IAS Priya Rani success Story : शिक्षण घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, तो कोणापासूनही हिरावून घेता येऊ शकत नाही. मात्र आजही अनेक खेड्यापाड्यांमध्ये मुलींना या अधिकारापासून वंचित ठेवले जाते. विशेषत: मुलींकडून हा अधिकार हिरावून घेतल्याची अनेक प्रकरणं आपण आजवर वाचली असतील.

असाच काहीसा अनुभव आयएएस अधिकारी प्रिया राणी यांच्या वाटेला आला. पण आजोबा आणि वडिलांच्या साथीने त्यांनी आपले आएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आणि गावाकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला. पण त्यांचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता. यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला, त्यांचा हाच संघर्षयम प्रवास आपण थोडक्यात जाणून घेऊ….

प्रिया राणी यांच्या शिक्षणाला बालपणापासूनच गावकऱ्यांचा मोठा विरोध होता. पण विरोधाला न जुमानता त्यांनी धीर धरला आणि अखेर शहर गाठले आणि तिथे भाड्याच्या घरात राहून यश प्राप्त केले. या प्रवासात त्यांच्या पालकांनी त्यांना खूप पाठिंबा दिला. त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली. एकेकाळी त्यांच्या शिक्षणाला विरोध करणारे आज त्यांच्या यशाचा उत्सव साजरा करत आहेत. ही प्रेरणादायी कहाणी आहे बिहारमधील आयएएस अधिकारी प्रिया राणी यांची, जी सोशल मीडियावरही खूप प्रसिद्ध आहे.

प्रिया राणी फुलवारी शरीफ येथील कुरकुरी गावातील रहिवासी आहेत. यूपीएससी परीक्षेत ७९ वा क्रमांक मिळवून त्यांनी बिहारचे नाव अभिमानाने उंचावले. गावात राहणाऱ्या प्रिया यांच्या शिक्षणाला गावकऱ्यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला, पण आजोबांच्या भक्कम पाठिंब्यामुळे त्या त्यांचे शिक्षण पूर्ण करु शकल्या, इतकेच नाही तर अखेरीस त्या आयएएस अधिकारी बनल्या. प्रिया सांगतात की, सुमारे २० वर्षांपूर्वी आजोबांनी त्यांना चांगले शिक्षण घेण्यासाठी पाटणा येथे पाठवले. त्यावेळी गावात मुलींना शिक्षण देण्यास मोठा विरोध झाला, पण त्यांचे आजोबा आणि वडील हे मुलीला शिक्षण देणारच या निर्णयावर ठाम राहिले. यावेळी पाटणा येथे भाड्याच्या घरात राहून प्रिया यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.

बीआयटी मेसरा येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर प्रिया राणी यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी भारतीय संरक्षण सेवेत स्थान मिळवले. मात्र, त्यांचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. तिसऱ्या प्रयत्नात अयशस्वी होऊनही त्यांनी हार मानली नाही. अखेर चौथ्या प्रयत्नात त्यांनी आपले ध्येय गाठले आणि त्या आयएएस अधिकारी बनल्या.

शिक्षण ही जीवनातील सर्वात मौल्यवान संपत्ती

प्रिया राणी त्यांच्या यशाचे श्रेय नियमित अभ्यास आणि मेहनतीला देतात. त्या रोज पहाटे ४ वाजता उठून अभ्यास करत होत्या, एनसीईआरटीची पुस्तके आणि वर्तमानपत्रांसह अर्थशास्त्र हा तिचा मुख्य विषय होता. त्या मानतात की, शिक्षण ही जीवनातील सर्वात मौल्यवान संपत्ती आहे आणि तरुणांना त्यांच्या ध्येयांसाठी समर्पित राहण्यासाठी आणि ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहित करते. प्रिया यांची कहाणी संपूर्ण बिहार राज्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे. मुली कोणतीही मोठी गोष्ट साध्य करु शकतात पण त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना प्रोत्साहनाची गरज असते, समाजात मुलींना शिक्षित आणि प्रगत करणे महत्त्वाचे आहे, असेही त्या अधोरेखित करतात.

प्रिया राणी यांच्या यशाने त्यांच्या गावात प्रचंड आनंद झाला. एकेकाळी त्यांच्या शिक्षणाला विरोध करणाऱ्या लोकांना आता तिच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतोय. मेहनत आणि जिद्द याने कोणतेही ध्येय गाठता येते हे प्रिया यांनी सिद्ध केले. चिकाटी आणि समर्पण कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकते हे दाखवून दिले, त्यांची ही संघर्षमय कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. तसेच ज्यांनी एकेकाळी त्यांच्या शिक्षणास विरोध केला, त्यांना ही चांगलीच चपराक देखील आहे. यातून तुम्ही महेनत, चिकाटीच्या जोरावर तुम्ही यशस्वी झालात तर विरोध करणारेही तुम्हाला डोक्यावर घेतील, हे सिद्ध होते.

Story img Loader