डॉ. लीना निकम
मनात विचार आला, आई होण्यासाठी किती मोठी किंमत मोजावी लागते बाईला! त्याकाळच्या जनरितीप्रमाणे आई आम्हाला वेगळं बसवायची. ते चार दिवस कठीणच होते. त्या दिवसात कुणी घरी आलं की लाज वाटायची. आमच्यापेक्षाही आमच्या मैत्रिणींच्या घरी फार जाच होता. एका मैत्रिणीच्या घरच्या धार्मिक कार्यक्रमात तर तिला गाईच्या गोठ्यात वेगळं बसवलं होतं. तिची सावली सुद्धा त्या कार्यक्रमात नको होती. मी भेटायला गेली तेव्हा दुरूनच माझ्याशी बोलली. ती एका बादलीत शेण गोळा करीत होती. म्हणाली, आईने उद्याच्या शेणाच्या सड्यासाठी गोळा करायला लावलंय. मनात विचार आला, म्हणजे हिने गोळा केलेल्या शेणाचा सडा अंगणभर पसरलेला चालतो पण तिने मात्र या दिवसात घरात वावरलेले चालत नाही, हा कुठला न्याय? पण आमचे शब्द घशातच घुसमटत होते.
कॉलेजमध्ये ‘लीळाचरित्र ‘शिकत असताना चक्रधरांच्या एका लीळेत त्यांनी बाईच्या पाळीचा उल्लेख ‘सर्दी पडसं होतं तसं बाईची पाळी येते. त्यात अपवित्र असे काहीच नाहीये. विश्वाचं निर्माण त्यातून आहे’ असा केला होता. ती लीळा अभ्यासली आणि वाटलं, अरे, हे कुणीतरी स्त्रियांच्या बाजूने पहिल्यांदा बोलतंय! ‘महानुभाव पंथामध्ये पाळीच्या काळात स्त्रियांना वेगळं बसवत नाही ही किती महत्त्वाची आणि स्त्रियांच्या शरीरधर्माचा आदर करणारी गोष्ट आहे हे समाज कधी समजून घेणार? जी गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्याला आणि चिकित्सा करणाऱ्याला कितीतरी वर्षांपूर्वी समजली ती आजही का समजू नये? सातशे वर्षांपूर्वी संत चोखामेळाची पत्नी संत सोयराबाई लिहीत होती,
देहासी विटाळ म्हणती सकळ
आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध
विटाळा वाचूनी उत्पत्तीचे स्थान
कोण देह निर्माण नाही जगी..
सोयराबाईंची ही कविता म्हणजे चिकित्सेचा वस्तूपाठ आहे. अरे बाईला जी मासिक पाळी येते ती अपवित्र कशी? त्यातूनच तर सृष्टीची निर्मिती आहे ना ? असे सातशे वर्षांपूर्वी विचारणारी सोयराबाई आपण केव्हा समजून घेणार? मला माहिती आहे की आज मासिक पाळीच्या बाबतीत समाज बराच पुढारला .सर्वांना कळलं आहे की पाळीत अडकून राहणं म्हणजे स्त्रियांना अडकून ठेवणं आहे. समाज बराच बदललाय पण हे प्रमाण५० टक्केच आहे की काय असं आजूबाजूला बघितलं की लक्षात येतं. अजूनही सोवळं ओवळं पाळणारा समाज बाईला वेगळं बसवतोच आहे.
धार्मिक कार्यात तर आजही स्त्रिया पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेऊन आपल्या आयुष्याशी किती क्रूरपणे खेळत असतात. निसर्ग नियमाविरुद्ध माणूस वागला तर आणखी काय होणार? माझ्याच संस्थेतील उदाहरण या ठिकाणी द्यावसं वाटतं. आमच्या संस्थेत विशिष्ट समाजातील मुली आठवी नववीत गेल्या की अचानक शाळेत येणं बंद करतात. मग काही महिन्यांनी कळतं की तिचं लग्न झालंय. मुलींनी शाळेत येणे बंद केलं की आम्ही त्यांच्या घरी जातो. तुमची मुलगी हुशार आहे. तिचे शिक्षण बंद करू नका, तिला शिकू द्या, शिकली की ती सर्व कुटुंब पुढे आणेल. सरकारही तिला नोकरी देते आहे, असं आई-वडिलांना खूप समजावतो, समुपदेशन करतो, एखाद्या तज्ज्ञाचं व्याख्यानही त्या परिसरात ठेवतो पण आमच्या जमातीत असंच आहे, आम्ही त्या विरुद्ध जाणार नाही अशी उत्तरं जेव्हा आम्हाला ऐकायला मिळतात तेव्हा नाईलाज होतो.
पाळीच्या बाबतीत सुशिक्षित झालेला तथाकथित पुढारलेला समाजही या स्त्रियांना याबाबतीत शिक्षित का करत नाही? सामाजिक रूढी, परंपरा यांची चिकित्सा जोपर्यंत आपण करत नाही ,जोपर्यंत ती तपासून पाहत नाही, वैज्ञानिक दृष्टी ,डोळस दृष्टी आणि चिकित्सकदृष्टी जोपर्यंत आपल्यात येत नाही तोपर्यंत कर्मकांडे, अंधश्रद्धा आणि स्त्रियांच्या शरीर धर्मासंबंधी खोट्या वल्गनाही तशाच सुरू राहणार.
आपण ज्यांना आदर्श मानतो त्या महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी चिकित्सा केली होती आणि एकच प्रश्न विचारला होता, ‘अहो, ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण आणि पायातून शूद्र जन्माला येतो तरी कसा? तोंडात गर्भ राहिलेला कुणी पाहिला आहे का?’ असा बुद्धीप्रमाण्यवाद शिकून सवरून सुशिक्षित झालेल्या लोकांमध्ये आजही का येऊ नये? आजीने एखादी जनरीत, रुढी , परंपरा पाळली म्हणून आई पाळते. आई पाळते म्हणून मुलगी पाळते. अंधश्रद्धा तेव्हाच निर्माण होतात जेव्हा तुम्ही माना डोलावता. कशासाठी शिकलोय आपण? धर्मग्रंथांनी काय घोळ घालून ठेवला आहे हे तपासून पहा जरा. खरंतर मासिक पाळीच्या या गैरसमजुतींनी स्त्रियांच्या आरोग्याची अन् मन:स्थितीची किती हेळसांड केली आहे! आणखी काही वर्षांनी पाळीच्या बाबतीत घराघरातील नियम शिथिल होतील असे वाटत होते, पण कसचं काय!