Women and Menstruation Periods : सध्या घराघरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. करोनानंतर दोन वर्षांनी थाटामाटात, वाजत गाजत बाप्पा येणार म्हणून सर्वजण अगदी तहान-भूक विसरून त्याची तयारी करत आहेत. मी एका सर्वसामान्य कुटुंबात वाढलेली मुलगी… आमच्या मुंबईतील आणि गावच्या अशा दोन्हीही घरी गणपती असतो. त्यामुळे उत्साहाला अगदी उधाण आलेलं असतं. काल रात्री आम्ही सर्व भावंड मिळून मुंबईतील घरातल्या गणपतीची आरास, डेकोरेशन याची तयारी करत होतो. ही तयारी सुरू असतानाच अचानक माझ्या पोटात दुखायला लागलं. सुरुवातीला सहज दुखत असेल म्हणून मी दुर्लक्ष केलं आणि माझं डेकोरेशनच काम करु लागली. काम झाल्यानंतर फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेली अन् तेव्हा मला माझ्या पोटदुखीचं कारण समजलं.
मला मासिक पाळी आली होती… हो ‘ती’च जी दर महिन्याला प्रत्येक मुलीला किंवा स्त्रीला येते. पाळी आली म्हटल्यानंतर मी नेहमीप्रमाणे आईकडे गेले आणि तिला सांगितलं अगं आई, मला पाळी आलीय. त्यावेळी तिचा चेहरा थोडा फुलला. मात्र काही वेळाने तिने अचानक मला कॅलेंडर आणायला सांगितले. तिने त्यात दिवस मोजले. सव्वीस, सत्तावीस, अठ्ठावीस, एकोणतीस आणि तीस…बरं झालं बाई तू मोकळी झालीस गणपतीसाठी… उगाच गणपतीच्या अध्ये मध्ये कधी झाली असतीस तर सर्वच गोंधळ झाला असता. शिवाशिव झाली असती, एकतर आपली घरं लहान त्यात हे सर्व पाळणं कठीण, बरं झालं तुला पिरीयड्स लवकर आले, असं माझी आई काकीसमोर सांगत होती. त्यावर माझी काकीदेखील हो ना….असं म्हणत तिच्या बोलण्याला सहमती देत होती.
सणाच्या दिवशी मासिक पाळीला इतकं महत्त्व का?
यावर काकीने माझ्या आईला म्हटलं, अगं अजून सोनी (माझी चुलतबहीण) तिची अजून तारीख आली नाही. मी तिला गेल्या दहा दिवसांपासून खजूर, काळीमिरीचं पाणी यासारख्या गोष्टी खायला दिल्या आहेत. देव जाणो कधी येणार तिला पाळी… ती पण मोकळी झाली असती तर बरं झालं असतं. तिची तारीख नेमकी २ सप्टेंबर आहे, आता जर त्या दिवशी तिला पाळी आली तर मामाकडे पाठवावं लागेल. काय करणार… आपल्याकडे पर्याय नाही. म्हणूनच तिला लवकर पाळी यावी अन् ती मोकळी व्हावी असं वाटतं. त्यावर आमच्याकडे बाप्पाच्या सजावटीसाठी आलेली माझी एक मैत्रीण म्हणाली… अहो, काकू ती अमूक अमूक गोळी मिळते मेडीकलमध्ये… तुम्ही ती द्या तिला…फार इफेक्ट पडतो त्याने… मी गावी एकदा लग्नासाठी घेतली होती. मला अजिबात त्यादिवशी पाळी आली नाही. लग्न वगैरे सर्व झाल्यावर मला पाळी आली. त्यामुळे मला ते छान एन्जॉय करता आलं, असं ती म्हणाली आणि माझ्या काकी लगेच उत्तरली, हो का… मला त्या गोळीचं नाव दे, उद्याच सोनीला घ्यायला लावते. गणपतीचे पाच दिवस होऊन जाऊ दे… मग काय ती पाळीबिळी आली तरी चालेल.
आणखी वाचा : पुरुषी मक्तेदारी मोडीत काढणारी मूर्तिकार रेश्मा खातू!
यानंतर काकीने गोळी आणली सोनीला घ्यायला लावली. या गोळीने फरक पडतो की नाही याचं मला काही माहिती नाही. पण त्या गोळीचं नाव सहज गुगलवर सर्च केलं तर त्याच्या उपयोगाबरोबर भरमसाठ तोटेही दिसले. मी ते माझ्या काकूला वाचायला दिले. ती चांगली ग्रॅज्युएट झालेली… त्यामुळे तिला ते समजलंच असावं, पण ती म्हणाली, असू दे…. असं काहीही होत नाही. कितीतरी मुली पाळी पुढे जावी, लवकर यावी म्हणून गोळ्या घेतात. एखाद्यावेळी सोनीने घेतली तर काय फरक पडणार आहे. तिचे हे विचार माझ्या अगदी डोक्यात गेले! एक सुशिक्षित स्त्री असा विचार कसा काय करू शकते आणि नंतर पुढे काही अपाय झाला, तर काय? डॉक्टरकडे धाव घ्यायची? वेगवेगळ्या कल्पना बाळगून पाळी टाळण्यासाठी काहीतरी उपाय करत बसायचे! कशाला करतात असं बायका? असं सहज माझ्या मनात आलं.
