अरुणा अंतरकर
तासकाटा आणि इतिहासातल्या सनावळ्या यांच्याशी आपला छत्तीसाचा आकडा आहे खरा, तरीही साधारणत: १९५६ पासून मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये एक सुवर्णखंड सुरु झाला असं निश्चितपणे म्हणता येईल. ‘इतनीं बडी महफिल और एक दिल किस किस को दूँ,’ अशी त्या काळानं रसिकांची गोड पंचाईत केली! हिंदीत मीनाकुमारी, नूतन, वैजयंतीमाला आणि मराठीत सीमा (देव), जयश्री (गडकर) यांच्यामुळे (या अभिनेत्रींचा एकेरी उल्लेख केवळ त्यांच्याविषयीच्या प्रेमातूनच!) हा रुपेरी ट्रॅफिक जॅम झाला होता. हिंदीमध्ये मीनाकुमारी आणि नर्गिस यांच्यात सिंहासनासाठी जशी अटीतटीची स्पर्धा होती, तशीच मराठीत सीमा आणि जयश्री यांच्यामध्ये होती. जातीवंत रसिक हा ह्रदयाचा गुलाम असला तरी शहाणा असतोच. तो नंबरवारीच्या खुळ्या खेळात अडकत नाही. कृष्णकन्हैय्याप्रमाणे त्याचं ह्रदय विशाल असतं आणि तो या रुपेरी-चंदेरी दुनियेतल्या सगळ्या गुणवती-रुपवतींना त्याच्या ह्रदयात समान स्थान आणि महत्त्व देतो! त्या अप्सरांच्या रुपामधली भिन्नता हा दोष नसून वैशिष्ट्य असतं. हे तो जाणून असतो. म्हणूनच कलासृष्टी अशा अनेक रुप-गुणवतींमुळे बहरत जाते. रसिकांची रुचीपालटाची चंचलता म्हणा किंवा बृहत रसिकतेची ओढ म्हणा, सीमा आणि जयश्री यांच्या रुपानं प्रेक्षकाला रजतपटावर स्वर्ग अवतरल्याचा आनंद मिळाला.
जयश्रीचा अष्टपैलू संचार तमाशाच्या फडापासून मध्यमवर्गीय घराच्या ओट्यावर आणि एखाद्या खेडयातल्या कौलारु घराच्या चुलाणापर्यंतसुध्दा होता. सीमा मध्यमवर्गातली, ब्राम्हणी वाडयात किंवा चाळीत राहाणारी सुंदर शेजारीण होती! अतिशय गोड, मनमोकळी तरीही मर्यादाशील आणि घरगुती व्यक्तिमत्त्वाची. पण ही तिची मर्यादा नव्हती, ते तिचं लक्षवेधी वैशिट्य होतं. तिचं हुकुमाचं पानच म्हणा ना! त्याच्या बळावर ती पडद्यावर येताक्षणीच प्रेक्षकांचं ह्रदय जिंकून घ्यायची आणि त्यांच्या मनात घर करुन राहायची. काहीशा रुंद जिवणीमुळे सीमाच्या चेहऱ्यावरचं गोड स्मित अधिकच लोभसवाणं होऊन जायचं आणि त्यातही खास विशेष म्हणजे ओठांवरचं ते स्मित एकाच वेळी तिच्या लाडिक नजरेतही उमटायचं. सुभग दर्शन या शब्दांचा समान अर्थ म्हणजे सीमा!
सुलोचना (लाटकर) पडद्यावर आली, की घरातला कोणताही कोपरा समईनं तेवणारं देवघर बनायचा. तशीच सीमा पडद्यावर आली की, ती जिथे उभी असेल तिथे कोवळा सूर्यप्रकाश बिलगलेला फुलांचा सुगंधी ताटवा उभा रहायचा. तिच्या एका चित्रपटाचं नाव होतं ‘सुवासिनी’. त्यातलं तिचं अतीव सुंदर, सात्विक आणि मधूर रुप पहाताना वाटलं, की हिचं नाव सीमा नाही, सुहासिनीच असायला हवं! तिच्या देखण्या चेहऱ्यावरच्या प्रसन्नतेला सीमाच नव्हती. कधी तरी एकदा जणू हवापालट म्हणून सीमाला पांढरपेशा कौटुंबिक चित्रपटाऐवजी ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या ‘प्रपंच’मध्ये भूमिका मिळाली. त्यातल्या ‘बैल तुझे हरणावाणी…गाडीवान दादा’ या गाण्यातून सीमानं रसिकांना अक्षरश: भुरळ घातली. तेही तिच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच ती तिच्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत अशा पुरुषी अवतारात, फेटा बांधून दिसली आहे. एरवी तिचं सरळमार्गी व्यक्तिमत्त्व ही अभिनयाची सीमा ठरली असती. परंतु राजा परांजपे (राजाभाऊ) नावाच्या रत्नपारखी दिग्दर्शकाचं सीमाकडे वेळीच लक्ष गेलं. त्यानं या रत्नाला पैलू पाडले आणि सीमाला आघाडीच्या नायिकांमध्ये मानाचं स्थान मिळवून दिलं. राजाभाऊंच्या ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटात सीमानं केलेली अंध गायिकेची भूमिका रसिकांच्या नजरेत भरली. तिथून मराठी चित्रपटांच्या इतिहासातला सीमा नावाचा पुन्हा पुन्हा वाचावा असा अध्याय सुरु झाला.
