डॉ. शारदा महांडुळे
पिवळसर रंगाचे रसदार, चवदार व थंड असे खरबूज म्हणजे निसर्गाने उन्हाळ्यासाठी आपल्याला दिलेले एक वरदानच म्हणायला हवे. इंग्रजीमध्ये मस्कमेलन, संस्कृतमध्ये खरबुजा तर शास्त्रीय भाषेत कुकुमिस मेलो या नावाने हे फळ ओळखले जाते. हे फळ लंबगोल, अंडाकार, पिवळे, चट्ट्या-पट्ट्यांचे, गोड व थंड असे फळ आहे. एक वेगळ्या प्रकारचा सुगंधही त्याला असतो. खरबूज हे फळ वेलवर्गातील झाडाला येते. खरबुजाच्या अनेक जाती आहेत. त्याचा आकार, रंग, सालीची जाडी व स्वाद यांच्यात त्याच्या जातीनुसार बदल होतो. मूळचे आफ्रिकेतले असणारे हे फळ आता भारतातसुद्धा उष्ण हवामानाच्या प्रदेशात विपुल प्रमाणात पिकते.
औषधी गुणधर्म
खरबुजामध्ये ७० ते ८० टक्के भाग हा गर असतो. त्याच्या बियाही फार उपयोगी असतात. बियांमधून निघणारे तेल गोड व आहारामध्ये उपयुक्त असून पोषक व सारक असते. खरबुजामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन शीतलता निर्माण होते. खरबुजातील साखर ही नैसर्गिक असल्यामुळे तिचे पचन सहज होऊन शरीराला ऊर्जा मिळते. तसेच यामध्ये उष्मांकही भरपूर प्रमाणात असतात.
उपयोग
- खरबूज हे शीत गुणधर्माचे फळ असल्यामुळे उष्णतेचे विकार दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.
- उन्हामुळे शरीराची लाही लाही होत असेल तर शीतपेयांऐवजी खरबूज खावे किंवा त्यांचे ज्यूस प्यावे.
- खरबूज हे सारक असल्याने व त्यामध्ये चोथा भरपूर असल्याने जुनाट मलावस्तंभ या आजारावर उपयुक्त आहे. खरबूज सेवनाने आतड्यातील घट्ट मळ पुढे सरकण्यास मदत होते.
- खरबूज हे अल्कली गुणधर्मयुक्त असल्याने आम्लपित्ताच्या विकारावर ते उपयुक्त आहे. आम्लपित्त झाले असेल किंवा कायम होत असेल तर खरबूज भरपूर खावे.
- अतिसार, आमांश या विकारांमध्ये खरबूज खाणे लाभदायक ठरते. कारण या विकारांमध्ये शरीरातील पाणी कमी होत असल्याने खरबूज सेवनाने शरीरातील जलकमतरता (डी-हायड्रेशन) भरून निघते व अशक्तपणा दूर होतो.
- खरबूज रोज भरपूर प्रमाणात खाल्ल्याने त्यात असणाऱ्या उष्मांकामुळे वजन वाढीस लागते. म्हणून कृश व्यक्तींनी सुडौल बांधा होण्यासाठी नियमित खरबूज खावे.
- खरबुजाच्या सालीचा उपयोग मूत्रावरोधामध्ये होतो. सालीसह खरबूज पाण्यात कुस्करून, गाळून ते पाणी रुग्णाने प्यायल्यास लघवी भरपूर व साफ होते.
- खरबूज हे फळ सहसा जेवल्यानंतर खावे. कारण खरबुजामुळे जेवण उत्तमरीत्या पचते. खरबुजापासून जॅम, सरबत बनवता येते. खरबुजाचा गोड गर काढल्यानंतर उरलेल्या फिकट गरापासून थालीपीठ किंवा पिठात मळून पराठा बनवावा किंवा काकडीच्या कोशिंबीरप्रमाणे कोशिंबीर करावी.
- खरबुजाच्या बिया या बडीशेपसोबत मुखवासासाठी खाव्यात किंवा त्या बदाम पिस्त्यासारख्या खाता येतात तसेच मिठाई सजविण्यासाठीदेखील त्याचा वापर करता येतो.
- उन्हाळ्यामध्ये थंडाईच्या पेयातसुद्धा खरबुजाच्या बिया वापरता येतात. खरबुजाच्या बिया व थोडे पाणी मिक्सरमध्ये घालून त्या बारीक कराव्यात. हा रस गाळणीतून गाळून घ्यावा व गाळलेला रस भाजीच्या रशामध्ये किंवा आमटीमध्ये घालावा. तसेच सूप बनविताना घट्टपणा येण्यासाठीसुद्धा हा रस वापरता येतो. यामध्ये प्रथिने जीवनसत्त्वे व पौष्टिक घटक आहेत.
सावधानता
खरबूज हे कच्चे खाऊ नये. तसेच ते अति पिकलेले व जास्त दबले जाणारे खाऊ नये. असे खाल्ल्याने उन्हाळ्यामध्ये जंतुसंसर्गाची बाधा होऊ शकते. तसेच जास्त काळ फ्रिजमध्ये कापून ठेवलेले फळही सेवन करू नये.
sharda.mahandule@gmail.com