डॉ. लीना निकम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाभारतामध्ये तर दुःशासनाने द्रौपदीला भर दरबारात खेचून आणले तेव्हा ती रजस्वला व एकवस्त्रा होती असे वर्णन सगळ्यांनीच वाचले आहे. रजस्वला आणि एकवस्त्रा गोष्टींचा काय संबंध असे तेव्हा वाचताना वाटले होते. रजस्वलेने एकवस्त्रा असावे हा नियम’ शुक्रनीती ‘या ग्रंथाने सांगितला आहे. याचा अर्थ रजस्वलेने कंचुकी धारण करावयाची नाही, फक्त साडी नेसावयाची असा होतो. या नियमामागचे नेमके कारण काय असावे याचा उलगडा होत नाही. हे ऐकून मती गुंग होते! काय म्हणावे या अक्कल पाजळण्याला?

पुरूषांच्या मनातील भीतीपायी काय काय सहन करावं लागतं स्त्रियांना!

नंतर मात्र परिस्थिती बदलली. संशोधनाअंती मेडिकल सायन्सने पाळी येते म्हणजे नेमके काय होते आणि तिचा बाऊ करण्यात कसा अर्थ नाही हे शोधून काढले.

आज समाज माध्यमांद्वारे, जाहिरातींमधून किंवा शॉर्ट फिल्म मधून हा बदल आपल्याला दिसून येतो. अलीकडेच एक जाहिरात पाहिली. खूपच वेगळी वाटली आणि आवडली. एक किशोरवयीन मुलगी आपल्या वडिलांसोबत कार मध्ये गप्पा मारते आहे. ती त्यांना सांगते आहे की डब्यात तुम्ही दिलेलं पालक पनीर सगळ्यांना आवडलं .तुम्हाला एका आंटीने रेसिपी विचारली आहे. सोबतच क्लासमध्ये एक लव्ह अफेअर कसं सुरू आहे याबद्दलही तिची बडबड सुरु असते आणि नंतर ती सांगते,’ बाबा माझ्यासाठी केअर फ्री आठवणीने घेऊन ये बरं का! ‘सिंगल पेरेंटिंग निभवणारा बाप तसा फार कमी पाहायला मिळतो. त्यामानाने एकल आईचे प्रमाण खूप आहे. पण त्या जाहिरातीत मात्र तो दिसला. एवढेच नव्हे तर मुलीचा तो खऱ्या अर्थाने मित्र झाला होता. तिच्या पाळीमध्ये सुद्धा तिला मदत करणारा!

मध्यंतरी एक सुंदर प्रसंगही वाचनात आला. भारतातील एक विदुषी अमेरिकेतील टॅक्सीतून प्रवास करत असताना एके ठिकाणी टॅक्सी ड्रायव्हर गाडी थांबवतो आणि शेजारच्या दुकानातून सुंदर बुके घेऊन येतो. खूप आनंदात असतो तो. बाई विचारतात, ‘काय आज खूप आनंदात दिसता? आम्हालाही कारण कळेल का? ‘यावर त्या ड्रायव्हरने दिलेले उत्तर फार सुंदर आहे. तो म्हणाला, ‘होय, आज मी खूप आनंदात आहे. कारण आज माझ्या मुलीची पहिल्यांदा पाळी आली आहे. त्याप्रित्यर्थ तिच्या स्वागतासाठी मी हा सुंदर बुके घेऊन जातो आहे.’ हे वातावरण आपल्या भारतात कधी तयार होणार बरे? आताशा कुठे मुली पाळी विषयी मोकळ्या बोलत आहेत. आमच्या वेळी तर बोलायचीही सोय नव्हती. एका शाळेत मुलीने पाळीलाच पत्र लिहून आपले मन मोकळे केले.ती लिहिते, ‘प्रिय मासिक पाळी, तू मला अजिबात आवडत नाहीस तू आली की माझी चिडचिड होते.. अंगदुखी, पाठदुखी,, कंबरदुखी आणि पायात गोळे येतात.. मला माहिती आहे तू आली नाही तर मी आई होऊ शकणार नाही.. पण तू महिन्याला का येतेस?? वर्षातून एकदा येत जा की! आणि येताना पिंपल्स आणि पोटदुखी घेऊन येऊ नको सोबत म्हणजे झालं! आम्हा मुलींसोबत आमच्या मित्रांना पण पाळी का येत नाही याचं मला गूढ आहे. ते कसे मोकाट सुटलेले असतात. पण पाळीमुळे मी घरी अडकून जाते दर महिन्याला.’ पत्र खरोखर विचार करण्यासारखे आहे.

आम्ही शाळेत शिकत असताना आमच्या वर्गातली एक मुलगी महिन्यातून आठ दिवस हमखास गैरहजर राहायची. तिला विचारले असता चार दिवस तिची पाळी आली म्हणून आई जाऊ देत नव्हती आणि चार दिवस आईची पाळी आली म्हणून तिला घरची सगळी कामं करावी लागत म्हणून ती येत नव्हती. आम्हाला मैत्रिणी प्रमाणे वागवणाऱ्या आमच्या मुठाळ मॅडमनी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा समाज ऐकण्याच्याच मनःस्थितीतच नव्हता. मला आठवतं, माझी पाळी आली तेव्हा खूप घाबरायला झालं होतं. आधी कुणी काही सांगितलंच नव्हतं याबाबत. आई पण बऱ्यापैकी शिकलेली आणि वाचन करणारी होती पण आईनेही आधी कधी कल्पना दिली नव्हती. कदाचित कल्पना देऊ देऊ म्हणता म्हणता पाळी येऊन गेली आणि त्याबाबत सांगायचं राहूनच गेलं असं झालं असावं. त्यादिवशी आईने काहीही न बोलता एक जुनी कॉटनची साडी फाडली त्यात त्याच साडीची एक घडी बसवली आणि विशिष्ट पद्धतीने बांधायला लावलं. बापरे! खूप जखडल्यासारखं वाटत होतं. ओटीपोट दुखत होतं, पायात गोळे आले होते, आपल्या शरीरातून काहीतरी सतत गळतंय ही भावनाच कशीतरी होती. एवढं सारं ब्लिडींग! येतं तरी कुठून? झोपून रहावसं वाटत होतं. आई पण म्हणाली, ‘आराम कर. कमी होईल ते. आई होण्यासाठी सोसावंच लागतं बेटा बाईला हे!’

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Menstrual cycle awareness family education asj