मानसिकतेची अनेक उदाहरणे दिसून येतात. मात्र, या वृत्तीला छेद देत मुलीसुद्धा वंशाचे नाव उंचावू शकतात हे दाखवून देणारे अलीकडचे उत्तम उदाहरण म्हणजे नीतू यादव व कीर्ती जांगडा या दोन तरुणी. या दोघींनी बेंगळुरूमधील एका खोलीच्या कार्यालयातून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली आणि आज त्यांचा हा प्रवास एका मोठ्या समूहात पसरला असून, त्या कोटींची उलाढाल करीत आहेत. देशात, गाय, म्हैस, बकरी आणि इतर पाळीव प्राणी हे शहरातील बाजारांतून खरेदी केले जातात आणि तेथे विकले जातात. पण, काळ बदलला आणि आता हे प्राणी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही विकले जाऊ लागले आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा अनोखा व्यवसाय दोन मुलींनी मिळून देशभरात सुरू केला आहे. त्यांच्या या स्टार्टअपचे वार्षिक उत्पन्न ५५० कोटींहून अधिक आहे.
या तरुणींनी तयार केलेले हे अॅनिमल अॅप देशभरातील ८० लाख शेतकरी वापरत आहेत. आणि या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ८.५ लाखांहून अधिक जनावरांची विक्री झाली आहे. काही वर्षांपूर्वी गाई, म्हशी, शेळ्या आणि इतर पाळीव प्राणी मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या विकत घेता येतील, असे स्वप्नातही कुणा शेतकऱ्याला वाटले नसेल. मात्र, या तरुणींनी हे शक्य करून दाखवले आहे.
कसे सुरू केले अॅप?
हे अॅपसुद्धा फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, झोमॅटो या ऑनलाइन प्लॅटफॉर्मसारखेच आहे. अॅनिमल अॅपसारखे स्टार्टअप सुरू करण्याची कल्पना नीतू यादव व कीर्ती जांगडा यांना सुचली. नीतू यादव आणि कीर्ती जांगडा या दोघीही आयआयटी दिल्लीतून उत्तीर्ण झाल्या आहेत. या दोघींबरोबर त्यांचे दोन मित्र अनुराग बिसोय व लिबिन व्ही. बाबू यांनी मिळून हा व्यवसाय सुरू केला.
५० लाखांच्या भांडवलातून ५०० कोटींचा व्यवसाय
ऑगस्ट २०१९ मध्ये हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी नीतू व कीर्ती यांना शेतकऱ्यांचे मत जाणून घ्यायचे होते. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांमध्ये एक सर्वेक्षण केले. त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांना नीतू व कीर्ती यांची संकल्पना खूप आवडली. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत नोव्हेंबर २०१९ मध्ये नीतू व कीर्ती यांनी ५० लाख रुपयांच्या भांडवलासह ही स्टार्टअप कंपनी सुरू केली. आजच्या घडीला ८० लाख शेतकरी या ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी जोडले गेले आहेत.
१०० किलोमीटरच्या परिसरातील प्राण्यांची खरेदी-विक्री
अॅनिमल मोबाइल अॅपवर घरबसल्या जनावरांची ऑनलाइन खरेदी-विक्री करता येते. या अॅपचा वापर करून, तुम्हाला तुमच्या ठिकाणापासून १०० किलोमीटरच्या परिसरातील प्राणीविक्रेते आणि खरेदीदार यांची माहिती मिळते. अशा प्रकारे आपण त्यांच्याशी सहजपणे संपर्क साधू शकता आणि पाळीव प्राण्यांची खरेदी-विक्री करू शकता.
हेही वाचा >> ‘ही’ महिला चालवते ४१ हजार कोटींची मद्याची कंपनी, पगाराचा आकडा पाहून थक्क व्हाल!
फोर्ब्सच्या यादीत झळकले नाव
अॅनिमल अॅपच्या माध्यमातून दर महिन्याला ३५० कोटी रुपयांचा व्यवसाय होतो. कीर्ती आणि नीतू यांनी मिळवलेल्या यशाची देशभर चर्चा सुरू आहे. अॅनिमल अॅपच्या त्यांच्या संकल्पनेची आणि त्यांच्या चांगल्या कामाची प्रशंसा करीत फोर्ब्स या मासिकाने या दोघांचाही ३० वर्षांखालील वयोगटातील सुपर-३० च्या यादीत समावेश केला आहे