मराठी चित्रपटावर तेव्हा सुलोचनाबाईंच्या काहीशा प्रौढ आणि भारदस्त नायिकेचं अधिराज्य चालू होतं. त्या वेळी तशाच घरंदाज भूमिका करुन लोकप्रिय झालेल्या सीमापुढे तिचं तरुण वय ही अडचण होतीच. सुस्वभावी, पांढरपेशी तरुण स्त्री साकारण्यात जयश्रीही मागे नव्हती. पण या दुहेरी आव्हानाचा सीमानं समर्थपणे सामना केला आणि त्या दोघींच्या बरोबरीनं आघाडीवरचं स्थान शेवटपर्यंत कायम राखलं. वेळप्रसंगी ‘मोलकरीण’ आणि ‘एक धागा सुखाचा’ या चित्रपटांमध्ये ‘ॲन्टी नायिका’ वळणाच्या नकारात्मक भूमिका करायला ती कचरली नाही. दोन तुल्यबळ अभिनेत्रींशी स्पर्धा हे सीमापुढचं एकमेव आव्हान नव्हतं, ती एकुलती एक अडचण नव्हती. कारकीर्द बहरात असताना तिनं (अभिनेते) रमेश देव यांच्याशी विवाह केला होता आणि फक्त त्यांच्याबरोबरच काम करण्याचा तिचा निर्धार होता. मराठी चित्रपटांची त्या काळातली संख्या बघता हा निर्धार निभावणं ही महाकठीण गोष्ट होती. म्हणूनच बहुधा सीमानं हिंदी चित्रपटांकडे मोहरा वळवला. अगदी योग्य वेळी. तिथेही या निर्धारानं तिची पंचाईत केली. एक तर तिला सहनायिकेच्या भूमिका करायला लागल्या किंवा महमूदसारख्या रुढार्थी नायक नसलेल्या नटाची नायिका व्हावं लागलं.(चित्रपट- ‘मियाँ, बिबी और काजी’) त्यामुळे नलिनी जयवंत, नूतन, नंदा या मराठी अभिनेत्रींनी हिंदी चित्रपटात जे अग्रस्थान मिळवलं, ते सीमापासून दूर राहिलं. मात्र हिंदीतले तिचे चित्रपट आणि दिग्दर्शक लक्षात घेतले, तर तिच्या गुणांची कदर झाली याबद्दल वाद नाही.
यांपैकी चटकन आठवणारे चित्रपट म्हणजे बिमल रॉय यांचा ‘प्रेमपत्र’, सदाशिव राव कवींचा ‘भाभी की चूडीयाँ, ह्रषिकेश मुखर्जींचा ‘आनंद’, गोविंद सरय्या यांचा ‘सरस्वती चंद्र’, गुलजार यांचा ‘कोशिश’ आणि टी. रामाराव यांचा ‘संसार’. ज्या चित्रपटात ती महमूदची नायिका होती, तो ‘मियाँ, बिबी…’देखील महेश कौल या तालेवार दिग्दर्शकाचा होता. ज्या भूूमिकांना त्या काळात प्रचंड मागणी होती, त्या आईच्या भूमिका करण्याचं सीमाचं वय नव्हतं. त्या काळात जयश्रीसह तिच्या ज्या प्रतिस्पर्धी होत्या, त्यांच्यापैकी कुणालाच हिंदी चित्रपटात इतका मोठा काळ काम करायला मिळालं नाही. सीमाची ही कामगिरीदेखील लक्षणीय आहे. गृहिणी होण्यासाठी सीमानं स्वत:मधल्या अभिनेत्रीला मागे ठेवलं. पण तिची ती भूमिका अधिक यशस्वी ठरली. याचं संपूर्ण श्रेय तिला द्यायलाच हवं. तो एक मोठा त्यागच होता.
चंदेरी दुनियेत एखादीलाच हे श्रेयस प्राप्त होतं, हे सीमाचं ऐतिहासिक यश!
lokwomen.online@gmail.com