हे सर्व सोनी ऐकत होती.. मी तिच्याकडे बघितलं अन् ती थेट माझ्या कुशीत येऊन रडायला लागली. मी तिला सोनी काय झालं, काही दुखतंय का, त्रास होतोय का असं विचारण्यापूर्वीच तिने मला एक प्रश्न विचारला. ‘ताई, मासिक पाळी इतकी महत्त्वाची असते का? सणाच्या दिवशी मासिक पाळीला इतकं महत्त्व का दिलं जातं? ती आली नाही तरी दहावेळा आई मला विचारते आणि आता तिची ठरलेली वेळ पुढे ढकलण्यासाठी नको नको ते प्रयोग करत असते. याचा मला प्रचंड कंटाळा आलाय. बाईपण नकोसं वाटतंय मला. का देवाने आपल्याला पाळी दिली आणि दिलीच असेल तर मग इतक्या अटी का घातल्या असे एकामागोमाग एक प्रश्न तिने मला हुंदके देत देत विचारले आणि मी मात्र गप्प राहून तिचं ऐकत होते.
यानंतर ती थोडी शांत झाली अन् मला म्हणाली मी देवाला याबाबत नक्कीच विचारणार आहे. देवा, तू आम्हा स्त्रियांना मासिक पाळी दिलीस. ती आवडो किंवा न आवडो याचा विचार तू कोणत्याच बाईबद्दल केला नाही. तिला भविष्यात काही त्रास होईल का याचंही तुला कधी काहीच वाटलं नाही. पण मग मासिक पाळी आल्यानंतर मंदिरात जायचं नाही, दिवाबत्ती करायची नाही, देवाच्या पाया पडायचं नाही, कोणतंही चांगलं काम करायचं नाही, हे सर्व कशासाठी आणि का? याचे परिणाम माझ्यासारख्या मुलींना सहन करावे लागतात. कदाचित तू कधी या गोष्टी सांगितल्याही नसशील पण २१ व्या शतकात वावरणारी स्त्रीही या गोष्टी अगदी कटाक्षाने पाळते.
मासिक पाळीच्या चक्रामुळेच तर आपला जन्म झालाय!
मासिक पाळी असताना मंदिरात गेलं की देव श्राप देतो, तुम्हाला पाप लागतं असं खूप काही बोललं जातं. पण तेच एखादी महिला गर्भवती असताना तिला ९ महिने पाळी येत नाही, तेव्हा का बोललं जात नाही? मासिक पाळी दरम्यान स्त्री अशुद्ध असते, पण मग त्याच पाळीमुळे जन्माला येणारं बाळ हे शुद्ध कसं काय? मासिक पाळीदरम्यान तिला हात लावायचा नाही, तिच्या सावलीपाशीही जायचं नाही अशा विचारसरणीची माणसं आजही आपल्या जगात आहेत. पण त्या सर्वांना माझा एकच प्रश्न जर ‘ती’ची मासिक पाळी अशुद्ध असेल तर मग तुमच्या -माझ्या शुद्धतेचं काय ‘ती’च्या गर्भातून आणि मासिक पाळीच्या चक्रामुळेच तर आपला जन्म झालाय!
आणखी वाचा : ‘गोविंदा’च्या सातव्या थरावरून ‘माझं बाळ’ कोसळलं तेव्हा…
गणेशोत्सव, दिवाळी, दसरा, नवरात्रोत्सव किंवा इतर कोणताही सण असू दे तिच्या मासिक पाळीबद्दल चर्चा करण्यापेक्षा या जुनाट आणि त्रासदायक रूढींना कसा आळा बसेल, याचा आपण विचार करायला नको का? विनाकारण, पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेऊ नका, असं आवाहन स्त्रीरोगतज्ज्ञ करतील का? कदाचित त्यांनी सांगितल्यावर लोकांना पटेल… किंवा शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाच्या तासाला शिक्षक मुलामुलींबरोबर या विषयावर चर्चा करू शकतील का?
सण आणि परंपरेपेक्षा त्या बाईचा जीव महत्त्वाचा आहे. एखाद्या मासिक पाळी आलेल्या महिलेला आधीच भयंकर मनस्ताप होत असतो, त्यात या अनिष्ट रुढी परंपरेने आपण त्यात भर घालतो. त्यापेक्षा कधीतरी तिची त्या काळात विचारपूस करा. पाप- पुण्य या संकल्पना किती मानायच्या किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण असेलच त्यावर विश्वास तर पाळी आलेल्या महिलेला काय हवंय, काय नको ते विचारा, यामुळे तिच्या चेहऱ्यावर उमटणारी समाधानाची रेषा तुम्हाला ते खूप काही सांगून जाईल!