Menstrual Cycle Celebration : मासिक पाळी, पीरियड्स, असे शब्द कानावर येताच अनेक जणांना अवघडल्यासारखे होते. मग ते स्त्री असो वा पुरुष, हा विषय अनेक घरांमध्ये बोलणे टाळले जाते. मुलींनी एका ठरावीक वयात पदार्पण केले की, तिचे शरीर हे निसर्गनियमानुसार बदलण्यास सुरुवात होते; ज्याला आपण पौगंडावस्था, असे म्हणतो. मात्र, या अवस्थेत नेमके काय होते याबद्दल मुलींना मोकळेपणाने माहिती देणे, शिक्षण देणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी असते. परंतु, आपल्या देशात वर्षानुवर्षे मासिक पाळी आलेल्या स्त्रियांना बाजूला बसविणे, त्यांना स्वयंपाकघरात आणि पवित्र ठिकाणी प्रवेश न देणे, अशा अनेक अंधश्रद्धा पाळल्या जात आहेत.
त्याचे प्रमाण मॉडर्न जगात जरी कमी झाले असले तरीही अशी विचारपद्धती पूर्णतः बंद झालेली नाही, हे आपल्याला वेळोवेळी दिसत असते. ज्याचा त्रास हा वयात येणाऱ्या मुलींना सहन करावा लागू शकतो. कारण- योग्य शिक्षण नसल्याने तरुण मुलींना ‘मासिक पाळी’ची भीती वाटू लागते. चार दिवसांमध्ये होणारा त्रास, त्यावर उपाय, अशा दिवसांमध्ये कोणती काळजी घ्यावी अशा सर्व आवश्यक आणि महत्त्वाच्या गोष्टी मुलींना योग्य वेळेस सांगितल्या नाहीत, तर त्यांना आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा सामनादेखील करावा लागू शकतो.
समाजामधील मासिक पाळीबद्दलचा अवघडलेपणा दूर व्हावा आणि सर्वांना या विषयाचे आवश्यक शिक्षण मिळावे या हेतूने ‘म्युस फाउंडेशन’चे संस्थापक निशांत बंगेरा यांनी ‘मासिका महोत्सव’ नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प समाजातल्या प्रत्येक वर्गातील तरुणांसह स्त्रिया आणि पुरुषांनादेखील मासिक पाळीबद्दल खेळीमेळीने आणि मनोरंजक पद्धतीने शिक्षण देण्याचे काम करीत आहे. या उपक्रमाबद्दल लोकसत्ताने निशांत यांनी सुरू केलेल्या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. मासिका उपक्रमाच्या गरजेपासून ते आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेला हा ‘उत्सव’ कसा साजरा केला जातो ते जाणून घेऊ.
मासिका महोत्सवाची सुरुवात कशी झाली?
सर्वप्रथम साधारण २०१४ मध्ये निशांत यांनी ‘पीरियड ऑफ शेअरिंग’ या उपक्रमाची सुरुवात केली. तेव्हा, डहाणूमधील शाळांमध्ये पाळीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सची उपलब्धता नव्हती. त्यामुळे मुलींना ते उपलब्ध करून देण्यासाठी ‘पीरियड ऑफ शेअरिंग’च्या माध्यमाद्वारे शहरातून हे नॅपकिन्स गोळा करून ते शाळांमध्ये डोनेट केले जात असत. मात्र, प्रत्यक्षात ही मोहीम राबवणे हे बदल घडविण्यासाठी फारसे उपयुक्त नव्हते. त्यामुळे निशांत यांनी बराच अभ्यास करून, विविध गोष्टींची माहिती मिळविण्यास सुरुवात केली. त्यामध्ये सस्टेनेबल पीरियड्सबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रथम मेन्स्ट्रुअल कप, क्लॉथ पॅड अशा आवश्यक गोष्टी निशांत यांनी समजून घेतल्या. त्यानंतर २०१७ पासून त्यांच्या टीमने सस्टेनेबल पीरियडबद्दल मुलींना शिक्षण देण्यास सुरुवात केली.
मात्र, या कार्यक्रमातून निशांत यांना असे लक्षात आले, “ही माहिती वा हे ज्ञान केवळ महिला आणि तरुण मुलींपर्यंतच मर्यादित राहत आहे. मात्र, समाजातील प्रत्येक व्यक्तीला मासिक पाळी ही एक नैसर्गिक आणि सामान्य गोष्ट असून, त्यात काहीही वाईट नाही हे समजावण्याची गरज लक्षात आली. या विचारातून मासिक पाळी साजरी करणे आणि ज्या विषयाबद्दल सहसा बोलले जात नाही, त्याबद्दल सर्वांसमोर मोकळेपणाने बोलून प्रत्येकापर्यंत पीरियडचे महत्त्व पोहोचविणे या उद्देशाने ‘मासिका महोत्सव’ला सुरुवात झाली.
‘मासिका महोत्सव’मधून कशा पद्धतीने जनजागृती केली जाते?
