स्त्रीला मासिक पाळी येणं हे निसर्गाचं वरदान वगैरे मानलं जात असलं, तरी त्याबरोबर सहन करावे लागणारे विविध त्रासही स्त्रियांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत! पाळीच्या दिवसांत होणाऱ्या वेदना, क्रॅम्प्स्, पाळावी लागणारी अतिरिक्त स्वच्छता, थकवा हे आपण जरा वेळ बाजूला ठेवू या. तरी दिवसभर जिथे पॅड बदलण्याची संधी क्वचितच मिळणार असते तेव्हा किंवा रात्री झोपल्यानंतर पाळीमुळे कपडे वा अंथरूणावर डाग पडेल की काय, ही चिंताच असते. विशेषत: ज्या स्त्रियांना मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव होतो किंवा पाळीच्या चार दिवसांत रोज ठराविक गतीनं रक्तस्त्राव न होता रक्तस्त्रावाचं प्रमाण एखाद्या दिवशी कमी आणि एखाद्या दिवशी जास्त असं असतं, तेव्हा ‘डाग पडला तर…’ अशी शंकेची पाल चुकचुकतेच. यासाठी काही साध्या टिप्स पाहू या…
आणखी वाचा : नातेसंबंध: पोटची मुलगी परक्याचं धन कसं?
१) पँटी योग्य प्रकारचीच हवी.
सॅनिटरी पॅड वापरल्यानंतरही तुमच्या पँटीला डाग लागत असेल, तर एकतर तुमचं सॅनिटरी पॅड पुरेसं ठरत नाहीये किंवा तुम्ही चुकीची पँटी वापरत आहात! सॅनिटरी पॅडस् चाच विचार केला, तर हल्ली बहुतेक सर्व सॅनिटरी पॅडस् ना ‘विंग्ज’ असतात. मासिक पाळीत वापरण्याची पँटी तुम्हाला ‘फिट’ बसणारी हवी, सैल अजिबात नको. तसंच सॅनिटरी पॅडचे विंग्ज त्यावर दोन्ही बाजूंनी नीट चिकटवता येणं आवश्यक आहे. त्यासाठी चांगल्या दर्जाच्या, जाड होजिअरी कॉटनची पँटी योग्य ठरेल. पँटी कॉटनची नसेल किंवा त्याच्या कापडात कॉटन व्यतिरिक्त इतर कुठला ‘ब्लेंड’ धागा असेल, तर काही वेळा त्यावर पॅड वा पॅडचे विंग्ज नीट चिकटत नाहीत किंवा तिचं कापड काही ठिकाणी जास्त ताणलं जाऊ शकतं आणि त्यामुळे चांगलं फिटिंग मिळत नाही. ही टिप वाचायला कितीही क्षुल्लक वाटली, तरी तिचा खूप फायदा होतो, हे लक्षात घ्या!
आणखी वाचा : सुंदर त्वचा हवी? ‘बनाना’ हैं ना!
२) योग्य सॅनिटरी पॅड निवडा आणि झोपायच्या आधी पॅड बदला.
काही सॅनिटरी पॅडस् खास ‘हेव्ही फ्लो’साठीच तयार केलेली असतात, ती अधिक काळ वापरता येण्याजोगी व शोषण्याची अधिक क्षमता असलेली असतात. तर काही पॅडस् हेव्ही फोलसाठी उपयुक्त ठरत नाहीत. ही दुसऱ्या प्रकारची पॅडस् तुलनेनं लवकर व वारंवार बदलणं आवश्यक असतं. तुम्ही तुमच्या पाळीच्या साधारण ‘फ्लो पॅटर्न’नुसार पॅडस् ची विभागणी करून दोन्ही प्रकारची पॅडस् आलटून पालटून वापरू शकाल. उदा. रात्री झोपताना आणि दिवसा बाहेर जाताना हेव्ही फ्लोसाठीचं पॅड वापरणं आणि आपण जेव्हा घरातच असू किंवा विशेष हालचालीचं काम नसेल, तेव्हा साधं पॅड वापरता येऊ शकेल. ते आर्थिकदृष्ट्याही किफायतशीर ठरू शकेल. रात्री न चुकता हेव्ही फ्लो पॅड वापरणं आणि झोपायच्या आधी पॅड बदलणं हा उपाय रात्री ‘लीकेज’ टाळण्यासाठी प्राथमिक. शिवाय दिवसा गरज भासेल त्याप्रमाणे आणि आपण बाहेर असू तरीही सॅनिटरी पॅड बदलणं आवश्यकच आहे.
आणखी वाचा : कानाला इजा न होऊ देताही घालता येतात जड कानातली!
३) ठराविक ‘पोझिशन’ घेऊन झोपण्याचा फायदा होईल का?
याचं उत्तर ‘नाही’ असंच आहे! सॅनिटरी पॅडस् च्या जाहिरातींमध्ये दाखवतात, त्याप्रमाणे ‘सावधान’ची ‘पोझिशन’ घेऊन झोपल्यानं फायदा होईल असं आपल्याला वाटतं, पण झोप लागल्यानंतर आपल्या नकळत शरीराची स्थिती बदलते आणि शेवटी आपण आपल्याला आरामदायी वाटेल अशाच स्थितीत झोपतो. त्यामुळे हे ‘सावधान’ विसरून जा! तुम्ही योग्य सॅनिटरी प्रॉडक्ट वापरत असाल, पँटी योग्य प्रकारची असेल आणि त्यावरून तुम्हाला ‘कम्फर्टेबल’ वाटेल असे रात्रीचे कपडे असतील, तर झोपल्यावर अंथरूणावर डाग पडण्याची शक्यता मुळातच खूप कमी झालेली असते.