असं म्हणतात, तुमचं वय आणि परिस्थिती काहीही असू देत, जर तुमच्यात जिद्द असली तर सर्वकाही यशात बदलण्याची क्षमता तुमच्यात असते. जिद्द ही नेहमीच परिस्थितीला झुकण्यास भाग पाडते. स्वप्न उराशी बाळगले की ते पूर्ण करण्यासाठी लागते ती फक्त जिद्द आणि चिकाटी हे दोन गुणधर्म आपल्याजवळ असले की, आपण कितीही प्रतिकूल परिस्थितीत असलो तरी आपल्याला या परिस्थितीशी सामना करून आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचता येते. अशाच एका महिलेनं परिस्थितीवर मात करत आकाशात झेप घ्यायची ठरवलं आणि आता ती अमेरिकेतल्या ‘की सॉफ्टवेअर सोल्युशन्स’ची सीईओ आहे.
प्रचंड इच्छाशक्ती, असामान्य आत्मविश्वास आणि जबरदस्त कार्यशक्ती असलेल्या माणसाने ठरवले तर काहीही अशक्य नसते, हे ज्योथी रेड्डीने तिच्या चिकाटी, कठोर परिश्रम आणि असामान्य कर्तृत्वाने साऱ्या जगाला दाखवून दिले. आज आपण या लेखात ज्योथी रेड्डी यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.
पाच रुपये रोजावर शेतमजुरीचं काम
ज्योथीचा जन्म विशाखापट्टणम येथील वारंगम गावात १९७० साली झाला. पाच बहिणींमध्ये ज्योथी सगळ्यात लहान. घराची परिस्थिती अतिशय गरीब आणि हलाखीची आणि म्हणूनच ज्योथीची रवानगी अनाथ आश्रमात झाली. आर्थिक अडचणींमुळे तिला लग्न करावं लागलं. १८व्या वर्षी ती दोन मुलींची आई झाली. ५ रुपये रोजावर शेतमजूरीचं काम केलं, नंतर मात्र तिने ‘आकाशात झेप घ्यायची’ ठरवलं.
‘नेहरू युवा केंद्रा’कडून एक संधी चालून आली
केंद्र सरकारच्या योजनेमुळे तिच्या आयुष्यात पहिला टर्निंग पॉइंट आला. ‘नेहरू युवा केंद्रा’कडून एक संधी चालून आली, ज्यामुळे तिला पुढील शिक्षणाची संधी मिळाली. पण, पुरेसे पैसे नसल्यानं तिने रात्री टेलरिंगचे काम करून स्वत:चा आणि मुलींचा उदरनिर्वाह केला. हे करत असतानाच ज्योथीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटीतून कला शाखेतलं शिक्षण पूर्ण केलं. यासोबतच ती टायपिंगसुद्धा शिकली. खरंतर हे अजिबातच सोपं नव्हतं, कारण पैश्यांची चणचण तर होतीच, पण घरी लक्ष देताना ओढाताण होत असल्याने जवळच्या नातेवाईकांचा भयंकर त्राससुद्धा तिला सहन करावा लागत होता.
ज्योतीने १९९४ मध्ये डॉ. बीआर आंबेडकर मुक्त विद्यापीठातून बीए आणि १९९७ मध्ये काकतिया विद्यापीठातून पीजी पदवी मिळवली. या पदवींमुळे तिला अधिक कमाई करण्यात मदत झाली. ज्योथीला एका शाळेत ३९८ रुपयांच्या पगाराची विशेष शिक्षकाची नोकरी मिळाली, परंतु ते पुरेसे नव्हते. या नोकरीसाठी रोज ज्योथीला दोन तासांचा प्रवास करावा लागत असे आणि येण्याजाण्यात तिचा बराचसा पगारसुद्धा खर्च व्हायचा. म्हणून आता यावर तोडगा म्हणून कल्पक आणि कष्टाळू ज्योथीने प्रवासात साड्या विकायला सुरुवात केली.
आयुष्याचा टर्निंग पॉइंट
याचदरम्यान पुढचा टर्निंग पॉइंट आला, जेव्हा एक नातेवाईक अमेरिकेहून भेटीला आले. यामुळे तिला परदेशातील संधींची जाणीव झाली. ज्योतीने कॉम्पुटर कोर्स केला. समाजाच्या आणि तिच्या कुटुंबाच्या दबावाला न जुमानता, आपल्या दोन्ही मुली मिशनरी -हॉस्टेलमध्ये ठेवून त्यांची नीट व्यवस्था लावून ज्योथी अमेरिकेला रवाना झाली.
अमेरिकेमध्ये आणखी मोठा संघर्ष तिची वाट बघत होता. स्वतःचा खर्च भागवण्यासाठी तिने पेट्रोल पंपावर काम करायला सुरुवात केली. तसेच बेबी सिटींग, हमाली अशी कामंसुद्धा ज्योथीने तिथे कुठलीही तमा न बाळगता केली. व्हिडीओ-पार्लरमध्ये काम केलं. एका गुजराथी परिवाराकडे पेइंग गेस्ट म्हणून राहत असताना नातेवाईकांच्या मदतीने तिला एका कंपनीत काम मिळालं आणि नंतर अश्याच दुसऱ्या एका कंपनीत तिला सॉफ्टवेअर रिक्रुटरचा जॉब मिळाला.
हेही वाचा >> एका हातात फुटबॉल, दुसऱ्या हातात दगड; ‘त्या’ एका घटनेनं बदललं काश्मीरच्या अफशानचं आयुष्य
अमेरिकेतील कंपनीच्या सीईओ
मेक्सिकोला स्टॅम्पिंगसाठी गेली असता तिच्या मनात एक कल्पना आली, ”आपणसुद्धा सहजच असाच एक उद्योग सुरू करू शकतो.” कारण ज्योथीला या संदर्भातल्या सगळ्या पेपरवर्कची व्यवस्थित माहिती होती. स्वतःजवळ असलेली सर्व बचत पणाला लावून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. यामध्ये कंपीनीची उलाढाल वाढू लागली आणि अखेरीस २०१७ मध्ये कंपनीची उलाढाल एक अब्ज डॉलरपर्यंत पोहचली. आजही ज्योथी ‘की सॉफ्टवेअर सोल्युशन्स’ यशस्वीपणे चालवते आहे.