कोणत्याही लहानशा वस्तीमध्ये जाऊन खेळ, नाच-गाणी, स्ट्रीट प्ले यांसारख्या हलक्याफुलक्या कार्यक्रमांमधून मासिक पाळीबद्दल शिक्षण दिले जाते. अशा कार्यक्रमांसाठी लोक हमखास गोळा होतात. तेव्हा त्यातील अनेक खेळांमध्ये ‘पॅड रेस’ नावाचा एक खेळ असतो. या स्पर्धेत, एका टेबलावर ठेवलेले पॅडच्या आकारात कापलेले पेपर हे दुसऱ्या टोकाला असणाऱ्या दोरीवर लावायचे असतात. जी व्यक्ती एका मिनिटात सर्वाधिक पॅडची कात्रणे दोरीला लावेल, ती व्यक्ती जिंकते. ज्या महिला मासिक पाळीदरम्यान कापडाचा वापर करतात, त्यांना ते कापड उन्हामध्ये दोऱ्यांवर वाळत घालणे अवघडल्यासारखे वाटते. मात्र, या खेळामार्फत कुणाही समोर अशा गोष्टी करण्यात काहीच वावगे नसून, स्त्रियांमध्ये मोकळेपणा आणण्याचा प्रयत्न केला जातो.
मासिका महोत्सवाचे यश
‘वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजिन डे’ हा दरवर्षी जागतिक पातळीवर २८ तारखेला साजरा केला जातो. मात्र, इतका अवघड शब्द भारतातील लहानातील लहान वस्तीत बोलला जाणे आणि त्याचा अर्थ समजून घेणे हे फार क्लिष्ट काम आहे. त्यामुळे अगदी तळागाळातील लोकांनाही समजेल, बोलता आणि समजावता येईल असे काहीतरी करण्याच्या अजून एका हेतूनेसुद्धा हा मासिका महोत्सव सुरू झाला होता.
२०१७ साली ठाण्याला याची सुरवात झाली असून, हा मासिका उपक्रम विविध ठिकाणीदेखील पोहोचवता येऊ शकतो याची जाणीव निशांत यांना झाली. “२०१७ पासून जवळपास ६५ विविध एनजीओ, संस्थांच्या मदतीने जगातल्या चार खंडांमधील तब्ब्ल १९ देशांमध्ये मासिका महोत्सव साजरा करण्यात आला. तर, यंदा भारताव्यतिरिक्त एकूण १० देशांमध्ये आणि आपल्या देशातील एकूण १५ राज्यांमध्ये हा महोत्सव उत्तम प्रतिसादानिशी साजरा केला जात आहे,” असे निशांत यांनी सांगितले.
निशांत यांच्यासह अजून २५ ते ३० सहकारी हा कार्यक्रम पुढे नेण्यास मदत करतात. त्यांमधील अनेक जण हे कॉलेज विद्यार्थी असून, त्यांच्याकडील कलागुणांच्या मदतीने मासिका महोत्सवात विविध कला सादर केल्या जातात.
मासिका महोत्सवाचे ध्येय
“मासिका महोत्सव हा राष्ट्रीय सण (नॅशनल फेस्टिवल) म्हणून साजरा व्हावा, इतक्या मोठ्या पातळीवर पोहोचवण्याचे आमचे ध्येय आहे. सध्या जशी ही मोहीम आपल्या देशात १५ राज्यांमध्ये साजरी केली जात आहे, तशी ती भारतातील प्रत्येक राज्यात आणि कानाकोपऱ्यापर्यंत साजरी होईल तेव्हा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा झाला, असे आम्हाला वाटेल.” असे निशांत यांनी सांगितले. “आम्ही आपल्या सरकारकडेही या मोहिमेत लक्ष घालण्याची मागणी करीत आहोत. एनजीओंपेक्षा सरकारच्या मदतीने, त्यांच्या धोरणांमुळे यामध्ये खूप मोठा आणि वेगाने बदल घडून येऊ शकतो.”
यंदा, नॅशनल कमिशन फॉर वूमन यांनीदेखील मासिका महोत्सवाला पाठिंबा देऊन, त्यामध्ये लोकांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
मासिक पाळीबद्दल महिलांना माहीत होतेच. मात्र, समाजातील बहुतांश पुरुषांना, मासिक पाळी हा विषय आपला नाही किंवा याबद्दल बोलणे गरजेचे नाही, असे त्यांना वाटते. मात्र याबद्दलची पुरुषांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे का, असे निशांत यांना विचारले असता, ते म्हणाले, “मी मासिका महोत्सवामधून नेहमी एकच संदेश देत असतो आणि तो म्हणजे आपला जन्म होणे हेच मासिक पाळीमुळे शक्य आहे. त्यामुळे आपण जर आपला जन्मदिवस साजरा करू शकतो, तर मासिक पाळी का साजरी करू शकत नाही? प्रत्येक पुरुषाला याबद्दल माहिती ही असायलाच पाहिजे.”